महाराष्ट्र

maharashtra

Corona Third Wave : फेब्रुवारी शेवटी किंवा मार्च सुरुवातीला तिसरी लाट ओसरेल - डॉ. प्रदीप आवटे

By

Published : Jan 13, 2022, 10:30 PM IST

Updated : Jan 13, 2022, 10:46 PM IST

राज्यात डिसेंबर शेवटच्या आठवड्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात (Third Wave) झाली आहे. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही लाट पिकपर्यंत पोहचेल आणि त्यानंतर ती हळूहळू ओसरायला सुरुवात होईल. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला तिसरी लाट ओसरेल, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradip Awate) यांनी दिली आहे.

Dr. Pradip Awate
डॉ. प्रदीप आवटे

पुणे -राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ (Omicron Cases) होताना दिसत आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागणार (Lockdown) की अजून कडक निर्बंध लावण्यात येणार अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. राज्यात डिसेंबर शेवटच्या आठवड्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात (Third Wave) झाली आहे. तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही लाट पिकपर्यंत पोहचेल आणि त्यांनंतर ती हळूहळू ओसरायला सुरुवात होईल. फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला तिसरी लाट ओसरेल, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradip Awate) यांनी दिली आहे.

प्रतिनिधींनी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासोबत साधलेला संवाद
  • जानेवारीच्या शेवटी तिसऱ्या लाटेच्या पिक पॉईंटला होणार सुरुवात -

ई टीव्ही भारतशी बोलताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, राज्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णवाढ होताना दिसून येत आहे. सुरुवातीला ही वाढ मुंबई, ठाणे या शहरांमध्ये झालेली पाहायला मिळाली आणि नंतर पुणे आणि आता नाशिक, अहमदनगर अशा ठिकाणी ही वाढ होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेबाबत दोन आधारांद्वारे माहिती घेतली. पहिली पद्धत गणितीय भाषा आणि दुसरी पद्धत म्हणजे जगभरात ओमायक्रॉनच्या ज्या देशात लाटा आल्या त्या देशांमध्ये काय घडलं. या दोन्हींच्या आधारे जर बोलायचं झालं तर, जगभरातील ज्या देशांमध्ये ओमायक्रॉनची लाट आली आहे याचा अभ्यास केला तर त्यात एक लक्षात येतं की पहिले चार ते पाच आठवडे रुग्ण हे वाढत गेले आणि त्यानंतर ते कमीकमी होत गेले आणि तसेच आपल्याकडे होणार आहे. सध्या राज्याचा पॉझिटिव्ह रेट हा 30 टक्क्यांच्या पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता या पॉझिटिव्ह रेटमुळे लक्षात येत आहे की, ही लाट आपल्या पिकच्या दिशेने पुढे सरकत आहे. त्यानंतर ती हळूहळू ओसरायला सुरुवात होईल.

  • स्थानिक परिस्थितीचा देखील लाटेवर होणार परिणाम -

त्या ठिकाणची जी स्थानिक परिस्थिती असते त्याचा देखील लाटेवर परिणाम होत असतो. लाटेची सुरुवात ही जर मुंबई आणि ठाणे येथून झाली आहे तर पहिली रुग्णसंख्या ही मुंबई आणि ठाण्यात कमी होईल. परंतु या ठिकाणी ही रुग्णसंख्या कमी होत असताना ती लाट हळूहळू ग्रामीण भागाकडे सरकेल. राज्याच्या एका बाजूला रुग्णसंख्या कमी होत असताना मात्र दुसऱ्या भागात ती वाढताना देखील दिसेल. प्रत्येक भौगोलिक भागाचा एक कर्व्ह असतो आणि ही लाट त्यागतीने पुढे जाईल, असे देखील यावेळी आवटे म्हणाले.

  • नागरिकांनी पंचसूत्रीचे पालन करणे गरजेचे -

सध्याची परिस्थिती पाहता जरी तिसरी लाट ही सौम्य असली तरी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. पंचसूत्रींचे पालन केले पाहिजे. आपल्याला अनेकदा असे वाटते की लसीकरण हे एकमेव उपाय आहे, तर तस नाही. लसीकरण हे रामबाण उपाय नाही. लसीकरण हा एक धागा आहे. बाकीचे जे चार उपाय आहेत ते देखील खूप महत्त्वाचे आहेत .मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टनसिंग आणि हात धुणे या चार बाबींचे पालन केले पाहिजे. याचे पालन आपण केले तर आपल्याला तिसऱ्या लाटेला तोंड देता येईल, असे देखील यावेळी डॉ. आवटे म्हणाले.

Last Updated :Jan 13, 2022, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details