महाराष्ट्र

maharashtra

चित्रपट फ्लॉपची जबाबदारी माझी तर हिटचं श्रेय टीमला जातं : सलमान खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 2:41 PM IST

Salman Khan exclusive interview : चित्रपट रिलीज झाल्यानंतर तो प्रेक्षकांचा होतो. चित्रपट बरा नसेल तर प्रेक्षक त्याला नाकारतात. स्टार म्हणून मी रिलीजच्या दोन तीन दिवसात प्रेक्षकांना आणू शकतो. पण तिसऱ्या दिवसापासून ते येत राहिले तर याचं संपूर्ण श्रेय लेखक, दिग्दर्शकांचं असतं. चित्रपट जर फ्लॉप झाला तर ती जबाबदारी माझी असते आणि हिट झाला तर त्याचं श्रेय टीमचं असतं, असे सलमान खान म्हणाला. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीशी त्यानं दिलेली सविस्तर मुलाखत इथे वाचा.

Salman Khan exclusive interview
सलमान खान

मुंबई- Salman Khan exclusive interview : 'मैने प्यार किया' पासून सलमान खानचा नायक म्हणून सुरू असलेला प्रवास तीन दशकांनंतरही जोमात सुरु आहे. या दिवाळीत त्याचा 'टायगर ३' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो बॉक्स ऑफिसवरही दणदणीत यश मिळवत आहे. यशराज फिल्म्सने आता त्यांचा स्वतःचा स्पाय युनिव्हर्स सुरु केला असला तरी 'टायगर' हा त्या सिरीजमधील पहिला चित्रपट होता. त्यानंतर हृतिक, शाहरुख, टायगर श्रॉफ यांनी या शृंखलेतील चित्रपट केले. सलमाननंही 'टायगर २' आणि 'टायगर ३' हे सिनेमे दिले. महत्वाचे म्हणजे स्पाय युनिव्हर्स मधील सर्व आणि टायगर शृंखलेतीलही सर्व चित्रपट तुफान चालले. भले सलमान अभिनित काही इतर चित्रपट फ्लॉप झाले तरीही आजही सलमान खानच्या स्टारडम मध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. चित्रपटाचं भवितव्य काहीही असले तरी पुढील चित्रपटासाठी जास्त मेहनत करायला तो तयार असतो. 'टायगर ३' ला मिळालेले यश आणि निर्माता म्हणून एसकेएफची निर्मिती असलेल्या 'फर्रे' ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी सलमान खानशी संवाद साधला त्यातील काही अंश.

सलमान खान



सर्वप्रथम 'टायगर '३ ला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन. तसेच तुमची निर्मिती असलेल्या
'फर्रे' ची चर्चा आहे. तुम्ही यशापयशाकडे कसे बघता?

धन्यवाद. खरं सांगायचं तर यशापयशाचा मी फारसा विचार करीत नाही. चित्रपट तयार होईस्तोवर मी त्याचा विचार करीत असतो. एकदा का चित्रपट तयार झाला की त्याची जबाबदारी प्रेक्षकांवर असते. अर्थात चित्रपट चांगला झाला नसेल तर त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत नाही. अशा फ्लॉप चित्रपटाची जबाबदारी सर्वस्वी मी स्वीकारतो. जर चित्रपट आर्थिक दृष्ट्या चालला तर त्याचे श्रेय संपूर्ण टीमचे असते. एक स्टार म्हणून प्रेक्षकांना मी थिएटरमध्ये पहिल्या शुक्रवार, शनिवार, रविवारी आणू शकतो परंतु सोमवारी त्याचे खरे भवितव्य ठरत असते. जेव्हा चित्रपट सोमवारच्या नंतर गर्दी खेचतो त्याचे संपूर्ण श्रेय लेखक आणि दिग्दर्शकाला तसेच डीओपी आणि इतर टीमला जाते. फ्लॉप्स मधून शिकायला मिळते आणि पुढील चित्रपटाबद्दल फॅन्सची तक्रार असू नये यावर विचार करून तो अमलात आणतो.

सलमान खान

'टायगर' बद्दल बोलायचे झाले तर पहिल्या भागाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. त्याने एक उत्तम चित्रपट बनवला होता. त्याला मिळालेल्या यशामुळेच पुढच्या भागाबद्दल विचार झाला. त्यातील माझ्या आणि कतरीनाच्या भूमिकांना अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. दुसरा भाग म्हणजेच 'टायगर जिंदा है' याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर ने केले होते. त्याने 'टायगर'चा हा सिक्वेल अजून वरच्या लेव्हलला नेला. यातही टायगर झोयाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. आता मनीष शर्माने 'टायगर ३' मध्ये भारतीय टायगर आणि पाकिस्तानी झोयाच्या रिलेशनशिपला नवीन आयाम दिला. त्यांच्या सांसारिक गोष्टी आणि त्यांची कामाप्रतीची निष्ठा अत्यंत समर्पकपणे आणि संयतपणे प्रेक्षकासमोर मांडल्या आणि ते प्रेक्षकांना खूप भावले. किंबहुना वैवाहिक जीवनात त्यांच्यासारखी केमिस्ट्री असावी असे वाटणारे अनेक आहेत.

