महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray Met CM Shinde : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन, सिडको संदर्भात चर्चा

By

Published : Apr 20, 2023, 9:44 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडीडी चाळ पुनर्निर्माण प्रकल्पाच्या मुद्द्याला घेऊन आज (गुरुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी त्यांनी गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी ठाकरेंसोबत मनसे पदाधिकारी आणि बीडीडी चाळीतील रहिवाश्यांचे एक शिष्ट मंडळ देखील होते.

Raj Thackeray Meet CM Shinde
राज ठाकरे

मुंबई:बीडीडी चाळ पुनर्निर्माण प्रकल्प गृहनिर्माण विभागाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असून तो मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या संदर्भात बीडीडी चाळीतील स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे देखील केली; मात्र आता या रहिवाशांच्या मदतीला राज ठाकरे सरसावले आहेत.

बीडीडी बाबत लवकरच प्रेझेंटेशन:मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, वरळीतील बीडीडी चाळ पुनर्निर्माण प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. मागील अनेक वर्षे इथल्या रहिवाशांना घर कधी मिळणार याचा पत्ता नाही. इतकेच काय या घरांचे आकारमान साधारण किती असेल? तिथे नेमकं काय होणार आहे? आपल्याला किती स्क्वेअर फुटाची घर मिळतील, याची माहिती देखील इथल्या स्थानिक रहिवाशांना नाही. हा परिसर खूप मोठा आहे. त्यामुळे इथे शाळा, रुग्णालय, मैदान अशा व्यवस्था देखील होणार आहेत का? हे देखील स्थानिक रहिवाशांना ठाऊक नाही. यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर याचे एक प्रेझेंटेशन लवकरच वरळीतील स्थानिक नागरिकांना देण्यात येईल. त्यानंतर या स्थानिकांना या प्रकल्पाबाबत सर्व माहिती मिळेल.

सिडकोच्या घरांचा लवकरच निर्णय:सिडको बाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सिडकोने सध्या घरांची नवी लॉटरी जाहीर केली आहे; मात्र घरांच्या किमती फारच जास्त आहेत. त्या सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या नाहीत. ज्या घरांच्या किमती 22 लाख होत्या त्या आता 35 लाखांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिडकोने या किमती पुन्हा पूर्वपदावर म्हणजेच 22 लाख कराव्यात, या मागणी संदर्भात देखील ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यासोबतच पोलिसांच्या घराबाबत देखील सरकार लवकरच आपला निर्णय जाहीर करेल, असे सांगितले.


'या' मुद्द्यांवरही चर्चा:या दोन मुद्द्यांसोबतच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसोबत काजू बीसाठी हमी भाव जाहीर करणे, दादर मासळी मंडईच्या व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच नाशिक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनीचे जप्ती आणि लिलाव काढल्याबद्दल चर्चा केली. सध्याची परिस्थितीत लक्षात घेता अल्प कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावू नये, अशीही मागणी मुख्यमंत्री शिंदेंना केली असल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

'या' दिग्गजांची उपस्थिती: यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर उपस्थित होते.

हेही वाचा:Terrorist Attack on Army Vehicle : लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; ग्रेनेड फेकल्याने लागली आग, 5 जवान शहीद

ABOUT THE AUTHOR

...view details