ETV Bharat / politics

उदयनराजेंवर शरद पवारांची खोचक टीका; म्हणाले, राजाबद्दल आम्ही प्रजेनं काय सांगायचं, त्यांची स्थिती... - lok sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 10:17 PM IST

Updated : Apr 15, 2024, 10:57 PM IST

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंबद्दलच्या प्रश्नावर खोचक टिपण्णी केली आहे. राजाबद्दल आम्ही प्रजेनं काय सांगायचं, त्यांची स्थिती तुम्हाला दिसतेयच, असं पवार यांनी म्हटलंय.

Lok Sabha Election 2024
शरद पवार

प्रतिक्रिया देताना शरद पवार

सातारा Lok Sabha Election 2024 : महायुतीची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही. दिल्लीला गेल्यानंतर उदयनराजेंना भाजपा नेतृत्वानं चार दिवस ताटकळत ठेवल्याबद्दलच्या प्रश्नावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी खास आपल्या शैलीत खोचक टिपण्णी केली. राजाबद्दल प्रजेनं काय सांगायचं. त्यांची एकंदर स्थिती काय आहे, ते तुम्हाला दिसतेयच, अशा शब्दांत त्यांनी उदयनराजेंबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच आम्हाला खात्री आहे की, लोकांच्यात गेल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल आस्था बघायला मिळेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.



सातारा जिल्हा परिवर्तनाच्या तयारीत : राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ देणाऱ्या सातारा जिल्ह्याबद्दल शरद पवार म्हणाले, साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे की सातारा नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा जिल्हा आहे. स्वातत्र्य चळवळीत योगदान देणारा जिल्हा आहे. स्वातत्र्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, अशा कर्तृत्ववान लोकांची फळीच इथं होऊन गेली. त्यांच्या विचारांचा पगडा आजही सामान्य लोकांवर आहे. आज देशात जे काही घडतंय. त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीनं इंडिया आघाडीच्या मार्फत जे प्रयत्न सुरू आहेत. त्याला प्रतिसाद द्यायला सातारा जिल्हा अग्रभागी आहे. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून आमचा आत्मविश्वास वाढविण्याचं काम आज सातारकरांनी केलंय.



नाणं खणखणीत असल्यानं चिंता नाही : आमदार शशिकांत शिंदेंवर सुरू असलेल्या घोटाळ्यांच्या आरोपांसदर्भात छेडलं असता शरद पवार म्हणाले, आरोप करणाऱ्यांकडे शशिकांत शिंदेंच्या कामाबद्दल सांगण्यासारखं दुसरं काही नाही. लोकांचा शिंदेंना प्रतिसाद मिळणार, याची त्यांना खात्री असल्यामुळं ते चुकीच्या रस्त्याने जातायत. स्वतंत्र पत्रकार परिषद घेउन सर्व परिस्थिती लोकांसमोर ठेवा, असं मी शशिकांत शिंदेंना सुचवलं आहे. ते उद्या (मंगळवारी) खुलासा करणार आहेत. आपलं नाणं खणखणीत असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



फलटणकरांची मानसिकता स्वच्छ : रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक-निंबाळकर काल अलकलूजला आले होते. फलटणमधील लोकांचा पाठिंबा धैर्यशील मोहिते- पाटील यांना राहिल. आमचे सहकारी पूर्ण ताकदीने उमेदवाराचे काम करतील, असं त्यांनी सांगितल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तुतारीच्या उमेदवाराचे काम करण्याची नाईक-निंबाळकरांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ दिसली, असंही शरद पवार म्हणाले.



मोदींची एक-एक जागा कमी केली पाहिजे : देशामध्ये आपली एक-एक जागा निवडून आणली पाहिजे आणि मोदींची एक-एक जागा कमी केली पाहिजे, हाच सगळ्यांचा (इंडिया आघाडी) विचार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष जीवाभावाने निवडणुकीत उतरलेत, असं सांगून शरद पवार म्हणाले, विदर्भ हा इंदिरा गांधींपासून काँग्रेसला सपोर्ट करणारा विभाग असल्याचा आमचा आजवरचा अनुभव आहे. एकंदर राज्यात आम्हा सगळ्यांची परिस्थिती सुधारली. त्याच्यामध्ये विदर्भाचं, काँग्रेस पक्षाचं चित्र अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम एकंदर राज्यावर दिसेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.



राज ठाकरेंचं अधूनमधून मन परिवर्तन होतं : महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंचं मन परिवर्तन झालं असेल. ते होत असतं अधूनमधून. त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघितला तर त्या स्थितीत त्यांना जे योग्य वाटतं त्याबद्दल मोकळेपणाने ते आपली मते मांडत असतात, असं पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. भाजपाचं 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी; देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतांची गॅरंटी - Lok Sabha Election 2024
  2. महायुतीचे शक्ती प्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी भरला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Election 2024
  3. संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज; आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल - Shrikant Shinde On Sanjay Raut
Last Updated : Apr 15, 2024, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.