ETV Bharat / politics

पुण्याचं व्हिजन मांडत असताना मोहोळ आणि धंगेकर यांच्यात जुंपली; शेवटी वसंत मोरेंनी घेतला 'मनसे'चा सहारा - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 5:10 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यामध्ये तिरंगी लढत होईल अशी चिन्हं आहेत. भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), 'मविआ'चे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि 'वंचित'चे वसंत मोरे (Vasant More) अशी ही लढत होणार आहे. दरम्यान, आज तीनही उमेदवारांनी पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या विकासकामांवरून धंगेकर-मोहोळ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

Lok Sabha Election 2024
मोहोळ आणि धंगेकर यांच्यात जुंपली

पत्रकार परिषद मध्ये बोलताना मोहोळ आणि धंगेकर

पुणे Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत पुण्याचं व्हिजन काय, याबाबत महायुती तसेच महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी आपापलं व्हिजन सांगितलं. पुणे शहरातील वाहतूक कोंडी, आरोग्य व्यवस्था वगैरे मुद्द्यांवर व्हिजन मांडत असताना, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी वैयक्तिक टीका न करता पुण्यातील व्हिजनवर बोला अशी विनंती तिन्ही उमेदवारांना करावी लागली. त्यामुळे हा वार्तालापाचा कार्यक्रम पुण्याच्या व्हिजन पेक्षा एकमेकांना चिमटे काढण्याच्या वक्त्यांच्या प्रयत्नांमुळे उपस्थितांच्या लक्षात राहिला. आज, दिनांक 16 मार्च रोजी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, भाजपाचे मुरलीधर मोहोळ आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे (Vasant More) यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.


पुणे शहराचं व्हिजन : यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "ही देशाची निवडणूक आहे. पुणे शहराचं व्हिजन काय आहे तर शहराचा खासदार म्हणून स्थानिक प्रश्न, राज्यातील प्रश्न तसेच माझं शहर देशात एक नंबरला यावं यासाठी प्रयत्न करणार. राजकीय विषय बाजूला ठेवून जे नागरी प्रश्न आहे ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न असणार आहे. वाहतूक कोंडी, पाणी, विमानतळ, मेट्रो असे प्रश्न पुण्यात आहेत. केंद्राच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न असेल. मागील 30 वर्षापूर्वी या प्रश्नांचा विचार झालेला नाही आणि योग्य नियोजनदेखील करण्यात आलेलं नाही."

देशात आल्या असंख्य योजना : दहा वर्षांत मोदी सरकारने देशात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्याचा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला. "केंद्रातून ज्या ज्या योजना मिळाल्या त्या थेट लाभार्थ्याच्या खात्यात गेल्या आहेत. हा क्रांतिकारी बदल आहे. अशा असंख्य योजना आज या देशात आल्या आहेत. तसेच जागतिक स्थरावर 5 व्या स्थानावर देशातील अर्थव्यवस्था आली आहे. पुण्यातील कागदावरील मेट्रो ही वास्तवात आली आहे. पुण्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 350 बसेस, चांदणी चौकातील रस्ते झाले. तसेच कोविड काळात महापालिकेने केंद्र सरकारच्या माध्यमातून पहिलं मेडिकल कॉलेज झालं. अनेक योजना या पुणे शहराला मिळाल्या आहेत," असं यावेळी मोहोळ यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक योजना तसेच रस्ते, उड्डाणपूल आणि ई बसेस देण्यात आली. ही देशातील निवडणूक असून देशातील विकास, देशाच स्थान असे अनेक प्रश्न या निवडणुकीत आहेत. मागील 10 वर्षाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची आहे. भविष्यात काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था, ई बसेस, मेट्रोचा विस्तार आणि एका तिकिटावर मेट्रो आणि पीएमपीएमएल आणणं, नदी प्रकल्प पूर्ण करणं, मेट्रो शहरातील अनेक भागाशी जोडणं, पुरंदरचं विमानतळ, पुण्यातील विमानतळची धावपट्टी वाढवणं, 'स्वच्छ पुणे सुंदर पुणे प्रकल्प' राबविणं, असं अनेक व्हिजन पुढे पूर्ण करायची आहेत असं आश्वासन मोहोळ यांनी दिलं.

