महाराष्ट्र

maharashtra

डिसेंबरपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण दिले नाही तर मंत्र्यांना गावबंदी; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

By

Published : Aug 26, 2021, 3:16 PM IST

Updated : Aug 26, 2021, 3:26 PM IST

डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता गावबंदी करेल, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारला अमरावतीत दिला.

bawankule
चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती -देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै 2019 ला वटहुकूम काडून ओबीसींचे 27 टक्के आरक्षण वाचवले. त्यानंतर राज्यात जिल्हा परिषद निवडणुकाही त्या वटहुकूमामुळेच ओबीसींना मिळालेल्या आरक्षणानुसारच झाल्यात. दुर्दैवाने आमचे सरकार जाऊन नवीन सरकार आले आणि तो वटहुकूम रद्द झाला. राज्यातील महाविकास आघाडी सरकार न्यायालयात इच्छाशक्ती अभावी ओबीसी आरक्षण वाचवू शकले नाही. मुळातच त्यांना ओबीसी आरक्षण टिकवायचे नसून या आरक्षणाविनाच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आता 85 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत. त्यामुळे डिसेंबरपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झाले नाही तर राज्यातील मंत्र्यांना महाराष्ट्राची जनता गावबंदी करेल, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीत दिला.

बोलताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
  • युवा वॉरीयर नोंदणीसाठी भाजप नेते अमरावतीत

तरुणांना समस्कृतीक मंच देण्यासह देशाची संस्कृती कळावी, तसेच भारत महासत्ता होण्यासाठी युवकांना सक्षम करण्यासाठी भाजपच्या युवा वॉरियर नोंदणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील अमरावतीत आले होते. भाजप कार्यल्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवीत दोन्ही नेते दुचाकी रॅलीत सहभागी होऊन पोलीस आयुक्तालयातही गेले. भाजप कार्यल्यावर हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक व्हावी अशी मागणीही या नेत्यांनी केली. युवा वॉरीयर उपक्रमासह विविध राजकीय विषयांसंदर्भात त्यांनी पत्रकरांशी संवादही साधला.

हेही वाचा -काय आहे म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

  • आता भाजप जशास तसे उत्तर देणार

शिवसेनेचा इतिहास तपासा, हे अनेकांना खालच्या भाषेत बोलले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्धव ठाकरे यांनी जोडे मारण्याची भाषा वापरली होती. देवेंद्र फडणवीसांसंदर्भातही खालच्या दर्जाचे शब्दप्रयोग केले होते. मात्र, आम्ही त्यांच्याविरोधात कुठलेही कृत्य केले नाही. नारायण राणे यांना चक्क जेवणाच्या ताटावरून पोलिसांनी उचलले ही गंभीर बाब होती. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी तसे काही केले नाही. शिवसैनिकांनी आमचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे शिवसेनेने आमच्याशी पंगा घेतला तर आम्ही जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

  • नाना पटोलेंच्या जिल्ह्यात 1 हजार कोटींचा धान घोटाळा

नाना पटोले यांच्या गोंदिया जिल्ह्यात 1 हजार कोटी रुपयांचा धान घोटाळा उघडकीस आला आहे. अनेक रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा तांदूळ आला तर उत्तम दर्जाचा तांदूळ हा बाहेर गेला. या गंभीर प्रकाराची तक्रार झाली असताना तिथले जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक काही एक बोलत नाहीत. नाना पटोले यांनीच याबाबत काही बोलावे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • रवी राणांसोबत युती नाही

भाजपचे वरिष्ठ नेते आमदार रवी राणा यांना जवळ करत आहेत. अमरावतीच्या भाजप नेत्यांना भाव न देता रवी राणा यांचा उदोउदो करतात. तसेच महापालिका निवडणुकीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची युती होणार असे बोलले जात असल्याबाबत पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता, आमदार राणा हे आमच्या गतातले आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस अमरावतीत आले असता आपल्या गटातील आमदाराने एखाद्या कामाच्या पाहणीसाठी बोलावले तर आमच्या नेत्यांचे तिथे जाणे हे साहजिकच आहे. भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे रवी राणा यांच्याशी पटत नसेल तर रवी राणा यांच्यासोबत आम्ही युती करणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा -संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा सोडून मुंबईत दाखल, राजकीय घडामोडींना वेग

Last Updated : Aug 26, 2021, 3:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details