महाराष्ट्र

maharashtra

Nanded Crime: गुप्तधन शोधण्यासाठी मुख्याध्यापकाने शेतात मांडली पूजा; गावकऱ्यांनी थेट पोलिसच बोलवले

By

Published : Aug 9, 2023, 9:24 PM IST

शेतातील गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी काल (मंगळवारी) अटक केली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. कंधार तालुक्यातील भोजुचीवाडी येथे हा अघोरी प्रकार घडला असून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये एका आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आणि लॅब टेक्निशनचा समावेश आहे.

Nanded Crime
गुप्तधन

गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला करण्यात आलेल्या अटकेविषयी माहिती देताना गावकरी

नांदेड : गुप्तधनाचा लोभ आश्रम शाळेतील मुख्याध्यापक आणि लॅब टेक्निशनसह इतर काही लोकांना चांगलाच महागात पडला आहे. जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी काल (मंगळवारी) अटक केली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी या गुप्तधनासाठी जादूटोणा करणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. कंधार तालुक्यातील भोजुचीवाडी येथील हा अघोरी प्रकार असून पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

'हे' आहेत ते मांत्रिक :आरोपी अनिल कामाजी कावळे, शेतमालक नामदेव तुकाराम देवकते (रा. भोजूचीवाडी), धन शोधणारा मांत्रिक देवदास संभाजी नागठाणे, छायाबाई राजू जोंधळे, संजय जळबाजी पुय्यड, मुखतार अब्दुल खादर शेख, शाळेचे मुख्याध्यापक संभाजी रामजी कागणे यांना अटक करण्यात आली आहे. कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी शिवारात नामदेव तुकाराम देवकते यांचे शेत आहे. यांच्या शेतात गुप्तधन असल्याची अनिल कावळे यांनी माहिती मांत्रिक देविदास नागठाणेला दिली होती. त्यानुसार सहा ते सात जणांनी शेतात गुप्तधन शोधण्याची तयारी सुरू केली.


गावकऱ्यांनी दिली पोलिसांना माहिती :आरोपी शेतात खड्डा करून अघोरी पूजा करत होते. या अघोरी प्रकाराची कुणकुण गावातील काही नागरिकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी ११२ नंबर डायल करून कंधार पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनास्थळी पोलीस येईपर्यंत गावकऱ्यांनी त्यांना पकडून ठेवले होते. त्या ठिकाणी एक खड्डा खोदण्यात आला होता. ज्यामध्ये लिंबू, नारळ ठेवून पूजा मांडली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून पूजेच्या साहित्यासह कार, मोबाईल जप्त केले आहे.

जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल :विशेष म्हणजे गुप्त धन शोधण्यासाठी जात असताना कारचे डिझेल संपले होते. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक संभाजी रामजी कागणे यांनी डिझेल आणून दिले होते. पोलिसांनी मुख्याध्यापकाला देखील अटक केल्याची माहिती आहे. यातील एक आरोपी हा आश्रम शाळेत लॅब असिस्टंट आहे. या प्रकरणी कंधार पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर करीत आहेत. या घटनेने कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:

  1. Aurangabad Crime : धक्कादायक! पुरोगामी महाराष्ट्रात गुप्तधनासाठी नरबळीचा प्रयत्न; तीन आरोपी अटकेत
  2. जालन्यातील बदनापूर येथे गुप्तधन काढण्याचा प्रयत्न फसला, 3 अटकेत
  3. गुप्तधन खोदणाऱ्या 'त्या' मजुराची आत्महत्या; मानसिक छळ करणाऱ्या मालकांवर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details