ETV Bharat / state

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची एकजूट कुठेच दिसेना, महत्त्वाच्या प्रश्नांवरही विरोधक शांतच!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 10:10 PM IST

Budget Session 2024: राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून (26 फेब्रुवारी) सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होऊन चार दिवस झाले; पण या चार दिवसात विरोधकांची एकजूट ना सभागृहात दिसून आली ना सभागृहाच्या बाहेर. याचा परिणाम सभागृहातील विरोधी पक्षाच्या कामगिरीवर तर होत नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.

Budget Session 2024
विरोधक आंदोलन करताना

जितेंद्र आव्हाड विरोधकांच्या एकजुटीवर बोलताना

मुंबई Budget Session 2024 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होऊन चार दिवस झाले. प्रत्येक अधिवेशनामध्ये विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याच्या अर्धातास पूर्वी विरोधक सत्ताधाऱ्यां विरोधात अनेक मुद्द्यांवर विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करतात, असा पायंडा पडला आहे. मागील अनेक वर्षे तसे बघायला भेटत आहे. परंतु, यंदा विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकार विरोधात आंदोलन केलं असलं तरी विरोधकांची संख्या मात्र अतिशय कमी होती. आज (29 फेब्रुवारी) तर विरोधकांना सरकार विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यासाठी आमदार येण्याची वाट पाहावी लागली

बोटावर मोजण्याइतकेच आमदार उपस्थित: पूर्वी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एकत्र येत यांच्यासोबत अनेक महाविकास आघाडीचे आमदार एकत्र येऊन आंदोलन करत होते. मात्र, आज जेमतेम बोटावर मोजता येतील इतकेच नेते, आमदार आंदोलनात सहभागी झालेलं पाहायला भेटलं. आज राज्यातील परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटी प्रकरणी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आंदोलन छेडलं. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील भुसारा, आमदार सचिन अहिर, आमदार सतेज पाटील, आमदार नरेंद्र दराडे, आमदार विलास पोतनीस आणि इतर चार ते पाच आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार आंदोलनात दिसले नाहीत. त्याचप्रमाणे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे मागील चार दिवसांपासून विरोधकांच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत. या कारणाने आता विरोधकांमध्ये एकजूट राहिली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

दोन्ही सभागृहातसुद्धा तीच परिस्थिती: विधान भवनाच्या बाहेरच नाही तर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातसुद्धा या अधिवेशनात विरोधकांची एकजूट कमी झालेली दिसून आली. बुधवारी विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षांकडून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर या शहरांमध्ये करण्यात आलेली कामे आणि शहरामध्ये होत असलेला गतिमान विकास याबाबत सरकारचे आभार मांडणारा प्रस्ताव मांडण्यात आला. यावरील चर्चेदरम्यान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकार मुंबईतील सर्व प्रकल्प तसेच जागा अदानी कंपनीला देत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर भाजपा आमदार आशिष शेलार, अमित साटम, योगेश सागर यांनी वर्षा गायकवाड यांना या मुद्द्यावर घेरले. यादरम्यान सभागृहात जोरदार खडाजंगी दिसून आली. काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी यामध्ये वर्षा गायकवाड यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण, महाविकास आघाडीचे इतर आमदार मात्र या मुद्द्यावर गप्प राहिले. अदानी विरोधात शिवसेना ठाकरे गटानं मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं होतं. परंतु, सभागृहामध्ये वर्षा गायकवाड यांनी हा मुद्दा लावून धरलेला असताना त्यांच्या बाजूनं कुणीही मदतीला धावलं नाही.

विधान परिषदेतही विरोधी पक्ष शांतच: विधान परिषदेमध्येसुद्धा एरव्ही आक्रमक असलेला विरोधी पक्ष यंदा मात्र शांत झाला आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच दिवसाचं अधिवेशन असताना अनेक आमदार तर अधिवेशनामध्ये सभागृहात गैरहजरच राहिले आहेत. काहींनी तर वेळेची मर्यादाही ठेवली नाही. त्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीसुद्धा आमदारांची कानउघाडणी केली आहे.

विरोधकांची एकजूट कायम आहे, फक्त दिसत नाही? : विरोधकांमध्ये यंदा अधिवेशनात एकजूट दिसून येत नसल्यानं या मुद्द्यावर बोलताना शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, विरोधकांमध्ये एकजूट नाही असं म्हणता येणार नाही. कारण जेव्हा वर्षा गायकवाड सभागृहात धारावी प्रकल्पावर बोलत होत्या. त्यावेळी मी सभागृहात नव्हतो. पण, धारावीच्या मुद्द्यावरून आमची विरोधकांची एकच भूमिका आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प विरोधात उद्धव ठाकरेंनीदेखील मोठा मोर्चा काढला होता. त्यामुळे विरोधकांमध्ये एकजूट नाही, असं म्हणणं चुकीचं होईल.

राज्यात विरोधकच उरणार नाहीत- आम्ही सर्व एकत्रच आहोत, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जरी म्हटलं असलं तरी त्यांचेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विरोधकांनी पायऱ्यांवर उभारलेल्या आंदोलनाला एकही दिवस विधान भवनात उपस्थित नव्हते. यावर मात्र जितेंद्र आव्हाड यांनी शांत राहणं पसंत केलं. तर दुसरीकडे लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रसंगी राज्यात विरोधकच उरणार नाहीत, असं विधान अनेकदा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कधी काय होईल, हेही सांगता येत नसल्यानं विरोधकसुद्धा मूग गिळून गप्प आहेत.

हेही वाचा:

  1. मुंबई विमानतळावर व्हीलचेअरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एअर इंडियाला तीस लाखांचा दंड
  2. टाकाऊ प्लास्टिकच्या समस्येवर संशोधनातून विकासाचा 'रस्ता', अमरावतीच्या महाविद्यालयानं मिळविलं पेटंट
  3. यशस्वी भव! उद्यापासून दहावीच्या परीक्षेला होणार सुरुवात, परीक्षेसाठी 'इतक्या' विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.