ETV Bharat / sports

Rishabh Pant : अखेर पंत मैदानात परतला! कार अपघातानंतर प्रथमच खेळला क्रिकेट; Watch Video

author img

By

Published : Aug 16, 2023, 6:48 PM IST

अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर गेल्या ८ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंत पुन्हा मैदानात परतला आहे. मैदानात परतताच पंतने आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी सुरू केली. आगामी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. (Rishabh Pant playing Video)

Rishabh Pant
ऋषभ पंत

नवी दिल्ली : क्रिकेट चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण बुधवारी आला. भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्यावर्षी अपघातात जबर जखमी झालेल्या ऋषभ पंतने पुन्हा एकदा मैदानावर पाऊल टाकले आहे.

सराव सामन्यात भाग घेतला : भारताचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने १५ ऑगस्टला एका सराव सामन्यात भाग घेतला. यावेळी त्याने किपिंग आणि बॅटिंगही केली. मैदानात उतरताच त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यावेळी उपस्थित चाहत्यांनीही त्याची टाळ्यांच्या कडकडाटात प्रशंसा केली. आगामी वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू आहे : ऋषभ पंत सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत आहे. तेथे तो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी यष्टिरक्षणासोबतच फलंदाजीचाही सराव करत आहे. अपघातानंतर आता प्रथमच तो क्रिकेटच्या मैदानात परतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. पंत फलंदाजीला आला तेव्हा मैदानावर चाहत्यांची मोठी गर्दी होती. क्रिझवर आगमन होताच त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. यावेळी ऋषभ पंतनेही लाँग ऑफच्या दिशेने त्याचा नेहमीचा ट्रेडमार्क शॉट मारला. त्याच्या या शॉटला उपस्थित चाहत्यांनी भरपूर दाद दिली.

कार अपघातात गंभीर जखमी झाला होता : ऋषभ पंत ३० डिसेंबर २०२२ रोजी दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या एका कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या शरीरावर व हातापायांवर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यानंतर त्याला ४ जानेवारी रोजी एयर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईला हलवण्यात आले. अपघातातील त्याची अवस्था पाहून आता त्याच्यासाठी क्रिकेट खेळणे कठीण होईल, असे वाटत होते. परंतु प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर तो मैदानात परतला आहे. आता लवकरच तो टीम इंडियातही पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. ICC Cricket World Cup : ताजमहालात पोहोचली वर्ल्डकप ट्रॉफी; सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Watch Video
  2. Rishabh Pant Walking Video : दुखापतीनंतर पहिल्यांदाच आधाराशिवाय चालताना दिसला ऋषभ पंत, पाहा व्हिडिओ
  3. Independence Day 2023 : 'स्वातंत्र्य दिनी' भारतीय खेळाडूंनी दिल्या देशवासीयांना शुभेच्छा, जाणून घ्या कोण काय म्हणाले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.