ETV Bharat / state

पँथर हरपला; ज्येष्ठ आंबेडकरी नेते गंगाधर गाडे यांचं निधन, 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Gangadhar Gade Passed Away

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 10:31 AM IST

Updated : May 4, 2024, 2:23 PM IST

Gangadhar Gade Passed Away
माजी मंत्री गंगाधर गाडे (Reporter)

Gangadhar Gade Passed Away : दलित पँथरचे अग्रणी नेते तथा माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं आज पहाटे छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं. त्यांनी 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गंगाधर गाडे यांनी नामांतर लढ्यात मोठी भूमिका बजावली होती.

छत्रपती संभाजीनगर Gangadhar Gade Passed Away : आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचं आज सकाळी 4.30 वाजता निधन झालं. त्यांचं पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी 4 वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

मागासवर्गीय समाजासाठी उभारला लढा : गंगाधर गाडे यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1947 रोजी अमरावती इथं झाला. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतल्यानं त्यांचे अगोदरचे दिवस हालाखीचे राहिले. प्राथमिक शिक्षण अमरावती इथं पूर्ण केल्यावर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद इथं 1965 मध्ये प्रवेश घेतला. एम ए समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 1969 मध्ये रिपब्लिकन स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया याची स्थापना करत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काम सुरू केलं. 1969 मध्ये श्रीमती सूर्यकांता यांच्याशी त्यांचा विवाह पार पडला. 1972 साली विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचा लढा त्यांनी लढत 25 रुपये मिळणारी शिष्यवृत्ती 100 रुपये मिळवून दिली. 1974 मध्ये झोपडपट्टी बसवण्यासाठी त्यांनी लढा दिला, वेळोवेळी आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले. 1975 मध्ये शिष्यवृत्तीसाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची सभा देखील त्यांनी उधळली होती. 1977 साली आणीबाणीमध्ये त्यांना आठ महिने तुरुंगात टाकण्यात आलं होतं. बाहेर आल्यावर त्यांनी सर्वात आधी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करावं, अशी मागणी केली. त्यासाठी तब्बल 17 वर्षे लढा देखील त्यांनी दिला. या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यात देखील आपला सहभाग नोंदवला. दरम्यान त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत निवडणूक जिंकली होती. 1989 मधे स्थायी समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले. 1991 मध्ये भारतीय जनता पँथरचं पुनर्गठण त्यांनी केले. कामगारांच्या प्रश्नासाठी पँथर पावर कामगार संघटना त्यांनी स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी कामगारांसाठी वेगळा लढा सुरू केला. 1994 मध्ये महानगरपालिकेत सर्वाधिक मत घेऊन निवडणूक जिंकणारे ते पहिले नगरसेवक ठरले. 1997 मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि परिवहन राज्यमंत्री म्हणून त्यांनी काही महिने काम पाहिलं. तर 2007 मध्ये त्यांनी बसपामध्ये प्रवेश घेऊन पक्षासाठी काम सुरू केलं.

नामांतरासाठी मुलाचे नाव ठवेले नाही : मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करा, अशी मागणी त्यांनी 1977 मध्ये केली. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून त्यांनी सरकारला जेरीस आणलं होतं. 1978 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला मात्र, जोपर्यंत नामांतर होणार नाही, तोपर्यंत मी माझ्या मुलाचं नावही ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली. त्यांनी ती पाळली देखील. 1994 साली नामांतराचा लढा पूर्ण झाला. शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी रोजी त्यांनी नामांतर झाल्याची घोषणा केली. त्यानंतरच गंगाधर गाडे यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव सिद्धार्थ असं ठेवलं. आपल्या ध्येयाशी प्रामाणिकपणे लढणारा लढवय्या नेता हरवल्याची खंत आज अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

  1. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024
  2. सिलेंडर स्फोटानं नागरिक हादरले; चिमुकलीचा मृत्यू, तर पाच जण जखमी - Girl Died In Cylinder Blast
Last Updated :May 4, 2024, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.