महाराष्ट्र

maharashtra

प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Oct 16, 2021, 10:32 PM IST

Prabodhankar Thackeray books Uddhav Thackeray
प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य

शंभर वर्षांपूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

मुंबई -शंभर वर्षांपूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे भाग्य आहे, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

हेही वाचा -नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोटे - फ्लेचर पटेल

प्रबोधन नियतकालिकेतील केशव सिताराम ठाकरे यांचे लेख असलेले ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दिक्षित व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रबोधनच्या शताब्दी निमित्त प्रसिद्ध झालेल्या या त्रिखंडात्मक ग्रंथाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार सचिन परब, डॉ. रणधीर शिंदे, ज्ञानेश महाराव, सुनिल कर्णिक व विश्वंभर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthakaray.in या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रबोधनकारांचे विचार जगभारत पोहोचले पाहिजे

आपल्या नातवांचे लाड करणारे आजोबा प्रबोधनकार यांच्याविषयी आठवणी जागवताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रबोधनकार कडक शिस्तीचे होते, ते आम्हाला बाळासाहेब सांगायचे. आमच्या लहानपणी आजोबांनी राजा राणीच्या गोष्टी सांगितल्या नाही तर त्यांच्या विचारांच्या गोष्टी सांगितल्या. प्रबोधनकार यांचे विचार जगातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या ग्रंथांचे भाषांतर झाले पाहिजे. शंभर वर्षे झाल्यानंतर माझ्या हस्ते या ग्रंथांचे प्रकाशन होत आहे, हे माझ्यासाठी समाधान देणारे आहे. हीच भावना बाळासाहेबांवरील ‘फटकारे’ पुस्तकाचे प्रकाशन केले त्यावेळी होती.

नेता म्हणून लोकशाहीत मत महत्वाचे आहेत. पण, लोकांमध्ये काम करीत असताना हिंमत सुद्धा आवश्यक आहे. प्रबोधनकारांनी ती दाखवली. पूर्वीच्या काळातल्या वाईट चालिरीतींच्या विरोधात प्रबोधनकार ठामपणे उभे राहिले. ते नास्तिक नव्हते, मात्र धर्माच्या नावावरील ढोंग त्यांना आवडत नव्हते. देश हाच धर्म, अशी शिकवण त्यांनी दिली, परंतू स्वत:च्या धर्माविषयी वाईट विचाराने समोरून कोणी आला तर मी एक कडवट हिंदू आहे, हे लक्षात घ्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रबोधनकार घराघरात पोहोचावेत

‘प्रबोधन’ या नियतकालिकाने संपूर्ण महाराष्ट्रात समाजसुधारणेचे नवे वारे निर्माण केले व महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली. तसेच, नव्या विचाराची पिढी घडवण्यात प्रबोधन या नियतकालिकाने मोलाचा वाटा उचलला होता. त्यांचे विचार घरा घरात पोहोचावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ग्रंथ पोहोचवावेत, अशी सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. सर्व विद्यालयातील ग्रंथालयात ही ज्ञानसंपदा पोहोचविणे आवश्यक आहे. प्रबोधनकारांच्या नावाने संमेलन व्हावे, तसेच अभ्यासक्रमातूनही त्यांचे विचार शिकविले जावेत, अशी अपेक्षा बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

या ग्रंथाचे स्वागत होईल

प्रबोधन या नियतकालिकाने बुद्धीप्रामाण्य व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, ऐहिक जीवनसमृद्धी आणि ज्ञाननिष्ठा या मुल्यांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ आणि त्यातील प्रबोधन परंपरा प्रबोधनाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच राहील. पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात प्रबोधन या नियतकालिकेचा मोलाचा वाटा आहे. या ग्रंथांचे सर्वत्र स्वागत होईल, असा विश्वास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. प्रबोधनकार हे कृतीला विचारांची जोड देणारे समाज सुधारक होते. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी मराठी भाषा विभागाने साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून पेलली आहे. ही ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य करणारे संपादक मंडळ यांचे विशेष आभार मंत्री देसाई यांनी मानले.

हेही वाचा -मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी.. प्रत्येक विकेन्डला सायन उड्डाणपूल राहणार बंद, एमएसआरडीसीचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details