ETV Bharat / politics

तिसरा टप्पा निवडणूक : मोदी की गादी, नणंद की भावजय; मंगळवारी 'या' दिग्गजांमध्ये रंगणार सामना - Lok Sabha Elections 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 7:02 PM IST

Updated : May 6, 2024, 11:01 PM IST

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान मंगळवारी (7 मे) होणार आहे. या टप्प्यात दोन छत्रपती अर्थात कोल्हापुरात शाहू महाराज (Shahu Maharaj) तर साताऱ्यात उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रिंगणात आहेत. दुसरीकडं बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत रंगणार आहे.

Lok Sabha Elections 2024
लोकसभा निवडणूक 2024 (Maharashtra Desk)

मुंबई Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदार संघात मतदान होणार आहे. यात कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांच्या विरोधात संजय मंडलिक (Sanjay Mandlik) तर साताऱ्यात उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या विरोधात शशिकांत शिंदे असा मोठा सामना रंगणार आहे. दुसरीकडं बारामती लोकसभा मतदार संघात नणंद भावजयीचा सामना रंगणार आहे. बारामती लोकसभा मतदार संघाकडं देशभराचं लक्ष लागलं आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष अजित पवार या काका पुतण्यांच्या राजकारणाचा कस पाहणारी ही निवडणूक होणार आहे. दुसरीकडं कडक उष्णतेमुळं राजकीय पक्षांना मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय.

छत्रपती शाहू महाराज आणि उदयनराजे रिंगणात : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यात रायगड, बारामती, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदार संघात मतदान होणार आहे. यातील सातारा, बारामती, रायगड, माढा, सांगली इथं महत्वाच्या लढती होत आहेत. यात कोल्हापूर लोकसभा मतदार संघात छत्रपती शाहू महाराज आणि सातारामध्ये छ. उदयनराजे भोसले रिंगणात आहेत. या लढतीकडं राज्यभरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

बारामतीत नणंद भावजयीच्या लढतीत प्रतिष्ठा पणाला : बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत नणंद भावजयीची थेट लढत होत आहे. या लढतीकडं देशभराचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वितुष्ट आलं. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उमेदवार राहील, याबाबत मोठी चर्चा रंगली होती. इथं अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानं सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं.

माढा, सांगली, सोलापूरमध्ये लागणार कस : लोकसभा निवडणूक 2024 च्या लढतीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात माढा लोकसभा मतदार संघात शरद पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीनं धैर्यशील मोहिते पाटील यांना मैदानात उतरवलं आहे. वंचित बहुजन आघाडीनं रमेश बारस्कर यांना उमेदवारी दिली. मात्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात खरा सामना रंगणार आहे. सोलापूर मतदार संघात माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहे. त्यामुळे दोन विद्यमान आमदार लाकसभेसाठी सोलापूर लोकसभा मतदार संघातून लढत आहेत.

उष्णतेमुळे मतदारांना बाहेर काढण्याचं आव्हान : राज्यात सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. नागरिकांना उष्णतेनं बेजार केल्यामुळं दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर त्याचा प्रभाव पडल्याचं दिसून आलं. आता मात्र तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या 11 मतदार संघात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जेमतेम 62.71 टक्के मतदान झालं. त्यामुळं मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढं निर्माण झालंय.

हेही वाचा -

  1. नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024
  2. माणूस जातीनं नाही, तर गुणानं मोठा असतो; जातीचं राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितीन गडकरींनी फटकारलं - Lok Sabha Election 2024
Last Updated : May 6, 2024, 11:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.