सलमान खान आणि कतरिना कैफ

सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांच्या चित्रपटांत पाहुणे कलाकार म्हणून दिसतात. तुमच्या या मैत्रीबद्दल सांगा.

मी आणि शाहरुख खान खूप चांगले मित्र आहोत. आम्ही आधीही एकमेकांच्या चित्रपटांत काम केले आहे, एकत्र दोन हिरो चित्रपटांत काम केले आहे. आमचा 'करण अर्जुन' आजही लोकांच्या स्मरणात आहे. आमच्या पडद्यावरील केमिस्ट्री पेक्षाही खाजगी आयुष्यातील बॉण्डिंग जास्त घट्ट आहे. किंबहुना 'पठाण' मधील शेवटाला असलेले आमचे संवाद आजच्या नायक मंडळींबाबत बरंच काही बोलून जातात. आजचे हिरो दोन अथवा तीन हिरोज चे चित्रपट करण्यास नाखूष असतात. मी तर सुरुवातीपासूनच अनेक मल्टीस्टार सिनेमे केले आहेत. आम्हा त्यावेळच्या अभिनेत्यांमध्ये इंसेक्युरिटीची भावना कधीच नव्हती. आताची नायक पिढी कदाचित असे चित्रपट करायला घाबरत असेल. त्यांनी थोडी मॅच्युरिटी दाखवत २ वा ३ हिरो सिनेमे करायला हवेत. जेव्हा एकापेक्षा जास्त हिरो एका सिनेमात काम करतात तेव्हा त्यांचे सामूहिक फॅन फॉलोईंग चित्रपट बघते ज्याचा सर्वांनाच फायदा होतो. शाहरुख व्यतिरिक्त माझे संजू (संजय दत्त) सोबत चांगले बॉण्डिंग आहे. आम्ही लांबूनही केवळ नजरेतून संवाद साधू शकतो.

सलमान खान भाची एलिझेसोबत



तुमची भाची एलिझेच्या 'फर्रे' ची निर्मिती तुमची आहे. तिच्यासाठीच हा चित्रपट बनवला?

नाही. नाही. पहिल्यांदा आमच्याकडे याची स्क्रिप्ट आली. आम्हाला ती आवडली आणि चित्रपट बनवायचा विचार पक्का झाला. ही आजच्या तरुणाईची कहाणी असल्यामुळे कलाकारांचा शोध सुरु झाला. बऱ्याच दिवसांनी आम्हाला वाटले की यात एलिझेला कास्ट करू शकतो. परंतु ती तयार नव्हती. तिला वेगळ्या सिनेमातून पदार्पण करायचे होते. आम्ही सर्वांनी तिला कन्व्हिन्स केले आणि ती तयार झाली. त्यानंतर तिने यातील भूमिकेवर खूप मेहनत घेतली. ती ठराविक साच्यात बसणारी अभिनेत्री नाहीये त्यामुळे तिचे वेगळेपण उठून दिसते.



ती माझी भाची किंवा आमच्या घरातील मुलगी आहे म्हणून सांगत नाही. ती एक सेक्युअर्ड कलाकार आहे. आता हेच बघाना, जेव्हा तिचे फोटोशूट करण्याचे ठरले तेव्हा ती म्हणाली की माझ्या एकटीचे नको, तर इतर तिघांचेही फोटोशूट व्हायला हवे. तसेच पोस्टरवर ती फ्रंट ला असेल असे कळल्यावर ती म्हणाली की चारही कलाकार एकत्रितपणे पोस्टरवर असायला हवेत. ती जेव्हा बिग बॉसच्या मंचावर आली तेव्हादेखील ती त्या सर्वांना घेऊन आली होती. तिचे म्हणणे हे होते की चारही जणांच्या प्रमुख भूमिका आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सर्वजण असायला हवेत. इतकी एलिझे सेक्युअर्ड आहे. इतका सेक्युअर्ड मी देखील माझ्या पहिल्या चित्रपटावेळी होतो. (हसतो)



'टायगर ४ 'बद्दल काय सांगाल?

टायगर झोयाची जोडी प्रेक्षकांना आवडतेय त्यामुळे चौथा भाग करायला आवडेल. परंतु तिसरा भाग आताच आला आहे त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे. अर्थात अजून त्याबद्दल कोणतीही तयारी सुरु झालेली नाहीये, त्यामुळे कथानक काय असेल, दिग्दर्शक कोण असेल याची मला काहीच कल्पना नाही. जेव्हा ठरेल तेव्हा नक्की कळवू.


हेही वाचा -

1. रणबीर कपूरची पत्नी म्हटल्यानंतर आलिया भट्टचे चाहते पापाराझीवर भडकले

2.उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवल्याबद्दल सेलिब्रिटींनी बचाव पथकाचे मानले आभार

3.बिग बॉसचं घर पुन्हा बनलं रणांगण, एकमेकांना खाली खेचण्यात स्पर्धक गर्क

ABOUT THE AUTHOR

...view details