महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत जन्मलेला बिग बॉस १३ विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची कारकिर्द

By

Published : Sep 2, 2021, 1:28 PM IST

Updated : Sep 2, 2021, 2:05 PM IST

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे वयाच्या ४० व्या वर्षी अकाली निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई आणि २ बहिणी आणि इतर कुटुंबीय आहे.

Sidharth Shukla
सिद्धार्थ शुक्ला

मुंबई - गेल्या वर्षीपासून मनोरंजनसृष्टीतील अनेक तारे निखळताना दिसत आले आहे. आज पहाटे टेलिव्हिजन, चित्रपट, वेब दुनियेतील मोठे नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे अकाली निधन झाले आहे. त्याच्या निधनाची अधिकृत घोषणा नुकतीच कूपर हॉस्पिटलने केली असून त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले आहे. संपूर्ण माहिती अजून बाहेर यायची असून सध्या अधिकृतपणे पोस्टमॉर्टेमची प्रक्रिया सुरु आहे. फक्त वयाच्या ४० व्या वर्षी त्याचे निधन झाल्यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा झटका बसला आहे.

अभिनेता रवि किशन
सिद्धार्थ शुक्ला हे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रातील खूप मोठे नाव होते. त्याने ‘वर्ल्डस बेस्ट मॉडेल’ चा किताब मिळविला होता. ज्यात फायनलमध्ये जगभरातून ४० मॉडेल्स होते. अत्यंत देखणा आणि उत्तर शरीरयष्टी बाळगणारा सिद्धार्थ शुक्ला मनोरंजनसृष्टीत आला नसता, तर नवल वाटले असते. त्याने २००८ साली ‘बाबूल का आंगन छुटे ना’ या मालिकेत मुख्य भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ‘बालिका वधू’, ‘दिल से दिल तक’ सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याने अनेक रियालिटी शोजमध्येसुद्धा भाग घेतला होता आणि त्या सगळ्याच कार्यक्रमाचा तो विजेता ठरला होता. खतरों के खिलाडी, फियर फॅक्टर, बिग बॉस सारख्या अत्यंत पॉप्युलर शोज मध्येदेखील सिद्धार्थ विजेता बनला होता.
प्रसिद्धी मिळूनही जमिनीवर पाय असलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला.
सिद्धार्थ शुक्लाचे टॅलेंट, लूक्स आणि पॉप्युलॅरीटी हेरत दिग्दर्शक करण जोहर याने त्याला ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटामध्ये ब्रेक दिला होता. त्याच्या या पदार्पणाची सर्व स्तरावरून स्तुती झाली होती. छोटा पडदा, मोठे पडदा गाजविल्यानंतर सिद्धार्थने नुकतेच वेब विश्वात ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ मधून पदार्पण केले होते. त्या शोला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सिद्धार्थ शुक्ला हे मनोरंजनसृष्टीत मोठे नाव होतेच. परंतु बिग बॉस १३ चे विजेतेपद मिळविल्यानंतर सिद्धार्थला अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स बद्दल, जवळपास रोजच, विचारणा होत होती. महत्वाचं म्हणजे आजदेखील त्याचे एक शूट होते.


१२ डिसेंबर १९८० रोजी जन्मलेल्या सिद्धार्थचे बालपण मुंबई सेंट्रल येथील रिझर्व्ह बँक कॉलोनीत गेले. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड तर होतीच परंतु तो एका उत्तम खेळाडू होता आणि क्रिकेट मॅचेसमध्ये आपले अष्टपैलू योगदान देत मॅचेस जिंकून द्यायचा. इथे खास नमूद करावेसे वाटते, की अमाप प्रसिद्धी मिळाल्यानंतरही आपल्या लहानपणीच्या सवंगड्यांना तो आवर्जून भेटत असे, अगदी पूर्वीच्या सिद्धार्थ सारखा. थोडक्यात त्याचे पाय नेहमी जमिनीवर असायचे.

सिद्धार्थ शुक्ला त्याच्या अप्रतिम शरीरयष्टीबद्दल प्रसिद्ध होता. फिटनेस फ्रिक म्हणून तो ओळखला जायचा. त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना तो फिटनेस बाबत जागरूक करीत असे आणि शरीरावर मेहनत करण्यासाठी उद्युक्त करीत असे. बिग बॉसमध्ये तो खूप रागीट असल्याचे दिसले होते. परंतु खऱ्या जीवनात तो अत्यंत मृदुभाषी होता आणि आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना हसवत ठेवायचा. अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेल्या सिद्धार्थच्या प्रेमात बऱ्याच अभिनेत्री पडल्या होत्या. बिग बॉसची त्याची सहसदस्य पंजाबी अभिनेत्री आणि गायिका शेहनाज गिल सुद्धा अपवाद नव्हती. तो शो संपल्यावर सिद्धार्थने तिला मुंबईत खूप मदत केली आणि सोशल मीडियावर तिची बाजू घेत ट्रॉलर्सना खडे बोल सुनावत असे. अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व, कमालीचा हँडसम, उत्तम शरीरसौष्ठव, विनोदी स्वभाव आणि अमाप प्रसिद्धी मिळूनही जमिनीवर पाय असलेला असे कॉम्बिनेशन विरळाच. सिद्धार्थच्या कुटुंबीयांच्या दुःखात ईटीव्ही भारत मराठी सहभागी आहे.

हेही वाचा -सिद्धार्थ शुक्लाची 'आदिपुरुष'मध्ये वर्णी? स्वतःचा केला खुलासा...

Last Updated : Sep 2, 2021, 2:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details