महाराष्ट्र

maharashtra

Cricket World Cup 2023 : दुखापतग्रस्त हार्दिकला विश्वचषकातून निरोप; हा 'प्रसिद्ध' खेळाडू घेणार जागा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:35 AM IST

Cricket World Cup 2023 : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याच्याकडून उपांत्य फेरीत खेळण्याची अपेक्षा होती. पण दुखापत बरी न झाल्यामुळे तो उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

हार्दिक पंड्या विश्वचषकातून आऊट
हार्दिक पंड्या विश्वचषकातून आऊट

कोलकाता Cricket World Cup 2023 : विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीच उर्वरित स्पर्धेतून बाहेर झालाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. मात्र स्कॅननंतर पंड्या सध्या खेळण्याच्या स्थितीत नसल्याचं निश्चित झालंय. त्यामुळं त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आलाय.

उर्वरित विश्वचषकातून पंड्या बाहेर : भारतीय संघानं विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केलाय. यात अष्टपैलू हार्दिक पंड्यानं महत्त्वाची भूमिका बजावलीय. अशातच दुखापतीमुळं संघातून बाहेर गेलेला पंड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, दुखापतीमुळं हार्दिक पंड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नसल्याचं समोर आलंय. भारतीय संघ व्यवस्थापन उपांत्य फेरीसाठी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही. त्यामुळं त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आलाय.

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी : प्रसिद्ध कृष्णाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसला तरी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केलाय. त्यानं आतापर्यंत भारतीय संघाकडून 17 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 28 बळी घेतले आहेत. 12 धावांत 4 बळी ही प्रसिद्ध कृष्णाची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. देशांतर्गत क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये त्यानं अनेकदा चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळंच निवडकर्त्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय.

भारतीय संघ उपांत्य फेरीत : भारतीय संघ आधीच विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलाय. विश्वचषकातील सातव्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा 302 धावांनी दणदणीत पराभव केला होता. भारतीय संघानं यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत आणि सर्वच सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारताव्तिरिक्त उपांत्य सामन्यासाठीचे उर्वरित तीन संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत.

पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध : भारतीय संघ आतापर्यंत यंदाच्या विश्वचषकात अपराजित राहिलाय. आता संघाचा पुढील सामना रविवारी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी हेणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 ENG vs AUS : प्रतिष्ठेसाठी गतविजेते तर उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया मैदानात
  2. Delhi Air Pollution : दिल्लीतील वायू प्रदूषणाचा फटका विश्वचषकाला, बांग्लादेशनं सराव सत्र रद्द केलं
  3. Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानचा नेदरलॅंडवर शानदार विजय, उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

ABOUT THE AUTHOR

...view details