महाराष्ट्र

maharashtra

मुलांसोबत खेळणाऱ्या बारा वर्षाच्या मुलीचा बापाकडून छळ; विहिरीत उडी घेऊन मुलीची आत्महत्या

By

Published : Jul 4, 2020, 7:23 AM IST

Updated : Jul 4, 2020, 8:54 AM IST

मुलीने आत्महत्या केल्याने आई संगिता यांना हा सर्व प्रकार असह्य झाला. त्यांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर उत्तम देशमुख याच्यावर मुलीस मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

twelve year girl suicide in beed
विहिरीत उडी घेऊन मुलीची आत्महत्या

बीड -वय वर्ष 12 असलेली मुलगी सतत मुलांसोबत खेळते, याचा राग धरून चक्क जन्मदात्या बापानेच मुलीचा प्रचंड छळ केला. एवढेच नाही तर दोन दिवस उपाशी देखील ठेवले. बापाने केलेल्या छळाला वैतागून अखेर त्या मुलीने स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील खोकरमोह येथे गुरुवारी रात्री समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमृता ज्ञानेश्वर देशमुख (वय १२) असे मुलीचे नाव आहे.

तिच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की सोमवारी (दि. २२ जून) अमृता तिचा लहान भाऊ आणि नात्यातील इतर मुलांसोबत घरात खेळत होती. दुपारी एक वाजता तिचे आई-वडील बॅंकेतून परतले. अमृता मुलांसोबत खेळत आहे हे पाहून तिच्या दारुड्या बापाचा पारा चढला. मुलांसोबत का खेळतेस म्हणत त्याने तिला बेदम मारहाण केली आणि भिंतीच्या कडेला एकाच जागी उभे केले. रात्री आठ वाजेपर्यंत अमृता एकाच जागी उभी होती, तिला बसू पण दिले नाही. रात्री दारुडा बाप पुन्हा दारू पिवून घरी आला आणि अमृताला मारण्यासाठी गज काढला, परंतु आईच्या मध्यस्थीने अमृता वाचली.

दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरने अमृताला पुन्हा मारहाण केली आणि एक ते सात वाजेपर्यंत उभा केले आणि जेवण पण दिले नाही. सलग दुसऱ्या रात्रीही दोघी मायलेकी उपाशीच झोपल्या. सकाळी भुकेने व्याकूळ झालेल्या अमृताने बाप बाहेर गेल्यानंतर स्वतःसाठी चहा केला. चहाबिस्कीट खात असताना बाप पुन्हा आला. त्याने तिला चहा घेऊ दिला नाही. बाप पुन्हा बाहेर गेल्यानंतर अमृता आणि आईने स्वयंपाक तयार केला. नेमके जेवायला घेताना तो परतल्याने भीतीने अमृता जेवली नाही. त्यानंतर बुधवार (दि. २४) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अमृता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि विहिरीत उडी मारुन तिने आत्महत्या केली. त्यानंतर बापाने पोलीस ठाण्यात खोटी माहिती दिली. अखेर तिची आई संगिता यांना हा सर्व प्रकार असह्य झाला, त्यांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर उत्तम देशमुख याच्यावर मुलीस मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Last Updated : Jul 4, 2020, 8:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details