ETV Bharat / sports

आठव्या सामन्याचा 'आठवावा प्रताप'! 1 सामना, 7 विक्रम अन् 523 धावा...; हैदराबाद-मुंबई सामन्यात षटकार चौकारांनी गोलंदाजांचा 'अभिषेक' - IPL 2024 SRH vs MI

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 7:50 PM IST

Updated : Mar 28, 2024, 6:37 AM IST

आठव्या सामन्याचा 'आठवावा प्रताप'! 1 सामना, 7 विक्रम अन् 523 धावा...; हैदराबाद-मुंबई सामन्यात षटकार चौकारांनी गोलंदाजांचा 'अभिषेक'
आठव्या सामन्याचा 'आठवावा प्रताप'! 1 सामना, 7 विक्रम अन् 523 धावा...; हैदराबाद-मुंबई सामन्यात षटकार चौकारांनी गोलंदाजांचा 'अभिषेक'

IPL 2024 SRH vs MI : बुधवारी झआलेल्या आयपीएलच्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा 31 धावांनी पराभव करत या हंगामातील पहिला विजय मिळवला.

हैदराबाद IPL 2024 SRH vs MI : आयपीएल 2024 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केलाय. या सामन्यात हैदराबादनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 20 षटकात 5 बाद 246 धावाच करू शकला. तिलक वर्मानं मुंबईसाठी बराच वेळ प्रयत्न केला आणि 64 धावांची शानदार खेळीही खेळली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

नाणफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय : या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हीच त्यांच्यासाठी या सामन्यात मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. मुंबई या धावसंख्येचा पाठलाग करू शकली नाही. मुंबईच्या फलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले असले तरी विजय मिळवता आला नाही.

मुंबईची आक्रमक सुरुवात : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या असलेल्या 278 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई संघाची चांगली सुरुवात झाली. रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 20 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. पण त्यांना चौथ्या षटकात इशान किशनच्या रुपानं पहिला धक्का बसला. तो 13 चेंडूंत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 34 धावा काढून बाद झाला. त्यानंतर मुंबईनं रोहित शर्माच्या रुपानं दुसरी विकेट गमावली. तो पाचव्या षटकात 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 26 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी 37 चेंडूत 84 धावांची भागीदारी केल्यानं चाहत्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्या. पण ही भागीदारी 11 व्या षटकात 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 30 धावा करुन बाद झालेल्या नमन धीरच्या विकेटनं संपुष्टात आली.

टीम डेव्हिडचे प्रयत्न अपुरे : नंतर 15 व्या षटकात टिलक वर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला, त्यानं 34 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार लगावत 64 धावा केल्या. यानंतर 18व्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्याच्या रुपानं संघाला पाचवा धक्का बसला. कर्णधार पंड्यानं 20 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार मारत 24 धावा केल्या. बाद होण्यापूर्वी हार्दिकनं टीम डेव्हिडसोबत पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली होती. टीम डेव्हिडनं शेवटपर्यंत उभं राहून 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 42 धावा केल्या, मात्र संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

हैदराबादची ऐतिहासिक धावसंख्या : तत्पुर्वी फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकांत 3 बाद 277 धावा केल्या. जी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. हेनरिक क्लासेननं संघासाठी सर्वात मोठी खेळी केली. त्यानं 34 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. याशिवाय अभिषेक शर्मानं 23 चेंडूंत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं 63 धावा केल्या होत्या. तर सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडनं 24 चेंडूंत 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 62 धावा केल्या.

बंगळुरुचा 11 वर्षे जुना विक्रम मोडित : प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स संघानं चांगली सुरुवात करत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यासह त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) 11 वर्षे जुना विक्रम मोडीत काढलाय. आरसीबीनं 23 एप्रिल 2013 रोजी पुणे वॉरियर्सविरुद्ध 5 गडी गमावून 263 धावा केल्या होत्या. या सामन्यात ख्रिस गेलनं 66 चेंडूत 175 धावांची शानदार केली होती.

या हंगामातील सर्वात जलद 2 अर्धशतकं : सनरायझर्स संघासाठी सर्वप्रथम ट्रॅव्हिस हेडनं या मोसमातील सर्वात जलद अर्धशतक 18 चेंडूत केले. यानंतर अभिषेक शर्मानं काही वेळातच हा विक्रम मोडीत काढत अवघ्या 16 चेंडूत शानदार अर्धशतक ठोकलं. या मोसमातील हेडचा हा पहिलाच सामना होता. त्यानं 24 चेंडूत 62 धावा केल्या. तर अभिषेक शर्मानं 23 चेंडूत 63 धावा केल्या.

हेही वाचा :

  1. चेन्नईत ऋतुचा 'राज'; गुजरात विरुद्ध चेन्नईची विजयी हॅट्रीक, हंगामातील दुसरा विजय - CSK vs GT
  2. माझं नाव फक्त T20 क्रिकेटच्या प्रचाराशी जोडलं जातंय - विराट कोहली - Virat Kohli on t20 cricket
Last Updated :Mar 28, 2024, 6:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.