ETV Bharat / state

विहिरीवरून पडलं गावाचं नाव, ...अन ऐतिहासिक विहीरच टाकली बुजवून - Stepwell In Amravati

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 10:05 PM IST

Updated : May 14, 2024, 10:44 PM IST

Stepwell In Amravati : मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या अचलपूर तालुक्यातील आदिवासी बहुल गावात चार-पाचशे वर्ष जुनी पायविहीर होती. या अष्टकोनी आकाराच्या पायविहिरीमुळंच येथील गावाचं नाव 'पायविहीर' (Stepwell Village) असं पडलं. परंतु आता शेत मालकाकडून ही ऐतिहासिक विहीरच बुजवून टाकण्यात आलीय.

Stepwell In Amravati
पाय विहीर (Amravati Reporter)

विहिरीवरून पडलं गावाचं नाव 'पायविहीर' (Amravati Reporter)

अमरावती Stepwell In Amravati : शेताला भरभरून पाणी मिळावं म्हणून शेतात विहीर असणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. विहिरीच्या पाण्यामुळं शेतात पीक छान बहरतं हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, शेतीचं नुकसान होत आहे म्हणून चक्क शेतातली विहीरच एखाद्या शेतकऱ्यानं बुजवली तर ते नवलच. मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी बहुल गावात चार-पाचशे वर्षांपासून पायविहीर होती. अष्टकोनी आकाराच्या या पाय विहिरीमुळंच गावाचं नाव 'पायविहीर' (Stepwell Village) असं पडलं. मात्र, ज्यांच्या शेतात ही विहीर आहे त्या शेतकऱ्यानं आता ही ऐतिहासिक विहीरच बुजवली आहे. नेमकं असं का घडलं? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शेत मालकाकडून धक्कादायक माहिती समोर आलीय.



विहिरीमुळंच व्हायचं शेत उध्वस्त : उंच डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेल्या 'पायविहीर' गावात राधेलाल मोरले यांच्या शेतामध्ये अंदाजे 400 ते 500 वर्षे जुनी 'पायविहीर' होती. अष्टकोनी आकाराची ही 'पायविहीर' या परिसरात एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणून ओळखली जाते. या भागात जमिनीखाली मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या विहिरीला बाराही महिने भरपूर पाणी असायचं. पावसाळ्यात ही विहीर इतकी तुडुंब भरायची की, या विहिरीच्या पाण्यातील झऱ्यांमुळं चक्क राधेलाल मोरले यांचं शेत वाहून जायचं. शेतात जिकडं-तिकडं पावसाळाभर पाणीच पाणी साचायचं. विहिरीतल्या पाण्यामुळं शेती करणं अशक्य असल्यामुळं राधेलाल मोरले यांनी चक्क ही विहीरच बुजवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे या परिसराची ओळख असणारी अष्टकोनी आकाराची 'पायविहीर' शेत उध्वस्त होत असल्यामुळं बुजवून टाकली.



अशी होती ही विहीर : राधेलाल मोरले यांनी बुजवलेली शेतातली विहीर ही अष्टकोनी आकाराची होती. या विहिरीवरून ओळखले जाणाऱ्या 'पायविहीर' या गावात इतर कुठेही पाणी मिळत नव्हतं. त्यामुळं गावातील सारे याच पायविहीर मधून पाणी न्यायचे. अष्टकोणी आकाराच्या या विहिरीत खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. पायऱ्या उतरल्यावर कपारीमध्ये जाऊन विहिरीतले पाणी भरून पुन्हा पायऱ्यांवरून वर येता येत होतं अशी माहिती, त्यांच्या स्नुषा सरोज मोरले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.



आंब्याच्या झाडाखाली आहे विहीर : राधेलाल मोरले यांच्या शेतात असणारी ऐतिहासिक आणि सुंदर अशी विहीर पाला-पाचोळा आणि लाकडं टाकून बुजवण्यात आलीय. आज जिथे विहीर होती त्या ठिकाणी आंब्याचं झाड बहरलं आहे. आंब्याच्या झाडाखाली गेल्यावर खाली पालापाचोळ्यामध्ये पाय पडला तर खाली एखादा खड्डा असावा असं लक्षात येतं. ज्यांना ह्या विहिरीबाबत माहिती नाही, अशी व्यक्ती या ठिकाणी आली तर दुर्घटना होण्याची देखील शक्यता जाणवते.



ही पाय विहीर दुर्लक्षितच : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर या गावात मध्ययुगीन दोन वैशिष्ट्यपूर्ण पायविहिरी आहेत. दगड आणि चुना वापरून या दोन्ही पाय विहीरी बांधण्यात आल्यात. यासोबतच दर्यापूर तालुक्यात महिमापूर येथे 88 पायऱ्या आणि सात मजले असणारी विहीर आहे. महिमापूर येथील विहीर यादवकालीन आणि बहामणी कालीन असल्याचे दोन मतप्रवाह आहेत. महानुभाव पंथाची काशी असणाऱ्या रिद्धपूर या ठिकाणी देखील पायविहीर असून सासू सुनेची विहीर म्हणून ती ओळखली जाते. जिल्ह्यातील या तिन्ही पाय विहिरींचा इतिहास जगासमोर आहे. मात्र, मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या पायविहीर या गावातील पाय विहिरीबाबत कोणाला काही विशेष माहिती नाही. अष्टकोनी आकाराची ही विहीर अतिशय छान होती इतकंच पायविहीर गावातील जुने लोकं सांगतात.

हेही वाचा -

  1. वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित
  2. मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार
  3. काय सांगता! मेळघाटात चक्क आंब्याच्या झाडाला दाढी; दाढीवाला आंबा अशी खास ओळख
Last Updated :May 14, 2024, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.