महाराष्ट्र

maharashtra

अजित पवार 'जरंडेश्वर'बाबत महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत - किरीट सोमैया

By

Published : Oct 22, 2021, 5:16 PM IST

Updated : Oct 22, 2021, 5:31 PM IST

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी पुण्यामध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवारांचं हे स्पष्टीकरण म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करण्याचे काम असल्याचे सांगत अजित पवार यांनी मुख्य प्रश्नांना बगल दिली आहे असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लावला आहे.

jarandeshwar sugar factory
jarandeshwar sugar factory

मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया हे जरंडेश्वर साखर कारखाना खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत आले आहेत. अजित पवार यांनी किरीट सोमैया यांच्या आरोपावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची जंत्रीच समोर मांडली.

काय म्हणाले अजित पवार -

2007 मध्ये राम गणेश गडकरी साखर कारखाना 12 कोटी 95 लाखाला विकला गेला. अशाच पद्धतीने अनेक साखर कारखाने अशा किमतीत विकले गेले आहेत. जिल्हा बँकेने राज्यातील वेगवेगळे ६ साखर कारखाने विकत घेतले, तर राज्य बँकेने ३० साखर कारखाने विकत घेतले. राज्य शिखर बँकेने राज्यातील विविध ३० सहकारी साखर कारखाने विकले. ६ सहकारी साखर कारखाने जिल्हा मध्यवर्ती बँकांनी विकले तर ६ सहकारी साखर कारखाने राज्य सरकारच्या परवानगीने विकण्यात आले. ३ सहकारी साखर कारखाने कारखान्यांनी स्वतः विकले तर १२ सहकारी साखर कारखाने भाडेकरारावर किंवा सहयोगी करारावर चालवण्यास देण्यात आले आहेत. मात्र जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत सतत माझ्या कुटुंबांचा उल्लेख केला जातो आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे थकलेले पैसे न भरल्याने कारखान्याचा ताबा घेतला गेला. तसेच साखर कारखाना चालवणे येड्या गबाळ्याचे काम नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

अजित पवारांबद्दल बोलताना भाजप नेते किरीट सोमैया
अजित पवारांवर सोमैया यांचे आरोप कायम -
अजित पवारांनी कारखान्यात संदर्भात दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा सोमैया यांनी अजित पवारांवरचे आरोप कायम ठेवले आहेत. अजित पवार यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने विकत घेतला आहे व ते आतापर्यंत चालवत आहेत, हा मुख्य आरोप सोमैयांचा आहे. परंतु याबाबत अजित पवारांनी ब्र सुद्धा काढलेला नाही. साखर कारखाने विकले गेले याबाबत कोणाचीही हरकत नसून आणि भ्रष्ट पद्धतीचा घोटाळा त्यामध्ये झाला आहे, त्याचा तपास होणारच असे किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.



हे ही वाचा -विरोधकांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी दिली 65 कारखान्यांची यादी

साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप - अजित पवार


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवर आज उत्तर दिलं. त्यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील साखर कारखानादारीबद्दल अनेक बातम्या आल्या. मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी, पोलिस आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली, मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत, 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार म्हणाले.

मंत्री अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांवर भाजपा नेते किरीट सोमैया यांनी वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याचबरोबर सोमैया यांनी जंरडेश्वरप्रकरणी अजित पवार व त्यांच्या नातेवाईकांवर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बहिणी जरंडेश्वर कारखान्यात भागीदार आहेत. तसेच या सर्व प्रकरणाबाबतचे पुरावे मी ईडीकडे (ED) सुपूर्द करणार असल्याचे किरीट सोमैया म्हणाले होते. सोमैया व अजित पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

Last Updated :Oct 22, 2021, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details