ETV Bharat / politics

"शाहू महाराजांनी हरण्यासाठी निवडणूक लढवू नये", रामदास आठवलेंचा सल्ला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 7:26 PM IST

Ramdas Athawale On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराजांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची आहे. परंतु या संदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, असं असलं तरी राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरुन चर्चांना उधाण आल्याचं बघायला मिळतंय. यावरच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

Lok Sabha Elections 2024 Ramdas Athawale comment on kolhapur seat said Shahu Maharaj should not contest elections to lose
रामदास आठवलेंचा शाहू महाराजांना सल्ला

रामदास आठवले यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला

शिर्डी Ramdas Athawale On Shahu Maharaj : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आल्याचं बघायला मिळतंय. या जागावाटपादरम्यान कोल्हापूरच्या जागेची सध्या विशेष चर्चा होताना दिसतेय. याचं कारण म्हणजे या जागेवर महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये चर्चांना उधाण आलंय. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूरच्या जागेविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच 'शाहू महाराजांनी हरण्यासाठी निवडणूक लढवू नये', असा सल्लाही त्यांनी दिलाय.

काय म्हणाले रामदास आठवले : यासंदर्भात शिर्डीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना रामदास आठवले म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी महाविकास आघाडी ऐवजी 'महायुती' सोबत येवून निवडणूक लढवावी. ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवतील माहीत नाही. मात्र, त्यांनी हरण्यासाठी निवडणूक लढवू नये. तसंच जर शाहू महाराजांनी भाजपासोबत येत निवडणूक लढवली तर ते नक्कीच निवडून येतील, असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डीच्या जागेसंदर्भातही दिली प्रतिक्रिया : यावेळी शिर्डीच्या जागेविषयी प्रतिक्रिया देत ते म्हणाले की, 2009 मध्ये शिर्डीमधून हरलो होतो. मात्र, असं असली तरी माझी दोन वर्ष राहिलेली राज्यसभेची खासदारकी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्यात यावी आणि मला शिर्डीची जागा द्यावी, अशी मागणी आठवलेंनी केली. पुढं ते म्हणाले की, "जर शिर्डीची जागा भाजपाला मिळाली, तर ती त्यांनी मला द्यावी. यापुर्वीही कॉंग्रेसबरोबर असताना मी 'पंजा'वर निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळं आताही मी शिर्डीतून माझ्याच चिन्हावर निवडणूक लढवणार, असंही ते म्हणाले.

वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवावी : "वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीत सतत अपमान केला जातोय. त्यामुळं त्यांनी आमच्यासोबतही येऊ नये आणि महाविकास आघाडी सोबतही जाऊ नये. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी", असा सल्लाही यावेळी रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला.


हेही वाचा -

  1. लोकसभेच्या उमेदवारीवरुन शाहू महाराजांचं मोठ वक्तव्य; म्हणाले,...
  2. "तुतारी कायमच आणि चांगल्या वेळी वाजत असते", श्रीमंत शाहू महाराजांनी काय दिले संकेत?
  3. शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं, मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.