महाराष्ट्र

maharashtra

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने तरुणांसाठी 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप'; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

By

Published : Oct 9, 2021, 7:31 AM IST

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणार्‍या होतकरू तरुण-तरुणींना शरद पवार इनस्पायर फेलोशिप दिली जाणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.

sharad pawar inspire fellowship
sharad pawar inspire fellowship

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस असून तो अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कृषी आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी नवे करु इच्छिणार्‍या होतकरू तरुण तरुणींना तर शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या सहाय्याने काम करणाऱ्या शिक्षकांना शरद पवार इनस्पायर फेलोशिप दिली जाणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

'तरुण वर्गाला फायदा होईल' -

शरद पवार गेली ६० वर्षाहून अधिक काळ देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय देशाच्या विकासावर दूरगामी परिणाम करणारे ठरले आहेत. शेती क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आजही जनतेला फायदा होत आहे. याशिवाय औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण इत्यादी अशा विविध क्षेत्रात पवार यांनी केलेले कार्य क्रांतिकारी असून पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच पवार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रांचा वसा कायम ठेवला. पवारसाहेबांच्या नावाने फेलोशिप जाहीर करताना आनंद होत असून याचा विकासाची जाण असणार्‍या आणि समाजासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याची धमक असणाऱ्या तरुण तरुणींना नक्कीच फायदा होईल, असेही सुळे म्हणाल्या.

'12 डिसेंबरला सन्मान' -

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर', 'शरदचंद्र पवार इनस्पायर लिटररी फेलोशिप' (शरदचंद्र पवार साहित्य पाठयवृत्ती) आणि 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन' या तीन फेलोशिप दिल्या जाणार आहेत. पैकी शेती आणि साहित्य क्षेत्रातील फेलोशिपचा कार्यक्रम ८ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून निवडलेल्या फेलोची घोषणा १ डिसेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतर १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी निवडलेल्या फेलोंना ती फेलोशिप सन्मानपूर्वक दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'अशी दिली जाईल फेलोशिप' -

शेती क्षेत्रातील फेलोशिपसाठी महाराष्ट्रातील जिज्ञासू विषयातील रुची आणि परिणामकारक नेतृत्व गुण या निकषावर या तरुण तरुणींची तज्ज्ञांच्या कमिटीद्वारे निवड करण्यात येईल. यासाठी राज्य भरातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यातून शार्टलिस्ट केलेल्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांची कमिटी त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील ८० जणांची फेलोशिपसाठी निवड केली जाईल. या फेलोंना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रज्ञ व अभ्यासक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. साहित्य क्षेत्रातील नव्या प्रवाहामध्ये दमदार लेखन करणार्‍या प्रयोगशील लेखक लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी प्राप्त झालेल्या अर्जातून शार्टलिस्ट झालेल्या तरुण तरुणींच्या मुलाखती घेऊन त्यातून दहा जणांना ही फेलोशिप जाहीर करण्यात येईल. या फेलोंना साहित्य निर्मितीसाठी नामवंत साहित्यिक मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी मदतदेखील करण्यात येणार आहे.

'अर्जासाठी आवाहन' -

शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांसाठी 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन'चा कार्यक्रम डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील काहीतरी नवे करु इच्छिणार्‍या प्रयोगशील तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधी असून या फेलोशिपसाठी जास्तीत जास्त तरुणतरुणींनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. एमकेसीएल फौंडेशन बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे फेलोशिप उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. 'शरद पवार इनस्पायर फेलोशिप इन एज्युकेशन'चे मुख्य समन्वयक म्हणून विवेक सावंत हे काम पाहणार आहेत.

हेही वाचा -मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेने वेडी ठरवले, पवारांचे टीकास्त्र

ABOUT THE AUTHOR

...view details