ETV Bharat / state

महाराष्ट्रात आजही उष्णतेची लाट, बहुतांश शहरांमध्ये तापमानानं ओलांडली चाळीशी - heat wave maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 10:10 AM IST

Heatwave alert in Maharashtra
Heatwave alert in Maharashtra

भारतीय हवामान विभागानं 27 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत रायगड, मुंबई उपनगर आणि ठाण्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला. त्याचे परिणाम रविवारी दिसून आले. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये तापमानानं चाळीशी ओलांडली आहे.

मुंबई- रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 40 अंश सेल्सिअस ओलांडले. सोलापूर येथे तापमान 2.3 अंशांनी वाढून 43.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या पश्चिम आणि मध्य भागात उच्च तापमानाची नोंद झाली आहे.

रविवारी बहुतांश शहरात तापमानानं ओलांडली चाळिशी- कुलाबा वेधशाळेत 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 38.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली. ठाण्यात कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर (40.7), जळगाव (42.2), नाशिक (41.2), कोल्हापूर (40.2), नांदेड (42.4), पालघर (42), परभणी (42.8), सांगली (41) आणि सातारामध्ये (40.5) अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये 3.2 अंशानं तापमान वाढून 28.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले. नाशिकमध्ये तापमान 3.5 अंशानं वाढून 24.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले. सांगली येथे तापमान 3.9 अंशांनं वाढून 26.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

कोल्हापूर - आल्हाददायक वातावरण अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली आहे. रविवारी या महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदले गेलं. 41 अंश सेल्सियस तापमानामुळे कोल्हापूरकरांची अक्षरश: दैना झाली. दिवसा उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे. घरामध्ये फॅन, एसी, कुलर असूनही जीवघेण्या उष्णतेमुळे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागरिक घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या किमान तापमानातही वाढ झाली असून 24.7 इतके सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आलं. गेल्या आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र आजही कोल्हापूरच तापमान 'जैसे थे' राहणार असल्याने एप्रिल महिना कोल्हापूरसाठी सर्वाधिक उष्ण ठरत आहे.

पुण्यात आणखी तापमान वाढण्याची शक्यता- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान 40 अंशपर्यंत वाढत आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका बसत असल्यानं रस्त्यांवर कमी गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळच्या सुमारास तापमान 32 अंश असून दुपारी दोनपर्यंत 39 अंश र्यंत तापमान वाढणार असल्याची शक्यता आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक गॉगल, टोपी, रुमाल आणि स्कार्फ तसेच पाण्याचा जास्त वापर करत आहे.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना - छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींला उष्माघात होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी आरोग्य विभागानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये " उष्माघात कक्ष " सुरू केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांनी दिली आहे. उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व 53 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 10 ग्रामीण रुग्णालये, 3 उपजिल्हा रुग्णालये, 1 हेल्थयुनिट पैठण येथे उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी सर्व जनतेने यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

हेही वाचा-

  1. राज ठाकरेंनी उष्णतेच्या लाटेवरुन हवामान विभागाला झापलं; काय म्हणाले नेमकं? - Raj Thackeray on Weather Department
  2. Summer tips for skin : तुमची त्वचा आणि केस उष्णतेच्या लाटेपासून वाचवायचे असतील तर या टिप्स जरुर वापरा
  3. सूर्य ओकतोय आग! 'या' वेळेत घराबाहेर न पडण्याचा हवामान खात्याचा इशारा - Scorching Sun
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.