महाराष्ट्र

maharashtra

नंदुरबार जि.प वर महाविकास आघाडीची सत्ता; नंदुरबार व शहादा पंचायत समितीत सत्तांतराची चिन्हे

By

Published : Oct 6, 2021, 11:04 PM IST

Updated : Oct 7, 2021, 5:20 AM IST

Power of Mahavikas Aghadi over Nandurbar ZP

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांसाठी व 14 गणांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नंदुरबार पंचायत समितीतील पाच गणांतील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाच पैकी चार जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले, त्यामुळे प्रथमच नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेला सत्तेचे दावेदार मानले जात आहे.

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांसाठी व 14 गणांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नंदुरबार पंचायत समितीतील पाच गणांतील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाच पैकी चार जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले, त्यामुळे प्रथमच नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेनेला सत्तेचे दावेदार मानले जात आहे. तर, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता राहील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. तर, शहादा पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात गेल्याने दोन्ही पंचायत समितीत सत्तांतर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा -जि. प. पोटनिवडणुकीत 68.98 टक्के मतदान; सर्वच पक्षांनी केला विजयाचा दावा

पोटनिवडणुकीत भाजपचे नुकसान, तर महाविकास आघाडीचा फायदा

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी झालेल्या पोट निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी ११ पैकी ७ जागांवर विजय मिळालेल्या भाजपला या पोटनिवडणुकीत फक्त ४ जागा राखण्यात यश आले आहे. दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसने आपल्या गेल्यावेळेसपेक्षा एक एक जागा अधिक जिंकत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम ठेवली आहे. तर, पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला हादरा बसला असून भाजपच्या ताब्यातील शहादा पंचायत समितीत काँग्रेसला बहुमत मिळाले असून नंदुरबार पंचायत समितीमध्ये शिवसेनेने बहुमत मिळवले आहे.

नंदुरबार जि.प वर महाविकास आघाडीची सत्ता

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ६७.१७ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात झालेले हे मतदान कोणाच्या पथ्याशी पडणार याबाबत उत्सुकता होती, मात्र निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. गेल्या वेळच्या ११ जागांमध्ये भाजपच्या ७, तर सेनेच्या २ आणि काँग्रेसच्या २ सदस्यांचा समावेश होता. मात्र, निकालानंतर ७ पैकी अवघ्या ४ जागांवर भाजपला विजय मिळाल्याने जिल्हा परिषदमध्ये सत्तांतराचे भाजपचे मनसुबे अपूर्ण राहिले आहेत. तर, शिवसेनेने ३ जागांवर, तर काँग्रेसने देखील ३ जागांवर यश संपादित करत आपल्या खात्यात प्रत्येकी १ जागेचा फायदा केला आहे. तर, राष्ट्रवादीने देखील १ जागेवर विजय संपादित केल्याने महाआघाडीच्या घटक पक्षांना चांगले यश मिळाल्याचे पहावयास मिळाले.

अक्कलकुवा महाविकास आघाडीला कौल

अक्कलकुवा तालुक्यातील खापर गटातून आदिवासी विकास मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या भगिनी गिता पाडवी यांनी भाजपच्या नागेश पाडवी यांचा पराभव करत विजय मिळवला. गिता पाडवी यांना ६ हजार ५९७, तर भाजपच्या नागेश पाडवी यांना ४ हजार ९३१ मते मिळाली. गिता पाडवी यांचा १ हजार ६६६ मतांनी विजय झाला. अक्कलकुवा गटातून काँग्रेसच्या मकराणी सुरय्या बी आमीन यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या वैशाली कपील चौधरी यांचा १ हजार ४५७ मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या मकराणी सुरय्या बी आमीन यांना ३ हजार ६ मते मिळाली, तर भाजपच्या वैशाली चौधरी यांनी १ हजार ४५७ मते मिळाली. या तालुक्यातील कोराई गणाची निवडणूक आधीच बिनविरोध होत. या ठिकाणी शिवसेना उमेदवार अश्विनी वसावे विजयी झाल्या आहेत.

