महाराष्ट्र

maharashtra

संजूच्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात उभारली आव्हानात्मक धावसंख्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:15 PM IST

IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्ल इथं खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं शानदार शतक झळकावलंय. त्याच्या शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं 296 धावा केल्या आहेत.

IND vs SA 3rd ODI
IND vs SA 3rd ODI

पर्ल IND vs SA 3rd ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात संजू सॅमसननं जोरदार फलंदाजी केली. पर्ल इथं खेळल्या जात असलेल्या अंतिम एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसननं दमदार शतक झळकावलं. त्याच्या पहिल्या शतकाच्या जोरावर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला आव्हानात्मक लक्ष्य देण्यात यश मिळवलंय. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं निर्धारित 50 षटकांत 8 गडी गमावून 296 धावा केल्या.

भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण :या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिथं भारतीय संघानं दमदार सुरुवात केली पण सलामीच्या फलंदाजांना मोठी खेळी खेळता आली नाही. आपला पहिलाच सामना खेळणारा रजत पाटीदार 16 चेंडूत 22 धावा करुन नांद्रे बर्गरचा बळी ठरला तर साई सुदर्शननं 16 चेंडूत 10 धावा करताना बुरेन हेंड्रिक्सला आपली विकेट दिली. भारतीय सलामी जोडी 49 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली होती.

संजू सॅमसनचं पहिलं शतक :दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन आणि के एल राहुल (21) यांनी 52 धावांची भागीदारी करुन थोडा डाव सांभाळला. मात्र राहुल बाद झाल्यानंतर संजूनं टिलक वर्मासोबत 116 धावांची भागीदारी करत भारतीय संघाला 200 धावांच्या पुढं नेलं. टिलक 52 धावा करुन बाद झाला, पण संजूनं खंबीरपणे उभं राहून 110 चेंडूत कारकिर्दीतील पहिलं एकदिवसीय शतक झळकावलं. यानंतर संजूही 114 चेंडूत 108 धावा करुन बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 3 षटकार आणि 6 चौकार मारले. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून ब्युरेन हेंड्रिक्सनं 3, नांद्रे बर्गरनं 2 बळी घेतले. तर लिझार्ड विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

भारतीय संघात दोन बदल : भारतीय कर्णधार के एल राहुलनं संघात दोन मोठे बदल केले होते. रजत पाटीदारला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तर वॉशिंग्टन सुंदरला अतिम अकरा मध्ये स्थान मिळालं. कुलदीप यादव आणि ऋतुराज गायकवाड यांना या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. भारत दक्षिण आफ्रिका निर्णायक लढतीत पाऊस बनेल का व्हिलन? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
  2. IPL 2024 Auction : ७२ खेळाडूंवर २३० कोटी रुपये खर्च! स्टार्क-कमिन्स मालामाल, स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड

ABOUT THE AUTHOR

...view details