ETV Bharat / state

बारामतीत रंगलं 'माँ का आशीर्वाद' नाट्य, देवेंद्र फडणवीसांनीही दिलं प्रोत्साहन - Loksabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 3:46 PM IST

Lok sabha election 2024 : अजित पवार बारामतीत कुटुंबापासून एकटे पडल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगली होती. आज जेव्हा बारामतीत लोकसभेचं मतदान सुरू झालं तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची आईही सामील झाली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी 'मेरी माँ मेरे साथ है', म्हणत डायलॉगबाजी केली त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

Ajit Pawar exercised his right to vote
अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला (Photo - Etv Bharat)

मुंबई - Lok sabha election 2024 : आज राज्यात ११ लोकसभा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होत असून यामध्ये बारामती या मतदार संघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेलं आहे. पवार कुटुंबीयांसाठी ही लढत अतिशय महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (भावजय) यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (नणंद) असा हा सामना रंगला आहे. अजित पवार यांच्या कुटुंबाविरोधात संपूर्ण शरद पवार कुटुंब व नातेवाईक एकवटले असून आज मतदानाच्या दिवशी अजित पवार यांनी आपल्या मातोश्री आशाताई पवार यांच्याबरोबर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, 'मेरे पास माँ है', असं म्हणाले. अजित पवारांचा हा डायलॉग अमिताभ बच्चन यांच्या 'दिवार' चित्रपटातील डायलॉगशी जोडला जात आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांनी 'माँ का आशीर्वाद बडा होता है', असं म्हटल्याने बारामतीत 'माँ का आशीर्वाद', वरून चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस (Photo and Video Etv Bharat)



मेरी माँ मेरे साथ है

बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या ८६ वर्षीय मातोश्री आशाताई पवार व बारामतीतील उमेदवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याबरोबर काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला. यानंतर संपूर्ण पवार कुटुंब तुमच्या विरोधात गेलं असताना तुमची आई तुमच्या बरोबर आहे, असं अजित पवार यांना विचारलं असता. ते म्हणाले की, पवार कुटुंबामध्ये सर्वात मोठी त्यांची आई आहे. आज त्यांची आई त्यांच्याबरोबर आहे. अशात बाकीच्यांचं काय सांगताय, 'मेरी माँ मेरे साथ है'. असा डायलॉग अजित पवारांनी लगावला आहे. अजित पवार यांच्या या डायलॉग नंतर राज्यभर या डायलॉगची चर्चा सुरू झाली. अजित पवारांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता ते म्हणाले की, मला वाटतं अजित पवार यांनी फार चांगलं उत्तर दिलं आहे. कारण शेवटी आई असणं व आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशिर्वाद काय असू शकतो. ज्याप्रकारे बारामतीमध्ये असं चित्र तयार करण्यात आलं की, अजितदादा एकटे पडले आहेत. परिवाराने त्यांना वाळीत टाकलं आहे. सर्वांनी मिळून त्यांना एकट पाडलं आहे, अशा परिस्थितीमध्ये, 'माँ का आशीर्वाद, इससे बडा और क्या है?' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.


सुप्रिया सुळे यांनी दिली अजित पवारांच्या घरी भेट

बारामतीमध्ये आज मतदानाच्या दिवशी अजून एक अनोखी घटना घडली. अजित पवार यांच्या भगिनी व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या काकी आशाताई यांची भेट घेतली. या भेटीवरूनही अनेक चर्चा रंगल्या आहेत. या भेटीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याला मी इमोशनल टॅक्टिस म्हणेन. निवडणुकीमध्ये काही भावनिक टॅक्टिस असतात त्यापैकी ही एक आहे. तरीही शेवटी ते शत्रू नाहीत. तर एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. तसेच भाऊ-बहीण असल्याकारणाने का एकमेकांना भेटले, का नाही भेटले. हे नंतर स्पष्ट होईलच.
पण निवडणुकीत अशा भावनिक गोष्टी घडतात.

Ajit Pawar exercised his right to vote
अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला (Photo - Etv Bharat)



काका - पुतण्यात अस्तित्वाची लढाई

यंदा राज्यातील प्रमुख लढतींमध्ये बारामतीमधील लढत ही अतिशय प्रतिष्ठित लढत असून पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवसात अनेक भावनिक मुद्दे येथे उपस्थित केले गेले. नणंद सुप्रिया सुळे विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार अशी ही लढाई असली तरी मुख्य लढाई ही काका शरद पवार व पुतण्या अजित पवार यांच्यातील वर्चस्वाची आहे. भावनिक मुद्द्यावर होत असलेल्या या लढाईमध्ये आता 'माँ का आशीर्वाद' अजित पवार यांच्या कुटुंबासोबत राहिल्याने व दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या मातोश्री व त्यांच्या काकी आशाताई पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने बारामतीत 'माँ का आशीर्वाद' नक्की कोणासोबत आहे याचा चित्र ४ जूनला स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -

  1. बारामतीत काट्याची टक्कर? सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्या लढतीत अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabah Election 2024
  2. पालघर लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलणार, खासदार राजेंद्र गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Rajendra Gavit join BJP
  3. तिसरा टप्पा : आमदार दत्ता भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल; मतदाराला शिवीगाळ करत असल्याचं दिसतंय - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.