अमरावती Anandraj Ambedkar : हिंदी सिनेमातील डायलॉग प्रमाणं "आज तुम्हारे पास क्या हैं? मेरे पास मेरा भाई हैं" आणि आता हा भाऊच निवडणुकीच्या लढाईत मदत करण्यासाठी सरसावला आहे. ऐनवेळी भावाची मदत करण्यासाठी धाऊन आल्यानं राजकारणात अजूनही बंधुभाव जिवंत असल्याचा प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील मतदारांना येत आहे.
उमेदवारी अर्ज केला दाखल : लोकसभेच्या अमरावती मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांनी आज (मंगळवारी) अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला.
आनंदराज आंबेडकर निवडणूक रिंगणात : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे अमरावती लोकसभा निवडणूक लढवत आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांनी दौरे करुन जिल्ह्यात गाठीभेटी वाढवल्या होत्या. मविआचा उमेदवार असल्याचा दावा त्यांनी महिनाभरापूर्वी केला होता. परंतु मविआनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिल्यानं आंबेडकर आता त्यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचं सोमवारी सांगितलं.
आनंदराज आंबेडकर यांना वंचितचा पाठिंबा : आनंदराज यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिल्याची माहिती सोमवारी सायंकाळी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली होती. प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित आघाडीनं प्राजक्ता पिल्लेवान या नवतरुणीला उमेदवारी दिली आहे. त्यामुळं वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. राजकारणात सगळीकडं अस्थिर आणि विचारधाराहीन वातावरण असतानाच, प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या लहान भावाला पाठिंबा देऊन राजकारणात भावकी जिवंत ठेवली असल्याची चर्चा मतदारांनामध्ये रंगली आहे.
लोकशाही आली धोक्यात : खासदारांचे निलंबन करून आपल्याला हवे ते कायदे केंद्र सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षानं करवून घेतले आहेत. अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. जिल्ह्यात आयटी सेक्टर उभारण्यावर आपला भर राहणार असून स्थानिक तरुणांना नोकरीसाठी पुणे, मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.
म्हणून वंचितने दिला पाठिंबा : आनंदराज आणि प्रकाश हे दोघे भाऊ असून ते यशवंत आंबेडकर यांचे पुत्र तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघात आंबेडकरी समुदायाची मते ही निर्णायक आहेत. वंचितच्या महाविकास आघाडी सोबतच्या सर्व वाटाघाटी फिस्कटल्यानंतर आंबेडकरी समुदायाची मते अन्यत्र कुठे वळू नये यासाठी वंचितनं कोणत्याही प्रचलित चेहऱ्याला तिकीट न देता प्राजक्ता पिल्लेवान सारख्या अनोखळी आणि प्रकाश झोतात नसलेल्या चेहऱ्याला उमेदवारी दिली गेली असल्याची चर्चा आहे. एकंदरीत आंबेडकरी समुदायाच्या मतांचे ध्रुवीकरण टाळण्यासाठी आंबेडकर बंधूंनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातय.
हेही वाचा -
- नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News
- महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections
- प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसचे डॉ. अभय पाटील लढणार, राज्यात वंचितचा कुणाला बसणार फटका ? - lok sabha election 2024