महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Rain : मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, अवघ्या काही तासात अंधेरी सबवे बंद

By

Published : Jul 26, 2023, 10:20 PM IST

मुंबईत आज पावसाने जोरदार बॅटिंग केली. जोरदार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अवघ्या काही तासात अंधेरी येथील सबवे पाण्याखाली गेला आहेत. तर, लोकल सेवेवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Mumbai Rain
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत आज दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई आणि ठाण्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सोबतच या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. आज दुपारनंतर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली असून, अवघ्या काही तासात अंधेरी येथील सबवे पाण्याखाली गेला आहे. मात्र लोकल सेवेवर कोणताही परिणाम अद्याप झालेला नाही. पुढचे 24 तास मुंबईत पावसाची हीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



मार्ग वाहतुकीसाठी बंद : आज दुपारनंतर मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतर अवघ्या काही तासात अंधेरी येथील सबवेमध्ये पाणी शिरल्याने तो बंद करण्यात आला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या येथील पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. तर पुन्हा एकदा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल अशी माहिती, प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम नाही : रस्त्यांसोबतच मुंबईतील पावसाचा रेल्वे वाहतुकीला देखील लगेच फटका बसतो. त्यामुळे सततच्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर काही परिणाम झाला आहे का? याची रेल्वेकडे माहिती मागितली असता, रेल्वे अधिकाऱ्यांकडून अद्याप तरी या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले आहे. तसेच रेल्वेच्या सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत असून, या गाड्यांना मुसळधार पावसामुळे थोडा विलंब होत आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढच्या तीन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. 28 जुलै नंतर मुंबई, ठाणे या भागात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दोन ते तीन दिवस रेड अलर्ट कायम राहणार आहे. ज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, तसेच जिल्ह्यांच्या विविध भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. Thane Rain Update: तानसा धरण ओव्हरफ्लो, सात दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
  2. Maharashtra Rain update : कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट; तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  3. Maharashtra Rains Update : आयएमडीचा 'या' आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details