महाराष्ट्र

maharashtra

सचिन खेडेकर, ललित प्रभाकर, उमेश कामतसह गौतमी देशपांडे सांगताहेत पुस्तकं ‘ऐकायला’!

By

Published : Oct 22, 2021, 11:02 PM IST

हल्ली पुस्तकं वाचण्यापेक्षा ‘ऐकण्यामध्ये’ अनेकांना स्वारस्य आहे. त्यामुळेच ऑडिओ बुक्स अस्तित्वात आली आहेत. यात स्टोरीटेल ही संस्था अग्रणी असून त्यांनी मराठीमध्ये देखील ऑडिओ बुक्स प्रसिद्ध केली असून अनेक नावाजलेल्या लोकांच्या आवाजात कथा ध्वनीमुद्रित केल्या आहेत, ज्या ‘वाचकांना’ आवडतही आहेत.

सचिन खेडेकर, ललित प्रभाकर, उमेश कामतसह गौतमी देशपांडे सांगताहेत पुस्तकं ‘ऐकायला’
सचिन खेडेकर, ललित प्रभाकर, उमेश कामतसह गौतमी देशपांडे सांगताहेत पुस्तकं ‘ऐकायला’

‘वाचाल तर वाचाल’ असे नेमहीच म्हटले जाते. परंतु इंटरनेट च्या जमान्यातील तरुणाई पुस्तकं वाचण्यात कमी पडते असे निदर्शनास येते. परंतु हल्ली पुस्तकं वाचण्यापेक्षा ‘ऐकण्यामध्ये’ अनेकांना स्वारस्य आहे. त्यामुळेच ऑडिओ बुक्स अस्तित्वात आली आहेत. यात स्टोरीटेल ही संस्था अग्रणी असून त्यांनी मराठीमध्ये देखील ऑडिओ बुक्स प्रसिद्ध केली असून अनेक नावाजलेल्या लोकांच्या आवाजात कथा ध्वनीमुद्रित केल्या आहेत, ज्या ‘वाचकांना’ आवडतही आहेत. यावर सचिन खेडेकर, ललित प्रभाकर, उमेश कामत, आस्ताद काळे, गीतांजली कुलकर्णी, गौतमी देशपांडे आदी कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या असून ऑडिओ बुक्सचे फायदे देखील नमूद केले आहेत.

अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले की, ‘मी जी स्टोरीटेलसाठी पुस्तकं वाचली आहेत ती मला मनापासून आवडली आहेत म्हणूनच मी ती वाचली आहेत. ऑडिओबुक्स ऐकण्यातून आपला छंदही जोपासला जाऊन लोकांना चांगलं ऐकण्याची सवयही लागेल असे मला वाटते. पुस्तकं संस्कृती जतन करण्यासाठी 'ऑडिओ बुक' हा उत्तम पर्याय आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे म्हणून खरंतर मी हे केलं, मी काही व्हाईस आर्टिस्ट नाही, पण मला ती ऑडिओबुक्सची एकूण कल्पनाच आवडली. आता वाचन संस्कृती कमी होतेय, वाचकांना चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, किंवा वेळ मिळत नाही हे जे कारण आहे त्याला ऑडिओबुक्स हा उत्तम पर्याय आहे म्हणून खरंतर हे करावंसं वाटलं. मला नट म्हणून किंवा मराठी भाषेचा भक्त म्हणून ते करायला आवडतं. मला एका बाजून असंही वाटतं की हा माझ्यादृष्टीने भाषा टिकविण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, आपली पुस्तकं टिकवण्याचा ऑडिओबुक्स हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतं.’

अभिनेता आस्ताद काळे म्हणाला की, ‘मला डबिंग या क्षेत्रात काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. नशिबाने स्टोरीटेल हा चांगला प्लॅटफॉर्म आर्टिस्ट्ससाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही नट असलात तरी ह्या माध्यमात तुमचा चेहरा किंवा अभिनय दिसणार नाही, फक्त वाचिक अभिनयावर सगळं निभावून न्यायाचे आहे, हे चॅलेंज मला स्वतःहून स्वीकारायचं होत आणि ही संधी स्टोरीटेलने दिल्याने खरंतर मी खूप खुश झालो आहे. मी ऑडिओ बुक करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. मला ऑडिओ बुक करायला खूप मजा आली कारण जवळ जवळ सात आठ पात्र वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एकमेकांशी बोलताहेत, एकाचवेळी चारपाच लोक बोलताहेत, या सगळ्या प्रकारे आवाज मॉड्युलेट करणं, प्रत्येकाचा लहेजा, पीच, वाणी वेगळी असणं हे सगळं मॅनेज करीत हे करण्याचा अनुभव खूपच मजेदार आणि चॅलेंजिंग अनुभव होता. माझ्या पिढीच्या आणि कामासाठी सतत प्रवास करणाऱ्यांना आपली वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्समुळे पूर्ण करता येते. वाचनाचा अखंड आनंद ऐकण्यातून मिळविण्याची संधी ऑडिओबुक्स देतात. अनेकांची वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्स मुळे पूर्ण करता येते.’