शहाद्यात काँग्रेस एक, भाजप दोन, तर एका जागेवर राष्ट्रवादी विजयी

शहादा तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहे. त्यांना ५ हजार ८०४ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार शशिकांत पाटील यांना २ हजार ८८१ मते मिळाल्याने शितोळेंचा 2 हजार 923 मतांनी विजय झाला. लोणखेडा गटातून अपेक्षेप्रमाणेच भाजपच्या जयश्री पाटील यांचा विजय झाला असून त्यांनी काँग्रेसच्या गणेश पाटील यांचा ४ हजार २०४ मतांनी पराभव केला. जयश्री पाटील यांना ७ हजार ३५७, तर काँग्रेसचे गणेश पाटील यांना ३ हजार १५३ मते मिळाली. सर्वाधिक धक्कादायक निकाल मानल्या जाणाऱ्या पाडळदा गटातून राष्ट्रवादीच्या मोहन शेवाळेंनी भाजपचे धनराज पाटील यांचा ५२९ मतांनी पराभव केला. धनराज पाटील हे सिंटिंग सदस्य होते. राष्ट्रवादीच्या मोहन शेवाळे यांना ४ हजार ८०३, तर भाजपचे धनराज पाटील यांना ४ हजार २७४ मते मिळाली. कहांटूळ गटातून भाजपाच्या एश्वर्या रावल विजयी झाल्या. रावल यांना 5 हजार 820, तर काँग्रेसच्या मंदा बोरसे यांना 5 हजार 362 मते मिळाल्याने रावल यांचा ४५८ मतांनी विजय झाला. या गटातून गतवेळेस काँग्रेसने बाजी मारल्याने शहादा तालुक्यात काँग्रेसला एका जागेचा फटका बसला.

पोटनिवडणुकीत एका जागेवर शिवसेनेचा फायदा

नंदुरबार तालुक्यातल्या कोळदे गटातून भाजपच्या सुप्रिया गावित १ हजार ३६८ मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या सुप्रिया गावितांना ६ हजार ७०७ मते मिळाली, तर शिवसेनेच्या आशा पवारांना ५ हजार ३३९ मते मिळाली. खासदारा डॉ. हिना गावित यांच्या त्या भगिनी आणि आमदार डॉ. विजयकुमार गावितांच्या त्या लहान कन्या असल्याने या जागेबाबत सर्वांच्याच नजरा लागून होत्या. तर, कोपर्ली गटातून शिवसेनेचे विद्यमान उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी पुन्हा विजय संपादित केला. रघुवंशी यांना 8 हजार 668, तर विरोधी भाजपच्या पंकज गावितांनी 5 हजार 664 मते मिळाली. राम रघुवंशी हे शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी याचे सुपूत्र असून त्यांच्यासमोर भाजपने आमदार विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावितांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने चुरस निर्माण झाली होती, मात्र राम रघुवंशी यांनी ३ हजार ४ मताधिक्याने निवडून येत गटातील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

शनिमांडळ गटातून शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे यांनी भाजपच्या रेखा सागर धामणे यांचा १९० मतांनी पराभव केला. जागृती मोरे यांना ६ हजार २९९, तर रेखा धामणे यांना ६ हजार १०९ मते मिळाली. रनाळे गटातून शिवसेनेच्या शंकुताल शित्रे या १ हजार ३०१ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना ७ हजार ९७ मते मिळाली, तर विरोधी भाजपच्या रिना पाटील यांना ५ हजार ७९६ मते मिळाली. सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या आणि अत्यंत अटातटीच्या लढतीत खोंडामळी गटातून भाजपच्या शांताराम पाटील यांनी शिवसेनेच्या गजानन पाटील यांचा अवघ्या ८७ मतांनी पराभव केला. भाजपच्या शांताराम पाटील यांना 7 हजार 77, तर शिवसेनेच्या गजानन पाटील यांना 6 हजार 990 मते मिळाली.

शहादा व नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतराची शक्यता

शिवसेनेची नंदुरबार पंचायत समितीवर सत्ता स्थापन झाल्यास इतिहास घडणार आहे. नंदुरबार पंचायत समितीत आता शिवसेनेचे ८, काँग्रेसचे तीन, तर भाजपचे ९ सदस्य, असे पक्षीय बलाबल आहे. तर, सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे ११, तर शिवसेनेचे ६ व काँग्रेसचे तीन, असे पक्षीय बलाबल होते. तर, आता शिवसेनेची सदस्य संख्या वाढल्याने नंदुरबार पंचायत समितीवर शिवसेना काँग्रेसला सोबत घेवून सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, २८ सदस्यांच्या शहादा पंचायत समितीमध्ये देखील एकूण १५ जागांवर यश मिळवत काँग्रेसने सत्तेची वाट मोकळी केली आहे. त्यामुळे, शहादा पंचायत समितीत सत्तांतर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शेवटी विजय घराणेशाहीचा

या साऱ्या जय पराजयानंतर महाविकास आघाडीमध्ये समाधान समन्वयाची भाषा केली जात असतानाच भाजपमधील अंतर्गत कलाहाने सारे पराभव झाले असल्याच्या भाजप नेत्यांच्या दाव्यांनी आता भाजपातील वाद चव्हाट्यावर आला आहे. जो जिता वही सिंकदर, असे म्हटले जात असतानाच नंदुरबारच्या राजकारणातील मात्तबर नेत्यांनी आपल्या घराण्यातील उमेदवारांकडे सत्ता कायम ठेवल्याने शेवटी विजय घराणेशाहीचाच, असेच काहीसे चित्र नंदुरबारच्या निकालांनंतर दिसून येत आहे.

हेही वाचा -व्यायाम करत असताना आश्रम शाळेतील 16 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, नवापूर तालुक्यातील घटना

Last Updated :Oct 7, 2021, 5:20 AM IST

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details