महाराष्ट्र

maharashtra

तीन वर्षाच्या मुलीसह जीव मुठीत घेऊन धावणाऱ्या बापाची गोष्ट : 'जोराम'चा ट्रेलर लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 7:04 PM IST

मनोज बाजपेयी आणि मोहम्मद झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'जोराम' चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. तीन वर्षाच्या मुलीला घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या बापाची भूमिका यात मनोजनं साकारली आहे. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

Joram trailer
'जोराम'चा ट्रेलर लॉन्च

मुंबई - आपल्या अभिनय प्रतिभेच्या जोरावर करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मनोज बाजपेयींचा नवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'जोराम' या आगामी चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. देवाशिष माखिजा द्वारे दिग्दर्शित आणि लिखीत या चित्रपटात मनोज बाजपेयीच्या अभिनय कौशल्याची अप्रतिम झलक पाहायला मिळतेय. जीव घेण्यासाठी मागे लागलेल्या अधिकाऱ्यांचा ससेमिरा चुकवत आपल्या तीन महिन्याच्या मुलीचे रक्षण करणाऱ्या बापाची भूमिका यात मनोजनं साकारली आहे.

दीड मिनिटांच्या 'जोराम'च्या ट्रेलरमध्ये दासरू आपल्या मुलीला घेऊन त्याच्या गावाच्या बदललेल्या जागेतून कायद्याच्या अंमलबजावणीपासून पळून निसटून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे घडत असताना तो आपला जीव धोक्यात घालतो. या चित्रपटात झीशान अय्युब पोलिस अधिकारी रत्नाकरची भूमिका साकारताना दिसत आहे. तो मनोज बाजपेयी साकारत असलेल्या दासरु या पात्राचा अथक पाठलाग करत आहे, त्याला पकडण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे.

या चित्रपटाची कथा दासरूभोवती फिरत असल्याचे दिसते. एक माजी माओवादी असलेला एक व्यक्ती आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करतो. आपला भूतकाळ टाळून त्यानं आपल्या मुलीचे चांगले भविष्य सुरक्षित करण्याचा निर्धार केला आहे. 'जोराम' चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये अनेक हृदयस्पर्शी प्रसंग घडताना दिसतात. एका वेगळ्या विषयावरील हा चित्रपट मनोज बाजपेयीच्या अभिनयामुळे खूपच वास्तववादी झाल्याचं ट्रेलवरुन दिसतंय.

झारखंड राज्याची पार्श्वभूमीवर चित्रपटाचं कथानक घडताना दिसतं. हा चित्रपट सामाजिक विषमता, आदिवासी समुहावरील अन्याय आणि पर्यावरणाचा ऱ्हास या विषयांवर चर्चा करतो. मनोज बाजपेयी आणि झीशान अय्युब यांच्यासह या चित्रपटात मराठमोळी प्रतिभावान अभिनेत्री स्मिता तांबेचीही प्रमुख भूमिका आहे. झी स्टुडिओज आणि माखिजा फिल्म यांच्या संयुक्त निर्मितीतून तयार झालेला 'जोराम' हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी जगभरात मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'चूक करण मानवी, क्षमा करणं दैवी' म्हणत, त्रिशा कृष्णननं मन्सूर अलीला केलं माफ

2.'त्रिशा, प्लिज मला माफ कर', म्हणत मन्सूर अली खाननं मागितली माफी

3.अर्जुन रेड्डीचा बचाव करणाऱ्या रश्मिका मंदान्नावर 'प्रेमात आंधळी' झाल्याची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details