ETV Bharat / politics

'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 11:16 AM IST

Navneet Rana
Navneet Rana

खासदार नवनीत राणा यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असला तरी त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्याबाबत दोघांनीही भूमिका स्पष्ट केली. ते माध्यमांशी बोलत होते.

अमरावती- मी भारतीय जनता पक्षामध्ये एक कार्यकर्ता आहे. माझे नेते अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे आहेत. भाजपमध्ये येण्याचा निर्णय मी स्वतः माझ्या मर्जीनं घेतला आहे. आमदार रवी राणा यांची स्वतःची युवा स्वाभिमान पार्टी आहे. ते भाजपमध्ये येतील की हे आमचं आम्ही ठरवू. खरंतर आमच्या नवरा बायकोमध्ये कोणी न बोललेलं बरं, अशी भूमिका असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं.



प्रचार कार्यालयात उभारली गुढी- अमरावती शहरातील रेल्वे स्थानक परिसरात नवनीत राणा यांच्या प्रचार कार्यालयात सकाळी नवनीत राणा यांनी गुढी उभारली. एक दिवस नवनीत राणा या रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील असा विश्वास काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता नवनीत राणा यांनी गंमतीशीर उत्तर देऊन नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका, अशी विनंती केली. लोकसभा निवडणुकीत मला माझ्या विजयाची खात्री आहे. यानंतर विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास खासदार नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.



अमरावती पर्यटनाला देणार महत्त्व- अमरावती शहर आणि जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. दर्यापूर तालुक्यातील लासुर येथील महादेवाचे मंदिर हे अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे आहे. पुरातत्त्व विभाग या मंदिराचे जतन करीत आहे. भविष्यात लासुरचे मंदिर हे मोठे पर्यटन स्थळ होण्याबाबत माझे प्रयत्न असतील. यासह रिद्धपूर, कौडण्यपूर या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचादेखील विकास केला जाईल. मेळघाट तर पर्यटनासाठी सर्वात उत्कृष्ट आहे. चिखलदरा येथेच स्कायवॉक लवकरच सुरू होईल. सोबतच मेळघाटात केबल वॉक, जंगल सफारी सुरू करण्यावर माझा भर असेल, असेदेखील नवनीत राणा म्हणाल्या.

नेत्यांचा केवळ देशसेवेच्या हेतूनं भाजपामध्ये प्रवेश- खासदार नवनीत राणांचे पती रवी राणा यांनीदेखील भाजपामधील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. रवी राणा म्हणाले, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश विकासाचा मोठा टप्पा गाठत आहे. मोदींच्या माध्यमातून देशाची सेवा होत आहे. काँग्रेससह अनेक पक्षातील नेते भाजपामध्ये केवळ देशसेवेच्या हेतूनं जात आहेत. मी कदापी भाजपमध्ये जाणार नाही. माझा युवा स्वाभिमान पक्ष मी सोडणार नाही. मात्र माझ्या पक्षाचा भाजपाला देश हितासाठी सदैव पाठिंबा असल्याचे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.



गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांचा भाजपात प्रवेश- पुढे रवी राणा म्हणाले, " गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज विविध पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांचा प्रवेश देखील आज होत आहे. नव्या वर्षात आता काही दिवसातच अनेक पक्षातील मंडळी भाजपमध्ये दिसतील, असे रवी राणा म्हणाले. नवीन वर्षात कोणावरही कोणी टीका-टिप्पणी करू नये. प्रत्येकानं प्रत्येकाबाबत चांगले विचार बाळगावे, असा सल्लादेखील आमदार राणा यांनी विरोधकांना दिला. आता नवीन वर्षात प्रत्येकाने सकारात्मक विचार ठेवायला हवेत. विकासावर प्रत्येकानं भर द्यायला हवा. खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यात विकासाची अनेक कामे केली आहेत. नवनीत राणांचा निवडणुकीतील विजय हा निश्चित आहे. आज आम्ही आमच्या प्रचार कार्यालयावर विकासाची गुढी उभारली आहे, " आमदार रवी राणा यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. आमदार रवी राणांपेक्षा त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा दुप्पट श्रीमंत! - Navneet Rana Property
  2. लोकशाहीच्या मार्गाने नवनीत राणा यांची खासदारकी नक्की जाईल - रोहित पवार - Lok Sabha Elections
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.