महाराष्ट्र

maharashtra

Tuljabhavani Gold Silver: तुळजापूर मंदिरात दान केलेले सोने-चांदी वितळविण्यास माजी पुजाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांना विरोध, जाणून घ्या कारण

By

Published : Jun 3, 2023, 3:39 PM IST

उस्मानाबादचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेले सोने-चांदी वितळविण्याचा निर्णय घेतला आहे. याला पुजारी मंडळाने विरोध दर्शविला आहे. तुळजाभवानी मंदिरातील दागदागिन्यांचा काळा बाजार करणारांचा छडा लावा. त्यानंतरच सोने-चांदी वितळवा, अशी मागणी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे आणि अ‍ॅड. आशिष कुलकर्णी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

Tuljabhavani Gold Silver
तुळजीभवानी देवी

देवीच्या दागिन्यांबद्दल पुरोहित आणि वकिलाची प्रतिक्रिया

उस्मानाबाद (तुळजापूर):वेगवेगळ्या राजा-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, 71 मौल्यवान दुर्मिळ नाणी अद्यापही गायब आहेत. या प्रकरणी तीन अधिकार्‍यांसह पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या व्यक्तींवरच आता सोने-चांदी वितळविण्याची जबाबदारी सोपविली जात असल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे.


असा घडला प्रकार:तुळजाभवानी देवीच्या मंदिरात 2001 ते 2005 या कालावधीत सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागदागिन्यांने गायब झाले. तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक राजाभाऊ दीक्षित यांच्या निधनानंतर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, त्यांच्या घरून चाव्या आणण्यात आल्या आणि देवीचा जमादारखाना तत्कालीन अधिकार्‍यांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी किशोर गंगणे यांनी तक्रार दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली. या समितीने त्यावेळच्या सर्व अधिकार्‍यांची कसून चौकशी केली आणि सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. या अहवालात प्रशिक्षणार्थी तहसीलदार सी. व्ही. सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदार आर. एस. माने, तत्कालीन तहसीलदार सतीश राऊत, मंदिर समितीचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी आणि महंत चिलोजी बुवा यांना दोषी धरण्यात आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी शिफारस या त्रिसदस्यीय समितीने केली होती.

'त्या' आदेशाला स्थगिती:यापूर्वी एकवेळा देवीला अर्पण केलेले सोने वितळविल्यानंतर तब्बल 55 किलोची तूट कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे. मागील 13 वर्षांत 204 किलो सोने आणि 861 किलो चांदी भाविकांनी अर्पण केली आहे. ते वितळविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तयार केलेल्या समितीत महंत चिलोजी बुवा यांचाही सहभाग आहे. त्यांना सोने वितळविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीतून वगळण्यात यावे. त्याचबरोबर तुळजाभवानी देवीचे सोने-चांदी आणि इतर मौल्यवान दाग-दागिने वितळविण्याचे आदेश प्रकरणाचा छडा लागेपर्यंत स्थगित करावेत, असे सांगण्यात आले.

दोषींवर कारवाईची मागणी:त्रिसदस्यीय समितीने दोषी ठरविलेल्या अधिकारी व महंतांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन विधीज्ञ शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तानाजी सावंत आणि आमदार तथा मंदिर समितीचे विश्वस्त राणा जगजितसिंह पाटील यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details