महाराष्ट्र

maharashtra

महेंद्रसिंह धोनीची '७' नंबरची जर्सी निवृत्त, यापुढे कोणत्याही भारतीय खेळाडूच्या पाठीवर दिसणार नाही ७ नंबर

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 3:51 PM IST

Dhoni Number 7 Jersey : बीसीसीआयनं महेंद्रसिंह धोनीची आयकॉनिक '७' क्रमांकाची जर्सी रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आता कोणताही भारतीय खेळाडू देशाकडून खेळताना या क्रमांकाची जर्सी घालू शकणार नाही.

Mahendra Singh Dhoni
Mahendra Singh Dhoni

नवी दिल्ली Dhoni Number 7 Jersey : महेंद्रसिंह धोनीची '७' क्रमांकाची जर्सी यापुढे कोणताही भारतीय क्रिकेटपटू घालू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या तीन वर्षांनंतर, बीसीसीआयनं धोनीची ७ क्रमांकाची जर्सी 'रिटायर' करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी असा सन्मान केवळ सचिन तेंडुलकरला मिळाला होता. बीसीसीआयनं २०१७ मध्ये सचिनची '१०' क्रमांकाची जर्सी रिटायर केली होती.

धोनीच्या खेळातील योगदानाची दखल : बीसीसीआयनं युवा खेळाडू आणि सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंना महेंद्रसिंह धोनीची ७ क्रमांकाची जर्सी निवडू नये, असं सांगितलं आहे. धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल बीसीसीआयनं त्यांचा जर्सी क्रमांक निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आता यापुढे कोणताही भारतीय खेळाडू देशाकडून खेळताना ७ क्रमांकाची जर्सी घालू शकणार नाही. मात्र आयपीएल आणि घरगुती क्रिकेटसाठी हे लागू नाही.

१ ते १०० मधील संख्या निवडण्याची परवानगी : क्रिकेट बोर्डाच्या नियमांनुसार, आयसीसी खेळाडूंना १ ते १०० मधील कोणतीही संख्या जर्सी क्रमांक म्हणून निवडण्याची परवानगी देते. सध्या, भारतीय संघातील नियमित खेळाडू आणि दावेदारांसाठी सुमारे ६० संख्या निर्दिष्ट केल्या आहेत. त्यामुळे एखादा खेळाडू जवळपास वर्षभर संघाबाहेर असला तरी त्याचा नंबर कोणत्याही नव्या खेळाडूला दिला जात नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, नुकतेच पदार्पण केलेल्या खेळाडूकडे निवडण्यासाठी सुमारे ३० क्रमांक आहेत.

त्यामुळे जर्सी निवृत्त करण्याची परंपरा सुरू झाली : २०१७ मध्ये मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर १० नंबर परिधान करून मैदानात उतरला होता. तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं. सचिनच्या जर्सीमध्ये इतर कोणत्याच खेळाडूला पाहू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयनं याची दखल घेत, १० क्रमांकाची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतला होता.

हे वाचलंत का :

  1. अंडर १९ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या कोण आहे कर्णधार
  2. अबब! बीसीसीआयकडे किती ही संपत्ती, इतर देश आसपासही नाहीत; जाणून घ्या टॉप १० लिस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details