महाराष्ट्र

maharashtra

Aurangabad Student Story : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, धरणाच्या बॅकवॉटरमधून जाण्यासाठी थर्मोकोलचा आधार

By

Published : Aug 19, 2023, 3:25 PM IST

Updated : Aug 19, 2023, 4:09 PM IST

देशाने तयार केलेलं यान चंद्रावर पोहचलं मात्र ग्रामीण भागात आजही रस्ते नाहीत. रस्ते नसल्याने रुग्णालयात पोहोचण्यास वेळ लागत असल्याने अनेकांना जीव गमावावा लागतोय. तर औरंगाबाद जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटरमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील विद्यार्थ्यांचा शाळेत जाणारा प्रवास पाहिला तर आपल्या अंगावर काटे उभे राहतात.

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : भिवधानोरा गावातील मुलांना शाळेत जाताना बॅक वॉटरमधून थर्मोकोलवर बसून प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांचा जीवघेण्या प्रवासबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तरी अद्याप ना अहवाल आला ना मुलांना दिलासा मिळाला. त्यामुळे सरकारी व्यवस्था खरंच इतकी व्यग्र असते का? लोकांचा जीव महत्वाचा नाही का? असे प्रश्न स्थानिक विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास : नुकताच आपण देशाचा 77 वा स्वतंत्र्यदिन साजरा केला. तर एकीकडे डिजिटल इंडियाचा नारा दिला जातोय. भारत जगातील तिसरी महासत्ता म्हणून नावारुपाला येत आहे, अशा चर्चादेखील होताहेत. मात्र ग्रामीण भागात आजही सोयी-सुविधा पुरविण्यात आतापर्यंत कोणतंही सरकार आलं तरी ते अपयशी ठरलं आहे. हे सातत्याने काही घटनांमधून दिसून येत आहे. औरंगाबादसारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतं असल्याचं पाहून सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब झालंय. गावातील जवळपास 15 मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जातात. त्यांना जायकवाडी बॅक वॉटरमधून जाताना खराब थर्मोकोलवर बसून पलीकडील गावात जावं लागतं. या मुलांना असा प्रवास करताना अनेक अडचणी येत असतात. काहीवेळा तर पाण्यातील साप थर्मोकोलवर चढतात. त्यामुळे हातात एक काडी घ्यावी लागते. जर साप वरती आला तर त्याला काडीने पाण्यात ढकलता येईल, असं प्रवास करणारे विद्यार्थी सांगतात.

शाळेत गेलेली मुलं परत येईपर्यंत जीवाला घोर लागलेला असतो. अनेकवेळा मागणी करुनही यावर उपाय करण्यास सरकारी यंत्रणा तयार नाहीत. त्यात लोकप्रतिनिधी फक्त भाषण करतात. परंतु त्यावर उपाय करत नाहीत- विष्णू काळे,ग्रामस्थ

म्हणून मार्ग निघत नाही : मागीलवर्षी ही बाब लक्षात आल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंगापूर येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु सरकारी अनास्था पुढे आली आणि अजूनही हवाल सादर झाला नाही. या ठिकाणी 9 ते 10 कोटी रुपयांचा पूल तयार केला गेला, तर अडचणी दूर होतील. पण हा खर्च जलसंपदा विभाग करू शकणार नाही. तो खर्च बांधकाम विभागाने केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाणांनी अधिवेशनात मांडला होता. मात्र अद्यापही मुलांच्या जीवघेण्या प्रवासाची दखल सरकारने घेतली नाहीे. यावर स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय.

सतत करावा लागतो प्रवास : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून विशेष प्रयत्न केले जातात. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, अशा घोषणा नेहमीच केल्या जातात. मात्र आजही मुलांना शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीये. धरण क्षेत्र असल्याने बॅकवॉटरचं पाणी नेहमीच राहते. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

हेही वाचा-

Farmers DJ Dance : ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट; मालाला भाव मिळाल्याने शेतकरी डीजेच्या तालावर झिंगाट, पाहा व्हिडिओ

Last Updated : Aug 19, 2023, 4:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

संबंधित बातम्या