ETV Bharat / state

भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार; काय आहे मतदारसंघाची राजकीय परिस्थिती?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2024, 12:49 PM IST

Updated : Jan 19, 2024, 3:01 PM IST

Bhiwandi Loksabha Constituency
Bhiwandi Loksabha Constituency

Bhiwandi Loksabha Constituency : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार याची सर्वांना उत्सुकता लागलीय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

ठाणे Bhiwandi Loksabha Constituency : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलंय. त्यातच भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा ठोकत आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे ग्रामीणचे दिग्गज नेता सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकतंच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केलाय. भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची त्यांनी तयारी केलीय. महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या कॉग्रेसमधून माजी खासदार सुरेश टावरे, जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे हे मात्तबर उमेदवारही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतदारसघात कॉंग्रेसची अवस्था बिकट : कॉंग्रेसनं भिवंडी जिल्हा अध्यक्ष माजी आमदार रशिद ताहीद मोमीन यांना अध्यक्षपदावर ठेवलंय. तसंच काँग्रेसचे माजी पदाधिकारी सपा आणि एएमआयएमच्या वाढत्या जनप्रतिसादामुळं पक्षांतर करण्याच्या विचारात आहेत. त्याचप्रमाणे 2019 लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना 52.95 टक्के म्हणजेच 5 लाख 23 हजार 583 मतदान मिळालं होतं. तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना 37 टक्के म्हणजेच 3 लाख 67 हजार 254 इतकं मतदान होऊन दुसऱ्या वेळी पराभवाचा सामना करावा लागला होता.

मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांची स्थिती काय : दरम्यान 2019 मध्ये भिवंडी लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा क्षेत्रांपैकी शहापूर विधानसभेत अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे आमदार आहेत. तर मुरबाडमधून भाजपाचे किसन कथोरे, भिवंडी पश्चिम मधून भाजपाचे महेश चौघुले, भिवंडी पूर्व मधून समाजवादी पक्षाचे रईस शेख, भिवंडी ग्रामीण मधून शिंदे गटाचे शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मधून शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे सहाही विधानसभा मधून विद्यमान आमदार आहेत. तसंच ग्रामीण भागात शिंदे गट आणि भाजपाचं सारखंच राजकीय वर्चस्व असून सध्या जिल्हा परिषदेसह बहुतांश पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीही महायुतीच्या ताब्यात आहेत.

कपिल पाटील सलग दोनदा विजयी : केंदीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांना भूषवता आलं. पुढं 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला होता. 2014 व 2019 मधील भिवंडी लोकसभा मतदार संघातून त्यांनी विजयही संपादित केला होता. दांडगा जनसंपर्क आणि प्रशासकीय कामाची चांगली ओळख असल्यानं त्यांनी अल्पावधीतच भाजपामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय.

कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान का? : 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा यांच्यात झालेल्या फारकतीमुळं ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं प्राबल्य कमी करण्यासाठी भाजपा पक्षश्रेष्ठींकडून खासदार पाटील यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान देण्यात आलं. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा भाजपाचे दिवंगत रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांच्यापासून भाजपाचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र या जिल्ह्याला केंद्रात नेतृत्त्वा करण्याची संधी मिळाली नाही. कालांतरानं भाजपाकडून शिवसेनेनं ठाणे जिल्हा हिसकावून घेतला व आधी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये वर्चस्व आहे. मुंबईतील शिवसेनेचं वर्चस्व मोडून काढण्याकरिता तसंच ठाणे जिल्ह्यातील सत्तेला आव्हान देण्यासाठी कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री पदावर संधी देण्याचं धोरण भाजपाचं असल्याचं बोललं जातंय.



सर्व पक्षांत फिरुन म्हात्रे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात : दरम्यान, ग्रामीण भागातील दिग्गज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केलाय. शरद पवार यांच्या उपस्थितीत बाळ्या मामांनी राष्ट्रवादीच्या नाशिक इथं झालेल्या अधिवेशात प्रवेश केला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्येही प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता पुन्हा राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास राहिलाय. सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे 'बाळ्या मामा' नावानं प्रसिद्ध आहेत. त्यांनी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं. ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती 2014 मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पराभवानंतर आधी भाजपा, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नंतर अर्ज मागं घेत कपिल पाटील यांच्यावर टीकाही केली होती. त्यामुळं त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आलं, नंतर त्यांचं निलंबन मागं घेण्यात आलं. आता मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच सामना भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


हेही वाचा :

  1. 'मला भाजपा प्रवेशाची ऑफर देणारा मोठा माणूस, नाव सांगणार नाही'; सुशीलकुमार शिंदेंनी वाढवला सस्पेंस
  2. ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुका 'मशाल' चिन्हावरच - खासदार विनायक राऊत
Last Updated :Jan 19, 2024, 3:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.