अभिनेत्री गीतांजली कुलकर्णीने मत व्यक्त करताना म्हटले की, ‘ ऑडिओबुक ध्वनिमुद्रणाचा अनुभव अर्थातच खूप मजेशीर होता कारण तुम्ही एका बंद स्टुडिओत असता, पण तुम्हाला ती सगळी जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला क्रिएट करायची असते. त्यात जो थरार असेल, भीती असेल, प्रेम प्रसंग असेल, जे काही भाव आहेत ते सगळे त्या स्टुडिओच्या आत फक्त माईक आणि तुम्ही आणि तुमची जी संहिता असते त्याच्या मार्फत तयार करायचे असते. त्यामुळे मला फार मजा येते. आवाज आणि त्याचा वापर आणि गोष्ट सांगणे हे मला एक अभिनेत्री म्हणून खूप चॅलेंजिंग वाटते. ऑडिओबुक्स हे नुसतं एकच माध्यम असं आहे ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण वातावरण, पात्र उभं करायचं असतं. गोष्ट सांगणं ही अगदी मूलभूत कला आहे, अभिनेता-अभिनेत्री म्हणून त्यात तुमचा हातखंडा असणं फार गरजेचं असतं. मला अनेकदा असे वाटते की आपण जेव्हा ते करीत असतो, आपणच आपल्याला ऐकत असतो, आणि आपल्याला सुधारत असतो आणि ते अगदी मेडिटेटिंग आहे. अनेकदा आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला वाचायला मिळत नाही. आपण गाडी चालवीत असताना, प्रवास करताना, स्वयंपाक करीत असताना, घरातील कामं करत असताना आपण वाचू शकत नसलो तरी ऐकू शकतो आणि त्यामुळे ही खूप चांगली संधी असते. अगदी नावाजलेल्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांपासून ते अगदी नव्या दमाच्या होतकरू लेखकांनी लिहिलेली मालिकांपर्यंत अगदी इरॉटिका पासून ते थरारचित्त गोष्टी, सस्पेन्स हे सगळं ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर आहे. ज्यांची जी आवड आहे, त्यांच्यासाठी तिथं सर्व उपलब्ध असल्याने तुम्ही इतर तुमच्या कामात व्यस्त असता तेव्हा इअर फोन लाऊन ऐकू शकता आणि आसपासच्या लोकांना कळणार नाही. हे उत्तम साधन आहे मनोरंजन आणि ज्ञानाचेही असे मला वाटते आहे.

स्टोरीटेल मराठी पब्लिशिंग चे प्रसाद मिरासदार म्हणाले की, ‘स्टोरीटेलने गेल्या चार वर्षांपासून मराठी ऑडिओबुक्स क्षेत्रात एक नवी क्रांती आणली आहे. दोन हजारहून अधिक मराठी ऑडिओबुक्स, त्यातील शंभरहून अधिक लोकप्रिय आणि अभिजात पुस्तके प्रकाशित केली आहेत. यातील अनेक ऑडिओबुक्स पन्नास हून अधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या आवाजात रेकॉर्ड करणे हा एक विक्रमच आहे. या सर्वांमुळे मराठीत ऑडिओबुक्स प्रकाशन व्यवसाय रूजतो आहे आणि दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक मराठी कलावंत उत्तम पुस्तके वाचायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.’

