ETV Bharat / politics

लोकसभा निवडणूक 2024 : मुंबईतील सर्व जागा जिंकणार, भाजपाचा निर्धार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 3:49 PM IST

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहेत. त्यामुळं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 जागांपैकी 45 जागा जिंकण्याचा संकल्प केला आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपाने केलाय. याकरता विशेष रणनीती आखली गेली असून निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्याचा निर्णय सुद्धा भाजपाने घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबईतून केंद्रीय मंत्री पियुष गोयल त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

loksabha elections 2024 BJP is preparing to capture all the six Lok Sabha constituencies in Mumbai
मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघावर भाजपा कब्जा करण्याच्या तयारीत

मुंबई Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन महाविजय 2024’ अंतर्गत मुंबई भाजपा लोकसभा निवडणूक संचालन समितीची पहिली बैठक 10 जानेवारीला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत दादर येथील पक्ष कार्यालयात पार झाली. तसंच या बैठकीत महायुतीच्या माध्यमातून मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपानं यापूर्वीच पूर्ण देशात रणनीती आखली असून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याकडं भर दिला आहे. त्यातच महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात विशेष चाचपणी केली गेली असून मोठ्या मताधिक्याने जिंकून येणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उत्तर मुंबई मतदार संघातून रिंगणात उतरवण्यात येण्याची दाट शक्यता असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर उत्तर आणि मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात चाचपणी सुरू आहे.



विशेष समितीची स्थापना : राज्यसभेतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी भाजपाने तयारी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील लोकसभेच्या मतदारसंघातून या ज्येष्ठ नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यासाठी मिशन महाविजय 2024 या अंतर्गत भाजपाने मुंबईतील एकूण 6 लोकसभा मतदार संघासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्षपद मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे आहे. तर संयोजक पदाची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर यांच्याकडे सोपवली असून सह संयोजक पदाची जबाबदारी आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, आमदार अमित साटम आणि संजय उपाध्याय यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


भाजपा सहा उमेदवार देण्याच्या तयारीत : 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री, उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मनोज कोटक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता.

आताच्या घडीला मुंबईत भाजपाचे उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी, उत्तर पूर्व मुंबई मनोज कोटक, उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन असे 3 खासदार आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबई गजानन किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईत राहुल शेवाळे हे दोन बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार ज्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दक्षिण मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे मुंबईतील एकमेव खासदार आहेत. अशा परिस्थितीमध्ये उत्तर पश्चिम मुंबई व दक्षिण मध्य मुंबई या जागेवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे मागील 2 वर्षांपासून या मतदार संघात विशेष लक्ष ठेऊन आहेत. तर दक्षिण मुंबईत काँग्रेस चे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात जरी प्रवेश केला असला तरी त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची चिन्ह जास्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपाने सुद्धा तिथे दमदार उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे.

पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील : मुंबईतून लोकसभा जागा लढवण्यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी नकार दिला. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, "सध्या तरी नारायण राणेंना मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर राज्यसभेबाबत सुद्धा काही सांगण्यात आलेलं नाही. परंतु याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या अनुषंगानं तयारी करण्यात येईल", असेही नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा -

  1. "पुणे लोकसभेसाठी पक्षाकडून माझाच क्लेम", मनसे नेते वसंत मोरे यांचा दावा
  2. लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?
  3. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार; काय आहे मतदारसंघाची राजकीय परिस्थिती?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.