कात्रजचा पॅटर्न पुणे शहरात राबवणार : यावेळी वसंत मोरे म्हणाले की, "पुणे शहराच्या बाबतीत विचार करताना कात्रजचा पॅटर्न पुणे शहरात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. अहवाल जे बनवले जातात ते पूर्ण होणार नाही. शहरातील वाहतुकीचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण वाहतूक कोंडीनं ग्रस्त आहे. फक्त उड्डाणपुल बांधून वाहतूक कोंडी सुधारणार नाही. वाहतुकीचा ताण हा एसटी आणि बसला येत आहे. यांच्यासाठी शहरातील चारही बाजूला स्थानके तयार करावी लागणार आहेत. जेवढ्या जास्त बसेस घेणार त्याचं योग्य नियोजन न केल्यास पुन्हा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. अनेक ठिकाणी बसेस रस्त्यावर उभा असतात. बसेसचं नियोजन केलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. शहराचा एक स्वतंत्र धरण होणार का? हे खूप महत्त्वाचं आहे. एवढा ज्वलंत प्रश्न असताना शहरात ट्रॅफिक इंजिनिअर, वॉटर इंजिनियर, कचऱ्याचा इंजिनियर का नाही? हे देण्याचं माझं व्हिजन असणार आहे."



महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय : नदीसुधार प्रकल्प जर आपण बघितलं तर यात नद्या बुजवल्या जात आहेत. घाण पाणी नदीत सोडलं जात आहे. लोकांसाठी आपण विष देत आहोत. तसेच सुरक्षा व्यवस्था ही देखील खूप महत्त्वाची आहे. महिलांवर अन्याय होत आहे. महिलांसाठी स्वतंत्र महिला पोलीस आयुक्तालय असणं खूप गरजेचं आहे. अमली पदार्थच्या बाबतीत शाळांच्या आजपास हे अमली पदार्थ भेटत आहेत. तसेच शहरातील आरोग्य व्यवस्था देखील कमकुवत झालीय. स्मार्ट सिटी ही कागदावर न आणता ती प्रत्यक्षात आणली पाहिजे. शहरातील वाचनालय वाढवण्यात यायला पाहिजे. तसेच पुणे शहरातील स्मारके हे फक्त जयंती आणि पुण्यतिथीला साफ न करता ते नेहेमी स्वच्छ राहिले पाहिजे. कोणाच्या मागे बसून मला बाक वाजवायची नाही तर, पुणे शहरासाठी हे जो व्हिजन आहे ते पूर्ण करायचं आहे," असं मोरे म्हणाले.

काय आहे धंगेकर यांचं व्हिजन? : यावेळी धंगेकर म्हणाले की, " मी पुण्याच्या ज्या समस्या मांडणार आहे त्या आधीच्या उमेदवारांनी मांडल्या आहेत. वाहतूक, मेट्रोशी संबंधित अनेक समस्या सोडवण्यावर भर देणार आहे. पुण्याच्या मेट्रोच्या आधी नागपूरच्या मेट्रोचं उद्घाटन झालं, पण पुण्यातील मेट्रोचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. या दहा वर्षांत जे आल्याचा दावा केला जातोय ते वास्तविक 70 वर्षांपूर्वीच आलेलं आहे. आत्ता फक्त रंगरंगोटी केली जात आहे. शहरात अनेक प्रश्न आहे जे अजूनही पूर्ण झालेले नाहीत. निसर्गाचं वरदान मातीमोल ठरवण्याचं काम केलं जात आहे. अनेक योजना ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणल्या त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. शहरातील अनेक प्रश्न असून ते सोडवण्याचा प्रयत्न मी करणार आहे."

उमेदवार स्वतःच्या धोरणाबाबत काय म्हणाले? : यावेळी तिन्ही उमेदवारांना स्वतःच्या धोरणाबाबत विचारलं असता मोहोळ आपण म्हणाले की, "मी गेली 30 वर्ष एकाच पक्षात असल्याचं सांगत मोरे आणि धंगेकर यांनी केलेल्या पक्षांतराचा उल्लेख केला. यावर प्रत्युत्तर देताना वसंत मोरे यांनी आपल्या पक्षबदलाची भूमिका आधीच स्पष्ट केल्याचं सांगितलं. तर धंगेकर यांनी मोहोळ कधीकाळी मनसेमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं सांगत मोहोळ यांच्या एकनिष्ठ असल्याच्या दाव्याची हवा काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -

  1. भाजपाकडून उदयनराजे भोसले यांना अखेर उमेदवारी जाहीर, काय आहे साताऱ्यात स्थिती? - udayanraje bhosle
  2. उदयनराजेंवर शरद पवारांची खोचक टीका; म्हणाले, राजाबद्दल आम्ही प्रजेनं काय सांगायचं, त्यांची स्थिती... - lok sabha election 2024
  3. भाजपाचं 'संकल्प पत्र' नसून मोदी सरकारची गॅरंटी; देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद सावंतांची गॅरंटी - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.