ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या मंत्रालयातील नवा बनावट कागदपत्रांचा स्कॅम उघड, गृह विभागाच्या उपसचिवाला केलं निलंबित

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 9:19 PM IST

Maharashtra Ministry Scam
मंत्रालय

Maharashtra Ministry Scam: महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील नवा बनावट कागदपत्र स्कॅम उघड झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यात सामील आहे. या प्रकरणी गृहविभागाच्या उपसचिव किशोर भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. विकासक संजय पूनामिया यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई Maharashtra Ministry Scam : गृहविभागाचे निलंबित उपसचिव किशोर भालेराव, शरद अग्रवाल, वकील शेखर जगताप आणि श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. शेखर जगताप यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची कथित बनावट पत्रे किशोर भालेराव यांनी जारी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी किशोर भालेराव यांना गृहविभागानं निलंबित केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

याविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल: छोटा शकील सोबतच्या 'एफआयआर'मध्ये आरोपी असलेल्या श्यामसुंदर अग्रवाल याला वाचवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाचे बनावट पत्र बनवून वकील ॲड. शेखर जगताप न्यायालयात हजर झाले. वकील शेखर जगताप यांच्या विरोधात तसेच विशेष सरकारी वकिलाचे बनावट पत्र बनवण्यात मदत करणारे गृह विभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांच्यावर कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच बरोबरच श्यामसुंदर अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचीही नावे 'एफआयआर'मध्ये नोंदवण्यात आली आहेत.

'या' कारणानं उपसचिवाचं निलंबन : वकील शेखर जगताप यांना किल्ला कोर्टशिवाय इतर कोर्टात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची मुभा नसतानाही ते सत्र आणि उच्च न्यायालयात हजर झाले. तसेच त्यांचा क्लायंट श्यामसुंदर अग्रवाल यांना वाचवण्यासाठी विशेष सरकारी वकील असल्याचा दावा केला. ३ जुलै २०२१ ते ३ मार्च २०२४ दरम्यान हा गुन्हा घडला असून गृह विभागाचे उपसचिव किशोर भालेराव यांनी हे पत्र देण्यास मदत केल्यानं त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. अशा प्रकारे बनावट पत्रे बनवून वकील शेखर जगताप हे अनेक वेळा विशेष सरकारी वकील म्हणून सत्र न्यायालयात आणि उच्च न्यायालयात हजर झाल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण? : आरोपी श्यामसुंदर अग्रवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारण, त्यांना छोटा शकीलकडून त्याच्या मालमत्तेची प्रकरणं मिटवण्यासाठी धमकीचे फोन आल्याचा आरोप होता. २०२१ मध्ये तक्रारदार संजय पूनामिया यांच्या विरोधात श्यामसुंदर अग्रवाल यांनी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नंतर २०२१ मध्येच गुन्हे प्रकटीकरण शाखा ९ मध्ये संजय पुनामिया यांनी आरोपी श्यामसुंदर अग्रवाल, छोटा शकील आणि इतर आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा:

  1. "अब की बार भाजपा तडीपार"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'या' खासदाराला आडवं करण्याचा इरादा
  2. मराठा आंदोलक आक्रमक; संभाजीनगरमध्ये अमित शाह यांच्या सभेचं बॅनर फाडलं; आंदोलकांची घोषणाबाजी
  3. जागा वाटपावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर; तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील - शंभूराज देसाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.