ETV Bharat / state

पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 1:20 PM IST

PM Modi Maharashtra Tour
पीएम मोदी

PM Modi Maharashtra Tour : १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ व ३० एप्रिल असे दोन दिवस महाराष्ट्राचा झंझावती दौरा करणार आहेत. सोमवारी ते सोलापूर, कराड आणि पुणे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचार सभा घेणार आहेत. जाणून घेऊ, यामागील राजकीय गणिते!

मुंबई PM Modi Maharashtra Tour : भाजपाला मागील दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता मोदी यांना तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदानात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे तिसऱ्या आणि चौथा टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सोलापूर, सातारा, सांगली, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, बीड अशा महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात रंगतदार लढती होणार आहेत. महायुती तसेच भाजपासाठी हे दोन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.


पंतप्रधानांचा चेहरा भाजपाला तारक : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम शिगेला पोहोचलेला असताना निवडणुकीच्या देशभरातील एकूण सात टप्प्यांपैकी दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी महाराष्ट्रात सोमवार २९ एप्रिल रोजी ३ आणि मंगळवारी ३० एप्रिल रोजी ३ अशा दोन दिवसात एकूण ६ प्रचार सभा घेणार आहेत. उत्तरप्रदेश मधील लोकसभेच्या एकूण ८० जागा नंतर ४८ जागा असलेलं महाराष्ट्र हे सर्वांत मोठं दुसरं राज्य आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जनतेकडून भावनिक साथ व सहानुभूती मिळत असल्यानं भाजपाची चिंता वाढली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहराच भाजपाला तारु शकतो. या कारणानं मोदी यांच्या सभांना महत्त्व प्राप्त झालं आहे.


तिसरा आणि चौथा टप्पा अतिशय महत्त्वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव तसेच लातूर येथे प्रचार सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ मतदारसंघात निवडणूक होत आहे. तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड अशा ११ मतदारसंघात निवडणूक होत आहे. हे दोन्ही टप्पे महाविकास आघाडी त्याचबरोबर महायुतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत.


बारामतीमध्ये पवारांची प्रतिष्ठा पणाला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच नाही तर पवार कुटुंबातसुद्धा उभी फूट पडली. याकरिता पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामती या मतदारसंघात नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार अशी लढत रंगणार आहे. या लढतीमागे शरद पवार व अजित पवार यांचे राजकीय वजन पणाला लागले आहे. त्याचप्रमाणे शिरूर आणि मावळमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने त्यांना ताकद देण्यासाठी मोदींची सभा होणार आहे. तसेच सातारा आणि सांगली हे दोन लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहेत. साताऱ्यामधून भाजपाने राज्यसभा उमेदवार उदयनराजे भोसले तर सांगलीमधून संजय काका पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. उदयनराजे भोसले हे दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कराडमध्ये सभा घेत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार हेसुद्धा साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. ते साताऱ्यातील त्यांचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. शरद पवारांची सभा ही वाई तालुक्यात होणार आहे.


भाजपा निरीक्षकांचा मतदारसंघात ठिय्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा त्याचबरोबर मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक निरीक्षकांना 5 मे पर्यंत संबंधित जिल्ह्यामध्ये मुक्कामी राहण्यास सांगितले आहे. यामध्ये रायगडचे निरीक्षक प्रवीण दरेकर, रत्नागिरी सिंधुदुर्गचे निरीक्षक रवींद्र चव्हाण, धाराशिवचे निरीक्षक डॉ. अजित गोपछडे, लातूरचे निरीक्षक प्रताप चिखलीकर, सांगलीचे निरीक्षक डॉ. भागवत कराड, बारामतीच्या निरीक्षक मेधा कुलकर्णी, माढा निरीक्षक प्रसाद लाड, सोलापूरचे निरीक्षक श्रीकांत भारतीय, कोल्हापूरचे निरीक्षक धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. नात्यातील ओलावा आटला : मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, तर बहिणीनं सुपारी देऊन भावाचा काढला 'काटा' - Nagpur Crime
  2. 'भारतीय तरुणांमधील बेरोजगारी क्षणिक' : भारतीय तरुण 'या' कामात घालवतात अधिक वेळ, आरबीआय सदस्यानं दिली माहिती - Unemployment In Indian Youth
  3. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.