ETV Bharat / state

डोंबिवलीत कोपरमध्ये भाजपाच्या कमळ चिन्हाला फासलं काळं, दोन शिवसैनिकांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 8:09 PM IST

Eknath Shinde two Shivsainik arrested for put black colour on BJP lotus symbol in Koper Dombivli
भाजपाच्या कमळ चिन्हाला शिंदेंच्या शिवसैनिकांनी फासलं काळं

BJP Symbol Blackened by Shivsainik : भाजपाच्या वतीनं डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील खासगी, सार्वजनिक संरक्षित भिंतींवर येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थी पक्षाचंं चिन्ह काढण्यात आलंय. मात्र, या 'कमळ' चिन्हावर काही लोकांनी काळं फासल्याची घटना शनिवारी (9 मार्च) सकाळी उघडकीस आली. त्यानंतर आज (10 मार्च) याप्रकरणी एकनाथ शिंदे गटातील दोन शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे BJP Symbol Blackened by Shivsainik : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होऊन कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते. याच पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर पक्षाचे बोध चिन्हं कमळ काढले होते. मात्र, या चिन्हांवर कोपर भागातील दोन शिवसैनिकांनी काळं फासल्याची घटना शनिवारी (9 मार्च) सकाळी उघडकीस आली. त्यानंतर या प्रकरणी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच, आज (10 मार्च) दोघांना अटक करण्यात आली आहे. सम्राट अनंत मगरे, विशाल कोकाटे असे अटक केलेल्या शिवसैनिकांची नावे असून शिंदे गटाचे कट्टर कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.



नेमकं काय आहे प्रकरण? : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस, कोपर प्रभाग अध्यक्ष ऋषभ ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी गेल्या आठवडाभर 450 ठिकाणी 'पुन्हा एकदा मोदी सरकार' असं लिहित त्याच्या बाजूला कमळ चिन्ह रंगानं रेखाटून प्रचार मोहिमेला सुरुवात केली. मात्र, शनिवारी सकाळी सर्वच कमळ चिन्हांवर काळं फासलं गेल्याचं निदर्शणास आलं. त्यानंतर लगेच समीर चिटणीस यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी यासंबंधीत अधिक चौकशी केली असता शिंदे गटातील शिवसैनिक सम्राट मगरे आणि विशाल कोकाटे यांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं. त्यानंतर आज या दोघांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.


भाजपा विरुद्ध शिंदेंची शिवसेना वाद पेटणार? : काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याचा प्रकारामुळं राज्यभरात खळबळ उडाली होती. तसंच या मतदारसंघातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र मतभेद असल्याचंही बघायला मिळतंय. असं असतानाच आता कोपरमधील प्रकारामुळं ही दरी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का; खासदारानं धरला काँग्रेसचा 'हात'
  2. "मोदींच्या चेहऱ्यानं सर्व जागा जिंकू"; भाजपाच्या प्रचार रथाला मुंबईत सुरुवात
  3. भाजपानं आयोजित केलेल्या शिबिरात चेंगराचेंगरी, एका वृद्ध महिलेचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.