ETV Bharat / politics

राज्यसभेसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, 'आयारामांचं' नशिब फळफळलं; अजित पवार गटाचे मात्र 'वेट अ‍ॅंड वॉच'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 3:30 PM IST

Updated : Feb 14, 2024, 4:07 PM IST

Rajya Sabha Election 2024 : भाजपानं राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील तीन जणांना उमेदवारी दिलीय. तसंच शिवसेना शिंदे गटाकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलीय. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) चा उमेदवार अद्याप जाहीर होणं बाकी आहे.

Rajya Sabha Election 2024
Rajya Sabha Election 2024

पुणे Rajya Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून तसंच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. यात पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी जाहीर झालीय. जेव्हापासून मंत्री चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. तेव्हापासून कुलकर्णी भाजपामध्ये नाराज होत्या. विद्यमान आमदार असताना सुद्धा त्यांचं तिकीट कापण्यात आल्यानं ब्राह्मण समाजात सुद्धा मोठी नाराजी होती. त्याचा फटका पुण्यात भाजपाला मोठ्या प्रमाणात बसला. भारतीय जनता पक्षामध्ये ब्राह्मण नेतृत्वाला नाकारलं जात असल्याची टीका त्यावेळी झाली होती. तीच नाराजी दूर करण्यासाठी आता मेधा कुलकर्णी यांना भाजपा राज्यसभेवर पाठवत आहे. तसंच मंगळवारीच भाजपामध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही भाजपानं राज्यसभेची उमेदवारी दिलीय.

अशोक चव्हाण यांची वर्णी लागणार हे निश्चित होतं- भाजपानं महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी घोषित केलेल्या नावांमध्ये अशोक चव्हाण यांचे नाव सर्वप्रथम ठरले गेले होते. याचं कारण मागील दोन दिवसाच्या घडामोडीनंतर त्यांनी तात्काळ भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशोक चव्हाण यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोनच दिवसाचा अवधी असल्याकारणानं काल घाईगडबडीमध्ये त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत छोटेखानी भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश झाला होता. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना अशोक चव्हाण यांनी कुठलीही अपेक्षा ठेवली नाही, असं जरी म्हटलं असलं तरी आजच्या त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर ते राज्यसभेवर जाणार या अटीनंच त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचं निष्पन्न झालं आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून अठराव्या लोकसभेत मंत्री पदासाठी त्यांची वर्णी लागण्याचीही मोठी शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी उमेदवारीबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.



डॉक्टर अजित गोपछडे यांना लॉटरी- भाजपानं घोषित केलेल्या उमेदवाराच्या यादीत एक अनपेक्षित असा चेहरा पुढे आला आहे, तो म्हणजे नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे. नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते अनेक काळापासून या संधीची वाट पाहत होते. असे असले तरी सध्या राज्यसभेसाठी भाजपकडून चर्चेला असलेल्या नावात त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. अजित गोपछडे यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. यापूर्वी नांदेडमध्ये लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान उमेदवाराच्या यादीतही त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. डॉक्टर अजित गोपछडे यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरींच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलेल्या संधीच सोनं करणार, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अजित गोपछडे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत
अजित गोपछडे हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत

मेधा कुलकर्णींची नाराजी दूर : मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं पुणे भाजपामध्ये मोठा उत्साह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या नाराज असल्यानं मध्यंतरी नितीन गडकरी यांनी सुद्धा त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती. त्यांची नाराजी त्यांनी सातत्यानं बोलून दाखवली होती. भाजपामध्ये हक्काचा असणारा ब्राह्मण मतदार आपल्याकडे राहावा यासाठी मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आल्याचं बोललं जातंय. पुण्यातून यापूर्वी प्रकाश जावडेकर हे राज्यसभेवर खासदार होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानं पुन्हा एकदा राज्यसभेवर पुण्यातील व्यक्तीला भाजपानं संधी दिलीय. त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये व्हावा अशी भाजपाची अपेक्षा आहे. मध्यंतरीच्या काळात कसबा विधानसभा मतदारसंघात सुद्धा गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांना संधी दिली गेली नाही. त्यामुळं तिथं काँग्रेसला विजय प्राप्त झाला होता. तेव्हापासूनच मेधा कुलकर्णी यांचंसुद्धा राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं बोललं जात होतं. अखेर मेधा कुलकर्णी यांची प्रतीक्षा संपली असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

मेधा कुलकर्णी पंतप्रधान मोदींसमवेत
मेधा कुलकर्णी पंतप्रधान मोदींसमवेत

नांदेडच्या दोघांना उमेदवारी : भाजपानं राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे या दोन्ही नांदेडच्या नेत्यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी मंगळवारीच भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपाकडून अधिकृत माहिती देण्यात आलीय. तर अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असणाऱ्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलंय. याशिवाय ते कारसेवकही आहेत. सध्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. त्यांना उमेदवारी देऊन भाजपानं लिगायत समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतंय.

शिंदेंच्या शिवसेनेकडून देवरांना उमेदवारी : भाजपानं राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील तीन उमेदवारांची घोषणा करताच शिवसेना शिंदे गटानं देखील आपला उमेदवार जाहीर केलाय. शिवसेनेच्या शिंदे गटानं मिलिंद देवरा यांना राज्यसभेचं तिकीट दिलंय. गेल्या महिन्यात लोकसभेची जागा ठाकरे गट आपल्याला सोडत नसल्यामुळं बिनसल्यानं मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती. त्यानंतर त्यांना आता राज्यसभेचं एकप्रकारे बक्षीसच मिळालंय.

हेही वाचा :

  1. राज्यसभा निवडणूक! महायुतीच्या नेत्यांची रात्री 'खलबतं', तर काँग्रेसकडून आमदारांची जुळवाजुळव
  2. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक आयोगाला पत्र
Last Updated :Feb 14, 2024, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.