महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा, एका अल्पवयीनासह चौघांना अटक

By

Published : Jun 18, 2023, 10:46 PM IST

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा लावला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या खुनाचा अवघ्या 24 तासात छडा

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते नालसाब मुल्ला खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत हल्लेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.चौघा संशयित हल्लेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. एका खून खटल्यातील आरोपीला जामीनसाठी मदत करत नसल्याच्या कारणातून कट रचून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

उपचारादरम्यान मुल्ला यांचा मृत्यू -शनिवारी सांगली शहर गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असणारे नालसाब मुल्ला यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शहरातल्या शंभर फुटी रोडवरील गुलाब कॉलनी या ठिकाणी मुल्ला यांच्या राहत्या घरी बसले असता, हल्लेखोरांनी हल्ला चढवत ही हत्या केली होती. यावेळी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये तीन गोळ्या मुल्ला यांच्या शरीरात लागल्या होत्या. त्याचबरोबर तलवारीने देखील हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुल्ला यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सांगली शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती. तर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने विशेष पथक नेमून तपास सुरू केला होता.

सापळा रचून चौघे ताब्यात - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मुल्ला यांची हत्या करणारे संशयित हल्लेखोर हे हरिपूर-अंकली रोडवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून चौघांना ताब्यात घेण्यात आले. सनी कुरणे (वय २३) राहणार जयसिंगपूर, कोल्हापूर, विशाल कोळपे,(वय २०), स्वप्नील मलमे (वय २०) लिंबेवाडी, कवठेमहांकाळ,सांगली असे तीन आरोपीची नावे असून चौथा आरोपी हा अल्पवयीन आहे.

चौघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, मुल्ला हे खुनाच्या प्रकरणी मोक्का अंतर्गत जेलमध्ये असलेला गुन्हेगार सचिन डोंगरे याला जामीन न होऊ देण्यासाठी आणि तो बाहेर येऊ नये, यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे डोंगरे यांच्या खटल्यामध्ये मुल्ला यांच्याकडून मदत होत नसल्याने मुल्ला यांच्या खुनाचा कट रचण्यात आल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details