ETV Bharat / state

रामनवमी 2024 : काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, काय आहे मंदिराचा इतिहास आणि महत्त्व? - KALARAM TEMPLE Nashik

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 12:10 PM IST

Ram Navami 2024
रामनवमी निमित्त श्री काळरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी, काय आहे मंदिराचा इतिहास आणि महत्त्व?

Ram Navami 2024 : आज रामनवमी निमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात अडीच लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असल्याचं मंदिर विश्वस्तांनी सांगितलंय. या मंदिरात अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतलं होतं. त्यानंतर भाविकांची संख्या वाढल्याचं मंदिर विश्वस्तांनी सांगितलंय.

रामनवमी निमित्त श्री काळरामाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी

नाशिक Ram Navami 2024 : प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त तब्बल अडीच लाख भाविक दर्शनाला येण्याचा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केलाय. यानिमित्तानं भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी दीड लाख भाविकांनी मंदिरात दर्शन घेतलं होतं. मात्र यंदा अयोध्यातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री काळारामाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता विश्वस्तांनी व्यक्त केलीय.


19 तास खुलं राहणार मंदिर : नाशिकचं प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर हे रामनवमीनिमित्त आज सकाळी 5 ते रात्री 12 असं 19 तास खुलं राहणार आहे. दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव सोहळा होणार आहे. यावेळी गर्दीच्या नियोजनासाठी काही वेळ मंदिर बंद असणार आहे. तसंच मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्री काळाराम संस्थांच्या वतीनं पंजिरीचा प्रसाद दिला जाणार आहे. प्रसादासाठी यंदा 500 किलो पंजिरी तयार करण्यात आलीय. तसंच पार्किंगसाठी मंदिरापासून 500 मीटर अंतरावर गोदाघाट, गौरी पटांगणावर वाहनं लावली जाणार आहेत.

अडीच लाख भाविक घेणार दर्शन : "पंतप्रधान मोदी यांनी श्री काळाराम मंदिराला भेट दिल्यानंतर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मागील वर्षी दीड लाख भाविकांनी दर्शन घेतलं होतं. यावर्षी रामनवमीला दोन ते अडीच लाख भाविक दर्शन घेतील, असा अंदाज असल्यानं या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी बॅरिकेट्स तसंच पोलीस बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलं," असं मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितलंय.

पेशवेकालीन मंदिर : श्री काळाराम मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीनं फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचं बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचं बोललं जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होतं. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरुन दगड आणण्यात आले. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात होते, अशी अख्यायिका आहे. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचं परीक्षण केलं गेलं. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झालंय. 1778 ते 1790 या कालखंडात हे मंदिर पूर्ण झालंय. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख रुपये खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.

काळाराम मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केला सत्याग्रह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक आंदोलनांमध्ये नाशिकच्या श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. डॉ बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचं नेतृत्व करण्याचं मान्य केलं होतं. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः सत्याग्रहाचं नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारलं होतं. हा सत्याग्रह 5 वर्षे 11 महिने आणि 5 दिवस सुरू होता. अखेर मानवी हक्क मिळवण्यासाठी अस्पृश्य समाजाला 2 मार्च 1930 रोजी स्वाभिमानानं श्री काळाराम मंदिर प्रवेश मिळाला आणि यामुळं सत्याग्रह आणि इतिहासाचं सोनेरी पान उघडलं गेलं. मात्र सत्याग्रहाचं नेतृत्व करुनसुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही श्री काळाराम मंदिराचं प्रवेशद्वार ओलांडलं नाही.

हेही वाचा :

  1. रामनवमी उत्सव 2024 : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात - Ram Navami 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.