ETV Bharat / state

'त्या' बँक कर्मचाऱ्याच्या खूनाचा छडा लागला, कारण जाणून व्हाल थक्क

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 6:32 PM IST

Daund police arrested killer
आरोपीला अटक

Bank Employee Murder Case: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे गावाच्या हद्दीत 1 मार्चला रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास प्रविण मळेकर (वय ५८) या बँक रिकव्हरी अधिकाऱ्याची भर रस्त्यात चाकूनं भोकसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वाहनांमुळं आपल्याला त्रास होतो म्हणून दुचाकीस्वाराची हत्या केल्याचं अजब कारण आरोपीनं सांगितलयं.

दौंड (पुणे) Bank Employee Murder Case : मृतक प्रविण मळेकर हे 1 मार्चला रात्री मोटारसायकलवरून बारामतीहुन कुरकुंभ येथे जात असताना वासुंदे गावाच्या हद्दीत एका अज्ञातानं धारदार हत्यारानं भोकसून त्यांचा खून केला होता. त्यांचा मुलगा ऋषिकेश मळेकर यांनी याची फिर्याद दौंड पोलिसात दिली होती. फोनवरून माहिती मिळताच या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे तात्काळ आपल्या स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले.

आरोपी करायचा वाहनांवर दगडफेक: त्यानंतर दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या. घटनेचा सखोल तपास करताना पोलिसांनी त्या रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली तसेच अनेकांशी विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी तपासात त्या परिसरातच राहणाऱ्या एका इसमाकडून वारंवार वाहनांवर दगडफेक तसेच हुज्जत घालण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. घटनेचा सूक्ष्म तपास करताना पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावून आरोपीचा माग काढला. या अगोदरही दगड मारणं, शिवीगाळ करणं असे प्रकार आरोपी करत होता. काही तासांपूर्वीही आरोपीनं गाडीवर दगड मारले होते. मागील एका गुन्ह्यात आरोपीनं एका महिलेला धारदार हत्याराचा धाक दाखवून धमकावलं होतं. यामुळं दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दीपक रामदास लोंढे (वय ३७, रा. वासुंदे, ता. दौंड) असं अटक आरोपीचं नाव आहे.

'या' त्रासापाई केली हत्या : या घटनेतील अटक आरोपी दीपक लोंढे याच्या चौकशीत अजब कारण समोर आलंय. 'रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांमुळं मला त्रास होतो. जाणून-बुजून माझ्या अंगावर वाहनं घालतात, असं सांगणाऱ्या आरोपी दीपकनं त्रास होतोय म्हणून रस्त्यानं जाणाऱ्या एका दुचाकीस्वारासोबत वाद घातला. यानंतर धारदार सुरा मारून दुचाकीस्वाराचा खून केला. या घटनेमुळं दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा शोध लावत दौंड पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून जेरबंद केलं आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती दिली.

'या' पोलिसांनी बजावलं कर्तव्य : ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, अरविंद गटकुळ, तुकाराम राठोड, सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे, शंकर वाघमारे, सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, सागर म्हेत्रे, नितीन बोराडे, रवी काळे, अमीर शेख, संजय नगरे, अमोल देवकाते, शरद वारे, योगेश गोलांडे, महेश भोसले, किरण पांढरे, पोलीस जवान असिफ शेख, मंगेश ठिगळे, विजय कांचन, धीरज जाधव आदींनी केली आहे.

हेही वाचा:

  1. "देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांचे... "; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा निशाणा
  2. पहिल्याच यादीत भाजपाचा हिरमोड; भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार
  3. तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.