ETV Bharat / politics

पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात अजित पवार यांचा सहभाग नसल्यानं चर्चांना उधाण - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 8:00 PM IST

Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) कल्याण, दिंडोरी सभेसह रोड शोमध्येही अजित पवार (Ajit Pawar) गैरहजर असल्यानं विविध चर्चा सुरू आहेत.

Devendra Fadnavis And Ajit Pawar
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Mumbai Reporter)

प्रतिक्रिया देताना उमेश पाटील आणि प्रसाद लाड (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : भारतात सर्वात जास्त खासदार देणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं विशेष लक्ष महाराष्ट्रसह मुंबईकडं दिलं असून पाचव्या टप्प्यातील मुंबईत होणाऱ्या मतदानाच्या धर्तीवर नाशिक आणि कल्याण येथील सभेनंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 'रोड शो' आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधानांच्या मेगा रोड शोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सहभागी नसल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.



अजित पवार गेले कुणीकडं : पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत घाटकोपर अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रीजपर्यंतचा अडीच किलोमीटचा 'रोड शो' पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोड शोच्या माध्यमातून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करताना दिसले. मात्र, दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोड शोत दिसले नाहीत. यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.



अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन : चौथ्या टप्प्यातील प्रचारसभांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला होता. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीड, चाकण, शिरूर, पुणे अशा विविध ठिकाणी सभा घेतल्या. मात्र, गेल्या तीन चार दिवसापासून त्यांचा पाचव्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग दिसत नाही. मोदींच्या मुंबईतील रोड शोत सहभागी नसल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता उमेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थ्रोट इन्फेकशन झालं आहे. त्यांना आरामाची गरज आहे. उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत ते तुम्हाला दिसतील. तसंच त्यांना मोदी यांच्या रोड शो पासून दूर ठेवण्यात आलं नाही. अजित पवार यांच्यासारखा मास लीडरला प्रचारापासून दूर ठेवून कोण स्वतःचं नुकसान करून घेईल असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर पलटवार केलाय.

अजित पवार अनुपस्थित, नॉट रिचेबल आणि नाराजी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी राजकीय अंदाज लावणं अवघड आहे. अजित पवार नाराज, अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार भेट देत नाहीत, एखाद्या महत्त्वाच्या शासकीय, राजकीय, पवार कौटुंबिक कार्यक्रमात अजित पवार अनुपस्थिती असले तरी महाराष्ट्रात चर्चा सुरू होतात. त्यातल्या त्यात अजित पवार गायब, नॉट रिचेबल राज्याच्या राजकारणातला महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे.

पहाटेचा शपथविधी : 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार अश्याच प्रकारे गायब होऊन राजभवन येथे पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यानंतर अजित पवार यांच्या ‘नॉट रिचेबल’ ला अतिशय गांभीर्यानं पाहिलं जातं. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांनी सगळी सूत्रं हलवली आणि अजित पवारांसोबत दिलेले आमदार परत स्वगृही परतले होते. त्यानंतर दोन दिवस अजित पवार 'नॉट रिचेबल' होते. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेकवेळा शरद पवारांकडं अंगुलीनिर्देश केला जात आहे. 2022 साली मार्च महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. त्यात अजित पवार यांनी भाषण न करता निघून गेले होते. त्यावेळी अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. मात्र, आपण नाराज नसून वॉशरूमला जायचं नाही का? वेळेअभावी आपण भाषण केलं नसल्याचं कारण देत त्यांना मुंबईत पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.

2023 ला अजित पवार नॉट रिचेबल : शिर्डीत 4 आणि 5 नोव्हेंबर 2022 साली पक्षाचं अधिवेशन पार पडलं, त्याला देखील अजित पवार अनुपस्थित होते. याबाबत पत्रकार परिषद घेऊन आपण परदेश दौऱ्यावर होतो. माझ्या कार्यालयास संपर्क करून खात्री करून घेऊन मगच बातम्या चालवायला हव्या होत्या असं, अजित पवार म्हणाले होते. 7 एप्रिल 2023 रोजी देखील अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. पुण्यातील त्यांचे दोन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आठ तारखेला एका शोरूमच्या उद्घाटनात दिसले होते. मी कुठे गेलो नाही पुण्यातच आहे, पित्ताचा त्रास असल्यामुळं आराम करत होतो, असं त्यांनी सांगितलं होतं.



