नवी दिल्ली : Narayan Rane Press Conference : भाजपा नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. इंडिया आघाडीच्या दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेवरून राणे यांनी ठाकरेंवर घणाघात केलाय. कोणत्याच ठाकरेंचं वाईट करणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिलाय. त्यामुळे शांत बसलोय, अशी धमकीवजा टीका राणे यांनी केली आहे. टीकेला उत्तर देण्यासाठी आणि टीकाकारांची वैयक्तिक औकात किती आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे राणेंनी यावेळी सांगितले.
आमचा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष : माजी मुख्यमंत्री नारायण राणे म्हणाले, " आमचे 303 खासदार आहेत. यांचे 5 खासदार आहेत. आमच्या तुलनेत चटणी पण नाही," अशी बोचरी टीका राणेंनी केली. "येणाऱ्या निवडणुकीत फक्त पाच आमदार राहतील. अशा लोकांनी रामलीला मैदानात जाऊन बोलणं किती योग्य आहे. त्यांची राजकीय उंची काय? पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची राजकीय आणि बौद्धिक उंची नाही. केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून बोलणार का? मोदींवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मोदींचा पक्ष तडीपार करा म्हणतात. आमची केंद्रात अन् राज्यात सत्ता आहे. तडीपार करायचं असेल तर आम्ही कुणाला करू?कोरोनामध्ये औषधांचे पैसे खाणाऱ्यांना आम्ही तडीपार करु," असंही राणे म्हणाले आहेत.
कोरोना काळातही सामनाला नफा : "उद्धव ठाकरे स्वत:ला काय समजतात माहिती नाही? बहुतेक त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. पंतप्रधानांवर बोलण्याइतकी यांची योग्यता आहे का? यांची गुणवत्ता नाही. तरी हे तडीपारची भाषा करतात. जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा आहे," असं राणे म्हणाले. "शिवसेनेत मी चाळीस वर्ष होतो. आम्ही कधीही मातोश्रीवर रिकाम्या हाताने गेलो नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काय व्यवसाय आहे. सामना वृत्तपत्र चालवतात. कोरोना काळातही सामनाला नफा कसा झाला?" असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी केला आहे.
कोण आहेत किरण सामंत? : रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक असून त्यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु आहेत. असा प्रश्न नारायण राणे यांना विचारला असता, ते म्हणाले की, "किरण सामंत कोण आहेत? याची जरा माहिती घ्या. तसे एक डझन उमेदवार या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये किरण सामंत एक आहेत. या मतदार संघावर भाजपाचं वर्चस्व आहे. ही जागा कुठल्याही परिस्थितीत भाजपाच लढवणार आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वीच मी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना सांगून आलो आहे की, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या जागेवर मला उमेदवारी दिल्यास मी ती जागा लढवून जिंकणार आहे."
हेही वाचा :
२ महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections