महाराष्ट्र

maharashtra

खंडाळा शाळेने उघडले ज्ञानाहार रेस्टॉरंट; ऑनलाइन शिक्षणाला शिक्षकांनी दिला रुचकर पर्याय

By

Published : Sep 4, 2021, 11:55 AM IST

Updated : Sep 5, 2021, 6:35 AM IST

ऑनलाइनवर शिक्षणाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला रुचकर पर्याय

रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेटवर विविध विषयांचे लेखन करून विद्यार्थ्यांना ते अभ्यासासाठी पुरवले जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासाचे लेखन या साहित्यावर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा जेवण आणि नाश्ताच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी लागली आहे.

अकोला - कोविडच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मागील दीड वर्षापासून शाळांची घंटा नियमितपणे वाजली नाही. बहुतांश शाळा सुरूच झाल्या नाहीत. विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा पर्याय पुढे आणला. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू रहावे म्हणून तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळेने विद्यार्थ्यांसाठी 'ज्ञानाहार रेस्टॉरंट' ही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरू केली आहे.

ऑनलाइनवर शिक्षणाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला रुचकर पर्याय

कोरोनामुळे सध्या बहुतांश शाळा बंद आहेत, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारच्या विचारधिन होता. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे त्या निर्णयावरही सावट आले. मात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून खंडाळा जिल्हा परिषद शाळेने येथील विद्यार्थ्यांना घराजवळ शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शाळा बंद असल्याने ऑफलाईन शिक्षण देण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी शिक्षकांनी हा उपक्रम राबविला आहे. रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रोण, पत्रावळी, कागदी प्लेटवर विविध विषयांचे लेखन करून विद्यार्थ्यांना ते अभ्यासासाठी पुरवले जाते. इयत्ता पहिली ते सातवीच्या अभ्यासाचे लेखन या साहित्यावर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास हा जेवण आणि नाश्ताच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जात आहे. या नव्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासाची गोडी लागली आहे.

खंडाळा शाळेने उघडले ज्ञानाहार रेस्टॉरंट


ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणात असंख्य अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी शाळेच्या वतीने आतापर्यंत रेडिओ खंडाळा, स्वाध्यायमाला, निसर्गयात्रा, ऑनलाईन टेस्ट, मोहल्ला शाळा असे उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने राबविले. ज्ञानाहार रेस्टॉरंट तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ सदस्य दिनकर धूळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. तेथून विद्यार्थी ज्ञानाहार घेऊन घरी अभ्यास करतात. पुस्तकातील आशय, स्वाध्याय पत्रावळीवर लेखन करून शिक्षकांनी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची आवड विद्यार्थ्यांमध्ये या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न या शिक्षकांनी केला आहे. गणितीय क्रिया, भाषा व्याकरण, इंग्रजी, विज्ञान, भौगोलिक माहिती, इतिहास विषयासंबंधी सोप्याकडून कठीणकडे जाणाऱ्या स्वाध्याय कृती ज्ञानाहार रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासह अभ्यासपूरक वाचनीय पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत. ज्याचा उपयोग गृहकार्य करण्यासाठी विद्यार्थी आवडीने करीत आहेत.

ऑनलाइनवर शिक्षणाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला रुचकर पर्याय
कोविड संसर्ग नियम लक्षात घेऊन केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैला खंडेराव, उपाध्यक्ष प्रशांत आंबूसकर, शिक्षणतज्ज्ञ दिनकर धूळ, सदस्य संतोष वैतकार यांच्या सहकार्याने गावातील विद्यार्थी आनंदाने अध्ययनरत राहावे, यासाठी ज्ञानरचनावादी पद्धतीने सुरू केलेल्या ज्ञानाहार रेस्टॉरंट उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले, सुरेखा हागे, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी कौतुक केले आहे. नियमित शिकण्याच्या साहित्यासोबत वेगळी शैक्षणिक साधने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यास ते आनंदाने अभ्यास करतात. या अनुभवातून ज्ञानाहार रेस्टॉरंट सुरु केले. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाइनवर शिक्षणाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला रुचकर पर्याय
Last Updated :Sep 5, 2021, 6:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details