महाराष्ट्र

maharashtra

Karnataka Assembly Polls 2023 : कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा, तीन गॅस सिलिंडरसह नंदिनी दूध देणार मोफत

By

Published : May 1, 2023, 9:24 AM IST

Updated : May 1, 2023, 1:10 PM IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात गरीबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यासह अर्धा लिटर नंदिनी दूध देण्याचेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

Karnataka Assembly Polls 2023
भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

बेंगळुरू :सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणूक 2023 ची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने चांगलाच जोर लावला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप सरसावला आहे. त्यामुळे भाजपने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते हा जाहीरनामा जारी करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने दरवर्षी नागरिकांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासह दारिद्र रेषेखालील नागरिकांना अर्धा लिटर नंदिनी दूध मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

काय आहे भाजपच्या जाहीरनाम्यातील वचने :भाजपने आज हॉटेल शांग्रिला येथे कर्नाटक विधानसभेसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात भाजपने अनेक योजनांची घोषणा केली आहे. काँग्रेस केवळ मतांचे राजकारण करत असल्याचा हल्लाबोल यावेळी जे पी नड्डा यांनी केला. तर भाजप कायम विकासाचे राजकारण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील पायाभूत सुविधांवर देणार लक्ष :भाजप आपल्या जाहीरनाम्यात विविध घटकांचा विकास करण्यावर भर देण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात तरुणांवर विशेष लक्ष देण्यात आली आहे. यासोबतच महिलांनाही केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे.

भाजपने मागच्या वेळी गोरक्षणांवर दिला भर :भाजपने मागच्या निवडणुकीत राज्यातील सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. यापूर्वी राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर गोरक्षणाच्या उपाययोजनांकडेही लक्ष देण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर पलटवार :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कोलार येथे निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसवर चांगलाच पलटवार केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना विषारी सापाशी केली होती. त्यावर पंतप्रधान मोदींनी आगामी विधानसभा निवडणुकीत येथील जनता काँग्रेस पक्षाला चोख प्रत्युत्तर देईल, असे स्पष्ट केले. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत काँग्रेसला सर्वात जास्त त्रास होत असल्याचेही पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

मी जनतेच्या गळ्यातील साप :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सापाशी केल्यामुळे चांगलाच वाद रंगला. त्याला पंतप्रधान मोदी यांनी जबरदस्त उत्तर दिले. काँग्रेस आता धमक्या देत आहे. 'मोदी, तुमची कबर खोदली जाईल, असे ते म्हणतात. माझी तुलना ते सापाशी करत लोकांकडे मते मागत आहेत. मात्र देशातील जनता माझ्यासाठी भगवान शिवाच्या रूपात आहे. देवाच्या रूपात जनतेच्या गळ्यातला साप असणे मला मान्य आहे. त्याला कर्नाटकातील जनता १० मे रोजी चोख प्रत्युत्तर देईल, पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 'काँग्रेस हे 'जुने इंजिन' आहे. त्यामुळे विकास थांबला. काँग्रेस पक्ष जनतेला दिलेली आश्वासने कधीच पूर्ण करत नाही. 'इम्परफेक्ट गॅरंटी' हा त्यांचा विक्रम आहे. काँग्रेसने जनतेची फसवणूक केली आहे, मात्र भाजपने विकासाची अनेक कामे करून सर्व आश्वासनांची पूर्तता केल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - LPG Cylinder Price Today : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलासा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सुमारे 171 रुपयाने स्वस्त

Last Updated : May 1, 2023, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details