ऑडिओबुक्स हे प्रेक्षकांना इनव्हॉल्व करणारं माध्यम

अभिनेता ललित प्रभाकर म्हणाला की, ‘ऑडिओ बुक्समध्ये एकच गोष्ट मी जेव्हा बोलतो, साकारतो किंवा प्रेझेन्ट करतो तेव्हा ती ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत वेगवेळी पोहचते आणि दिसते, मला वाटतं कि हि खूपच कमाल गोष्ट आहे स्टोरीटेल या ऍपची आणि त्यासाठीच मी खूप उत्सक होतो. मला असं वाटतं कि अभिनेता म्हणून मला माझा रियाझ करण्यासाठी आणि लर्न करण्यासाठी अश्या काही गोष्टी करत राहणं खूप गरजेचं असतं. मला एकाच वेळी आठ दहा कॅरेकटर्स प्ले करायचे होते आणि त्यातून माझं कॅरेक्टर वेगळं, शिवाय गोष्टही कळली पाहिजे असं सगळं करायचं होतं. हे सगळं आम्हाला चित्रपट - मालिकेत काम करताना करायची सवय नसते, आम्ही काम करताना एकच कॅरेक्टर करीत असतो. मात्र इथे हे सगळं करताना कलाकार म्हणून अधिक कस लागते, तुम्हाला थोडं पुश करावं लागतं स्वतःला. एकतर पूर्णपणे नवीन माध्यम. इथे फक्त तुम्ही ऐकू शकता आणि त्या ऐकण्यातूनच तुम्हाला तुमची गोष्ट इमॅजिन करायची असते. मला वाटते की ऑडिओ बुक्स हे खूप पॉवरफूल माध्यम आहे, जे प्रेक्षकांनाही चॅलेंज करतं, इन्व्हॉल करून घेतं. कारण त्यांना त्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात, नुसत्या ऐकून गोष्टी सोडून चालत नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या इमॅजीननुसार बघू शकते.’

ऑडिओबुक नेस्ट जनरेशनचं अपरिहार्य गॅजेट!

अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणाले की, ‘मी फार पूर्वी कॉलेजमध्ये असताना नाट्यवाचन स्पर्धा केल्या आहेत पण कधी प्रोफेशनल ऑडिओबुक साठी काम केले नव्हते. मला खूप दिवसांपासून ऑडिओबुकसाठी काम करण्याची इच्छा होती, आणि मला जेव्हा विचारलं तेव्हा ती कथाही तशी नवीन होती, खूप छान आणि गोड होती त्यामुळे मी ती वाचण्यासाठी खूप उत्सुक होते. हा माझ्यासाठी पहिला आणि छान अनुभव होता. पण खूप बरं वाटलं, कम्पलीटली नाट्यरूपात ते छान रेकॉर्ड झालं आहे. मी आणि ललितने ते केलं आहे. खूप मजा आली ते करताना आणि खूप छान अनुभव होता. अशी अनेक ऑडिओबुक्स प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची खरंच इच्छा आहे. लोकांनी या ऑडिओबुक्सचा आनंद घ्यावा कारण आताच्या काळातली सुंदर कथा आहे. प्रत्येक बेस्ट फ्रेंड मुलगा, मुलगी की कथा ऐकताना स्वतःला रिलेट करू शकेल.’

अभिनेता उमेश कामत म्हणाला की, ‘ऑडिओबुक रेकॉर्ड करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, कारण माझा पहिला अनुभवच खूप विलक्षण होता. मी माझा पहिला ऑडिओ ड्रामा ६१ मिनिट्स रेकॉर्ड केला त्याचा रिस्पॉन्स आणि एकंदर त्याच्या रेकॉर्डिंग प्रोसेस मजेदार होती. जेव्हा माझ्याकडे ६१ मिनिटांची ही ऑडिओ कथा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा मी खूपच एक्ससाईट, खूप पॉझिटिव्ह होतो. एकतर मला ती गोष्ट फार आवडली होती. मला सस्पेन्स आणि थ्रिल्लर गोष्टी फार आवडतात तश्याच रोमँटिक गोष्टीही आवडतात. त्यातलीच ही एक आयटी क्राईमच्या संदर्भातील गोष्ट स्टोरीटेल मराठी कडून विचारण्यात आली आणि ती मी वाचल्यानंतर मजा आली. मला जसं वाचताना पुढे काय पुढे काय होणार याची उत्सुकता होती, तीच उत्सुकता रेकॉर्डिंग करतानाही होती. सर्वच कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग होती. हा माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता. मी स्वतः रेकॉर्ड करताना त्या व्यक्तिरेखा खूप एन्जॉय केल्या आणि मला असं वाटतंय गोष्ट इतकी इंटरेस्टिंग झाली आहे कि ती लोकांना नक्की ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतंय सध्याच्या काळात आपलं ट्रॅव्हलिंग टायमिंग इतकं असतं, प्रत्येक वेळेला टिव्ही पाहणं किंवा सध्याच्या काळात चित्रपट, नाट्यगृहे बंद आहेत त्यामुळे स्टोरीटेल जी ऑडिओबुक्स तयार करताहेत ती मराठी रसिकांसाठी एक पर्वणी आहे असे मला वाटते आहे. सगळ्या प्रकारच्या कथा, लघुकथा, कादंबऱ्या, ऑडिओ सिरीज अश्या मुबलक ऑडिओबुक्सचा खजिना आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा.’

हेही वाचा - ...अखेर सीआयएसएफने मागितली सुधा चंद्रन यांची माफी

ABOUT THE AUTHOR

...view details