महाराष्ट्र

maharashtra

भंडाऱ्यात ओबीसींचा मोर्चा; ओबीसी जातिनिहाय जनगणनेची मागणी

By

Published : Jan 4, 2020, 11:19 PM IST

१९३१ नंतर आजपर्यंत ओबीसीची जातिनिहाय जनगणना झाली नाही. म्हणून, ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडारा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता.

bhandara
मोर्चाचे दृश्य

भंडारा- आपल्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनेच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यात पहिल्यांदाच ओबीसी बांधवांनी काढलेल्या या मोर्चात विविध जाती संघटनेचे शेकडो लोक सामील झाले होते. ओबीसी जनगणना परिषद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. शास्त्रीय चौकातून निघालेल्या या मोर्चाचे नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

१९३१ नंतर आजपर्यंत ओबीसीची जातिनिहाय जनगणना झाली नाही. म्हणून, ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडारा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसीची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे ही प्रमुख मागणी होती. तसेच संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी व्हावी, एससी-एसटी प्रमाणेच ओबीसींनाही सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळावा, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सुविधा मिळावी, तसेच ओबीसींना आरक्षणात लागलेली क्रिमिलेयर रद्द व्हावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी आणि ओबीसींना संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाची सुरूवात शास्त्री चौकातून झाली. यात खासदार आणि आमदारांनीही काही वेळेसाठी हजेरी लावली होती. त्यानंतर, शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून पुढे जात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. मोर्चामध्ये ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघ, ओबीसी शेतकरी संघटना, ओबीसी शेतमजूर संघटना, ओबीसी कर्मचारी संघटना, ओबीसी डॉक्टर संघटना आणि ओबीसी व्यापारी संघटना, अशा विविध संघटनांचा समावेश होता.

ओबीसींची जनगणना करा, मंडल आयोग लागू करा, संविधानाचे कलम ३४० अंमलबजावणी करा, अशा पद्धतीचे बॅनर घेऊन हे मोर्चेकरी निघाले होते. सदर मोर्चा राजकीय नसल्याने मंचावर सर्वसामान्य ओबीसी समाजातील अभ्यासक बसले होते. ही सभा सायंकाळपर्यंत सुरू राहिली. अभ्यासकांनी ओबीसींवर कशा पद्धतीचा अन्याय होतो, कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती मोर्चेकरांना दिली. ओबीसी बांधवांना एकत्रित करून त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. आम्ही आमच्या मागण्यां संदर्भात सर्व राजकीय लोकांनाही सांगितले आहे. येणाऱ्या काळात आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा-आमदार भोंडेकर यांचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कक्षाला टाळे ठोको आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details