ETV Bharat / state

Earthquake today in Maharashtra : मराठवाड्यात हिंगोली, परभणीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 7:27 AM IST

Updated : Mar 21, 2024, 11:36 AM IST

Earthquake today in Maharashtra
Earthquake today in Maharashtra

मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज सकाळी भूंकपाचे धक्के जाणवले आहेत. जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाल्यानं नागरिक भयभीत झाले. सुदैवानं भूकंपाचं धक्के सौम्य असल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई- हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ४.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंपाचा धक्का सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी झाला. या भूकंपाची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात ( National Center for Seismology) झाली. भूकंपाबाबत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं सोशल मीडियात पोस्ट करून माहिती दिली. हिंगोली जिल्ह्यात अचानक झालेल्या भूकंपानं नागरिक भयभीत झाले. नांदेड आणि परभणी जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के बसले आहेत.

नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यात सकाळी 6:09 व 6:19 मिनिटे अशा दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. "भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र सतर्क राहावं. घराचे छत पत्र्याचे असेल तर त्यांनी नागरिकांनी पत्र्यावरील दगड त्वरित काढून घ्यावेत, "असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

भूकंपानं कोणतेही नुकसान नाही-नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता सकाळी ६ वाजून ९ मिनिटाला 4.5 रिश्टर स्केल व ६ वाजून १९ मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल अशी नोंदविण्यात आलेली आहे. नांदेडमधील भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात आहे. सुदैवानं नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असल्यानं कुठेही नुकसान झालेलं नाही.

हिंगोलीमध्ये भूगर्भातून येतो आवाज- गेल्या पाच वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर अनेकवेळा भूगर्भातून आवाज होत असल्याचं प्रकार समोर आले आहेत. कळमनुरी वसमत तालुक्यातील काही गावात भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतानाच आज भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हिंगोली परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूगर्भातtन आवाज आला. त्यानंतर भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात एक भिंत कोसळल्याचा दावा केला जात आहे. भूकंपाचे धक्के बसल्यानं अनेक नागरिक घराबाहेर पडले आहेत.

हेही वाचा-

  1. नांदेडच्या 'या' भागात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
  2. कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला
Last Updated :Mar 21, 2024, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.