महाराष्ट्र

maharashtra

India vs Ireland : आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्यात बुमराहच्या नेतृत्वाची कसोटी, प्लेइंग ११ मध्ये यांना मिळू शकते संधी

By

Published : Aug 18, 2023, 3:40 PM IST

Updated : Aug 18, 2023, 3:47 PM IST

स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ११ महिन्यानंतर मैदानात सामना खेळणाराय. आजच्या सामन्यात त्याचे नेतृत्वगुण आणि तंदुरुस्ती या दोन्हीची कसोटी लागेल. (India vs Ireland t 20)

India vs Ireland
भारत विरुद्ध आयर्लंड

डब्लिन : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका आजपासून सुरू होतेय. आयर्लंडच्या मालाहाइड क्रिकेट क्लबच्या मैदानावर खेळल्या जाणार्‍या सामन्यात जसप्रीत बुमराह प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर आयर्लंड संघाचे नेतृत्व पॉल स्टर्लिंग करणार आहे. जसप्रीत बुमराहसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे, कारण तो दुखापतीनंतर तब्बल ११ महिन्यांनी मैदानावर परततोय.

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन : टी-२० मध्ये प्रथमच कर्णधारपद भूषवणारा जसप्रीत बुमराह ११ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. त्यामुळे या मालिकेत त्याच्या फिटनेससोबतच त्याच्या कर्णधारपदाचीही कसोटी लागेल. बुमाराहने यापूर्वी कसोटी सामन्यात भारतीय संघाची धुरा सांभाळली आहे. मात्र आताच्या टी-२० मालिकेत तो फिटनेस सिद्ध करण्यासोबतच आपल्या नेतृत्वाची छाप सोडण्याचाही प्रयत्न करेल.

या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा : यावेळी आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार जसप्रीत बुमराह वगळता बहुतांश खेळाडू नवीन आणि तरुण आहेत. हे सर्व खेळाडू आशिया कपपूर्वी होणाऱ्या या मालिकेत चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतील. संजू सॅमसन, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचं लक्ष आशिया कपसाठीच्या संघात स्थान मिळवणे आहे. या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केल्यास त्यांना आशिया कपमध्ये संधी मिळू शकते.

हेड टू हेड : आत्तापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता, भारतीय संघाचे आयर्लंडवर पूर्णपणे वर्चस्व राहिले आहे. भारताने आयर्लंडविरुद्ध आतापर्यंत एकूण ५ टी-२० सामने खेळलेत, ज्यापैकी सर्व सामने जिंकले आहेत. भारताने ५ पैकी ४ सामने फार मोठ्या फरकाने जिंकले आहेत.

प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळेल : आजच्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वालसह ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. यानंतर संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांचा क्रम लागतो. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूंनाही प्लेइंग 11 मध्ये चान्स आहे. त्याचवेळी गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा ही तिकडी खेळू शकते. या मालिकेद्वारे जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा आशिया कपसाठी आपली दावेदारी मजबूत करतील.

हेही वाचा :

  1. Rishabh Pant : अखेर पंत मैदानात परतला! कार अपघातानंतर प्रथमच खेळला क्रिकेट; Watch Video
  2. ICC Cricket World Cup : ताजमहालात पोहोचली वर्ल्डकप ट्रॉफी; सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Watch Video
Last Updated :Aug 18, 2023, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details