काँग्रेसला पराभव समोर दिसतोय : काँग्रेसला आपला पराभव समोर दिसत आहे. त्यामुळं काँग्रेस पक्षाकडून अशा प्रकारची वक्तव्यं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात केली जात आहेत. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदार संघात आणि धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणेमध्ये मतदान होणार यासाठी रणनीती अखली गेली आहे. उद्या महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पावर तुम्हाला दिसतील असं, प्रसाद लाड यांनी सांगितलंय.





वापरा आणि फेकून द्या अंदाज आला असावा : राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात दोनवेळा उपमुख्यमंत्री अजित पवार सामील होऊ शकले नव्हते. यावर त्यांनी नंतर खुलासा दिला होता की, नियोजित कार्यक्रमांमुळं मला उपस्थित राहता आलं नाही. आता कालच्या रोडशो दरम्यान अजित पवारांची अनुपस्थिती प्रकृतीच्या अस्वस्थतेचं कारण समोर येतय. त्यामुळं त्या संदर्भात गैरसमज करणं योग्य होणार नाही. पण मुंबईतील 'रोड शो' मध्ये अजित पवार नसणं हे स्वाभाविक आहे. कारण की, माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अस्तित्व शून्य असल्याचा दावा, हेमंत देसाई यांनी केलाय.

भाजपाच्या वागण्यातून अजित पवारांना संकेत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्यासोबत आल्यामुळं आमचे कार्यकर्ते नाराज झाले होते. आम्ही त्यांची समजूत काढल्याचं ते म्हणाले. यापूर्वी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची तडजोड असून नॅचरल युती ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळं आपली मर्यादा सगळ्यांना माहीत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फारसा उपयोग झालेला नसावा. कारण की, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ते अडकून पडले होते. भाजपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महायुतीसाठी प्रचारात उपयोग करता आला. भाजपाच्या वागण्यातून अजित पवारांना संकेत मिळत असेल की, आपला देखील वापर करून फेकून दिला जाईल का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्याला फायदा झाला नसावा असं भाजपाला वाटत असल्यामुळं त्यांच्यात अंतर निर्माण झालं असावं, असा अंदाज राजकीय विश्लेषण हेमंत देसाई यांनी व्यक्त केलाय.



मतदारांची नाराजी ओढवू नये म्हणून... : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'रोड शो' तील अनुपस्थितीमुळं अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना आपल्यासोबत घेऊन भाजपा फसली आहे, असं आपल्याला वाटत असल्याचं राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी म्हटलंय. भाजपाला लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असा जो कयास लावला जात होता तो कुठेतरी खोटा ठरत असल्याचं दिसत आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेच अजित पवार भाजपासोबत आल्यामुळं भाजपाचे कोर मतदार नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापासून त्यांनी अनेकवेळा स्वतःला दूर ठेवल्याचं आपण पाहिलं आहे. मतदारांची नाराजी होऊ नये म्हणून त्यांना कदाचित सांगितलं असावं असं उदय तानपाठक सांगतात.



दूर राहिले की ठेवलं : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान मोदी यांच्या 'रोड शो' पासून दूर ठेवलं का ते दूर राहिले हा जाणून घेण्याचा विषय आहे. अजित पवार एकही जागा जिंकत नाहीत. त्यामुळं 'खोलो चबाव और फेक दो' अशा प्रकारची रणनीती ही भाजपाची राहिली आहे. घाटकोपर सारख्या ठिकाणी 90 टक्के गुजराती समाज राहतो. मात्र, पंतप्रधानांच्या रोड शोसाठी अहमदाबाद इथून 500 गाड्या भरून आणाव्या लागत असतील. तेथे जाऊन आपलं नाक कशाला कापून घ्यायचं अशा प्रकारचा विचार अजित पवारांचा असू शकतो असा दावा, काँग्रेसे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.



हेही वाचा -

  1. राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election
  2. मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show
  3. मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.