महाराष्ट्र

maharashtra

Ashadhi Wari 2023: पांडुरंगाची अनोखी सेवा, यंदाही एक लाडू लाडक्या पांडुरंगासाठी उपक्रम सुरू

By

Published : Jun 27, 2023, 9:57 PM IST

औरंगाबाद शहरात एक लाडू लाडक्या पांडुरंगासाठी उपक्रम राबवत पांडुरंगाची अनोखी सेवा केली जात आहे. सिंधी कॉलनी येथे बालाजी मंगल कार्यालयात 72 हजार लाडू बांधण्यात आले. हे लाडू एकादशीला पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती, आयोजक मनोज सुर्वे यांनी दिली.

Ashadhi Wari 2023
पांडुरंगाची अनोखी सेवा

माहिती देताना मनोज सुर्वे

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात वारकरी पायी दिंडीत प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. राज्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत आहे, मात्र असे अनेक भक्त आहेत ज्यांना इच्छा असूनही पंढरपूरला दर्शनासाठी जाता येत नाही. त्यामुळेच शहरातील नागरिक एकत्र येत "एक लाडू लाडक्या पांडुरंगासाठी" उपक्रम राबवतात. पायी प्रवास करून वारीला गेलेल्या वारकऱ्यांसाठी गेल्या पंधरा वर्षांपासून लाडू तयार करण्याचा उपक्रम राबवला जातो. यंदा 72 हजार लाडू तयार केले गेले, हे लाडू एकादशीला पंढरपूर येथे वाटप करण्यात येणार आहेत.


वारकऱ्यांसाठी लाडूचा प्रसाद : आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी वेगळी पर्वणी मानली जाते. जवळपास 19 दिवस जग विसरून देवाचे नामस्मरण करीत पायी प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीला भक्त जातात. मात्र अनेक भक्त असे असतात ज्यांची इच्छा असूनही ते एकादशीला दर्शनाला जाऊ शकत नाहीत, मात्र त्यांना भक्ती करण्याची इच्छा असते. असे म्हणतात पायी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये पांडुरंगाचा वास असतो, त्यामुळे अशा भक्तांसाठी लाडू तयार करून शहरातील भक्त आगळी वेगळी भक्ती करत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून मनोज सुर्वे यांच्या सोबत हजारो नागरिक या उपक्रमात सहभागी होतात. सुरुवातीला अकरा हजार लाडू पासून सुरुवात झालेल्या उपक्रम हा यावर्षी 72 हजार लाडूंची बांधण्यात आल्याची माहिती आयोजक समिती सदस्य मनोज सुर्वे यांनी दिली.



72 हजार लाडूंचे होणार वाटप : आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी आषाढी निमित्त पंढरपूरला पायी गेलेल्या वारकऱ्यांसाठी लाडू बांधले जातात. या उपक्रमाला माझा एक लाडू लाडक्या पांडुरंगाला असे नाव दिले गेले. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने उपक्रम राबवला जात आहे. प्रत्येक वर्षी सहभाग घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदा सिंधी कॉलनी येथे बालाजी मंगल कार्यालयात 72 हजार लाडू बांधण्यात आले. यासाठी एक हजार किलो शेंगदाणे, एक हजार किलो गूळ, शंभर किलो साजूक तूप वापरण्यात आले. या लाडूंचे एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे वारकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या निमित्ताने पांडुरंगाची आगळी वेगळी सेवा घडेल अशी भावना उपक्रमात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली.



द्वादशीला महाप्रसादाचे आयोजन : शहरातून जवळपास दोन बस करून शंभरहून अधील भक्त पंढरपूरमध्ये दाखल होतात. एकादशीच्या दिवशी गूळ शेंगदाणा लाडू सोबत सकाळी 100 किलो साबुदाण्याची खिचडी तर सायंकाळी 100 किलो भगर प्रसाद म्हणून वाटप केला जातो. तर द्वादशीला सकाळीच सात वाजता पुरण, वरण, भात, भजे, पापड असा महाप्रसाद केला जातो. त्यांनतर 200 किलोच्या पुरण पोळी तयार केल्या जातात. जवळपास दोन ते अडीच हजार वारकऱ्यांना प्रसाद दिला जातो अशी माहिती आयोजक मनोज सुर्वे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Saptarangi Dnyaneshwari : सहा महिन्यात हाताने लिहिली सप्तरंगी ज्ञानेश्वरी; निवृत्त प्राध्यापकाची अनोखी माऊली भक्ती
  2. Ashadhi wari 2023 : कोल्हापुरात अनोखे धार्मिक ऐक्य! गेल्या 32 वर्षांपासून मुस्लिम कुटुंब करत आहे दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा

ABOUT THE AUTHOR

...view details