ETV Bharat / state

Mumbai Honeytrap Case : पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकला माझगाव डॉकमधील तरुण, लीक केली संवेदनशील माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 11, 2024, 7:12 PM IST

Mumbai Honeytrap Case ATS Arrested a man from Mazgaon Dock on charges of providing sensitive information to Pakistani Intelligence
पाकिस्तानी महिलेच्या हनीट्रॅपमध्ये अडकला माझगाव डॉकमधील तरुण, लीक केली संवेदनशील माहिती

Mumbai Honeytrap Case : एटीएसनं प्रतिबंधित क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव डॉक मधील एका तरुणाला अटक केली आहे. हा हनी ट्रॅपचा (Honeytrap) प्रकार असून याप्रकरणी एटीएसनं आरोपी आणि त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई Mumbai Honeytrap Case : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या माझगाव डॉक यार्डची संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर (Pakistan Intelligence Operative) असलेल्या महिलेला पुरविल्याच्या आरोपावरून माझगाव डॉक येथील कंत्राटी एका 31 वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केली आहे. नवी मुंबई एटीएसनं ही कारवाई केली असून आरोपीची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांनी दिली.


संवेदनशील माहिती केली लीक : अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव कल्पेश बैकर (वय 31) असं आहे. तर दहशतवाद विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथील युनिटला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की, एक संशयित व्यक्ती हा पाकिस्तानी बेस इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (Pakistan based intelligence operative) च्या संपर्कात असून त्यानं भारत सरकारनं प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवली आहे. या माहितीच्या आधारे संशयित तरुणाचा शोध घेऊन त्याची चौकशी करण्यात आली.

चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर : आरोपीच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. त्यानं सांगितलं की, नोव्हेंबर 2021 ते मे 2023 या कालावधीत त्याची फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर सदरील तरुणाच्या सूचनेनुसार तो तिला संवेदनशील माहिती देऊ लागला. आरोपीनं या तरुणीला भारत सरकारनं प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. या प्रकरणी आरोपी कल्पेश बैकरसह त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई युनिट करत आहे.

हेही वाचा -

  1. Kurulkar Honeytrap Case : डीआरडीओने कुरुलकर यांच्या लॅपटॉप ऐवजी एटीएसला दिला दुसऱ्याच व्यक्तीचा लॅपटॉप
  2. Honeytrap News : हनीट्रॅपपासून वाचायचे का? सोशल मीडियावर बाळगा अशी सावधगिरी
  3. Honeytrap : हनीट्रॅपच्या जाळ्यात महाराष्ट्रासह देशातील अडकल्या 'या' बड्या व्यक्ती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.